मी व्यावसायिक कारकीर्दीच्या सुरवातीपासून आमच्या दुकानातील कर्मचाऱ्यांशी मैत्रीचे गोफ विणले. मालकाचा मुलगा म्हणून अहंकाराने वागण्यापेक्षा त्यांच्यातलाच एक बनून वावरलो. परिणामी, माझे कर्मचारी मला मालकाऐवजी मोठा भाऊ मानू लागले. सन १९९० मध्ये आमची दुबईत पाच गोदामे होती. तेथील मालसाठ्याची पडताळणी करण्यासाठी जाताना आम्हा सगळ्यांचा एक परिपाठ असायचा. दुपारपर्यंत भरपूर काम केल्यावर आम्ही एकत्र भोजन करत असू आणि भोजनसुटीच्या उरलेल्या वेळात कंपाऊंडमध्ये मस्त क्रिकेट खेळत असू. याचा दुहेरी फायदा म्हणजे अंगात आळस जाणवत नसे व आम्हा सर्वांमध्ये एकात्मतेची भावना वाढीस लागे.
एक दिवस असेच क्रिकेट खेळून आम्ही पुन्हा कामात गुंतलो असताना बाहेर प्रचंड कर्णकर्कश्श स्फोट होऊन जोराचा हादरा बसला. काय झालंय हे समजायच्या आत आमच्या गोदामावर तुटकी लाकडे व लोखंडी वस्तूंचा जोरदार मारा झाला. मी बाहेर धाव घेऊन बघितले तर शेजारच्या कंपाऊंडमधील एका गोदामात जबरदस्त स्फोट होऊन आगीचे लोळ उठले होते. शेजारचा एक व्यापारी त्याच्या गोदामात फटाक्यांचा साठा उतरवून घेत असताना त्या साठ्याला अचानक आग लागली होती. ती आग पसरत पसरत आमच्या गोदामांकडे येत होती. माझ्या चार गोदामांतील धान्य, वस्तूंचा साठा त्या स्फोटाने हवेत उडून पसरला होता.
स्फोट झालेला साठा फटाक्यांचा असल्याने त्यातून आणखी नव्या स्फोटांची मालिका सुरु झाली. ते जळते फटाके हवेत उडून आगीत भर घालत होते. मी सुन्नबधीर होऊन बघत होतो. माझी पावले जमिनीला चिकटली होती. आगीचा लोळ माझ्या दिशेने येत असताना जीव वाचवून पळायचे भानही मला उरले नव्हते. तेवढ्यात आमच्या दुकानातील रतन नावाचा एक बांगलादेशी कामगार पळत आला. जीवाची पर्वा न करता त्याने मला ढकलत ओढून नेले आणि बाहेर उभ्या असलेल्या गाडीत अक्षरशः कोंबले. ड्रायव्हरने तत्काळ गाडी सुरु करुन मला लांब नेले. त्यादिवशी रतन नसता तर त्या आगीने माझाही बळी घेतला असता.
नंतरही मला माझ्या कर्मचाऱ्यांच्या जिद्दीचा आणि आपुलकीचा वेळोवेळी प्रत्यय आला. मी दीर्घकाळ चाललेल्या दुखण्याने खूप निराश आणि हतबल झालो होतो. कोणत्याही औषधाने गुण येत नव्हता. मृत्यूची भीती, व्यवसायाचे भवितव्य आणि कुटुंबाची काळजी अशा विचारांनी त्रासलो होतो, पण माझ्या कर्मचाऱ्यांनी मला त्या निराशेतून बाहेर काढण्याचा चंग बांधला. त्यांनी माझ्या पत्नीला दिलासा देत औषधोपचारांकडे, शुश्रूषेकडे लक्ष देण्यास सांगितले. मला सक्तीने माझ्या कामाचे तास कमी करायला लावले. कंपनीची व दुकानांची जबाबदारी चोख सांभाळली. त्या जीवघेण्या दुखण्यातून बरा झाल्यावर माझ्या कर्मचाऱ्यांचे ऋण मी कधीच विसरलो नाही. सांगायला अभिमान वाटतो, की आजवर माझा एकही कर्मचारी नाराज होऊन किंवा भांडून बाहेर गेलेला नाही. माझ्या कर्मचाऱ्यांना अन्यत्र जास्त पगाराच्या नोकरीवर जाण्यापासून आणि त्यांचे देणे तत्काळ मिळण्यापासून मी कधीच रोखत नाही. त्यामुळे माझ्या कंपनीतून इतरत्र गेलेले कर्मचारी आजही आपुलकीने मला भेटायला येतात.
मित्रांनो! मला नेहमी आश्चर्य वाटते, की पुष्कळसे व्यावसायिक आपल्या कर्मचाऱ्यांना केवळ पगारी नोकर समजतात. खरे तर व्यवसायाच्या प्रगतीत मालकाचा एकट्याचा वाटा नसतो. ते यश सांघिक असते. मालकाने कर्मचाऱ्यांच्या कल्याणाचा विचार केला, त्यांना विश्वासात घेऊन आपुलकीने वागवले आणि त्यांच्या प्रामाणिकपणाचा वेळोवेळी गौरव केला तर असे संतुष्ट कर्मचारी कंपनीला खरोखर यशाच्या शिखरावर नेऊन ठेवतात.
शहेनशहा औरंगजेबाने वृद्धापकाळात आपल्या तिसऱ्या मुलाला एक पत्र पाठवले होते. त्यातील काही ओळींचे भाषांतर मला येथे द्यावेसे वाटते. औरंगजेब या पत्रात म्हणतो, ‘प्रामाणिक माणूस हा शुद्ध सोन्यासारखा असतो. जगात माणसे खूप आढळतात, पण प्रामाणिक माणसे कमी असतात. प्रामाणिकपणा व कामसूपणा हे देवाने मानवाला दिलेले जन्मजात उच्च गुण आहेत. आपल्या हाताखालचे लोक सुखी असावेत, यासाठी मालकाने त्यांना प्रोत्साहन व बक्षीस द्यावे. त्यांना चरितार्थाची काळजी करायला लागू नये. भौतिक गरजांना वंचित राहिल्याने ते नाईलाजाने भ्रष्ट मार्गाकडे वळतात. लक्षात ठेव, आनंदी आणि समाधानी कर्मचारीच अधिक जोमाने काम करतो.’
मला वाटते, एका सम्राटाने आपल्या युवराजाला दिलेला हा शहाणपणाचा सल्ला प्रत्येक उद्योजक-व्यावसायिकासाठीही तितकाच बोधप्रद आहे.
हे वाचाः धनंजय दातार यांचे सर्व लेख वाचण्यासाठी येथे क्लिक करा
(लेखक धनंजय दातार हे दुबईस्थित अदिल उद्योगसमूहाचे व्यवस्थापकीय संचालक आहेत.)