आमच्या दुबईतील दुकानात विक्री उत्तम होत असल्याने नफ्याची मोठी रक्कम माझ्याकडे साठली होती. या पैशाचे काय करावे हे न समजल्याने ती रक्कम मी एका बँकेत मुदत ठेव म्हणून ठेवली. एक दिवस त्या बँकेच्या व्यवस्थापकाने मला फोनवर विचारले, “दातार साहेब! तुम्ही एवढी मोठी रक्कम नुसतीच ठेव म्हणून ठेवली आहे. तुम्हाला व्यवसायाचे खर्च भागवण्यासाठी पैशाची गरज भासत नाही का? इतर व्यापाऱ्यांप्रमाणे तुम्ही ठेवीवर तारणकर्ज (लोन अगेन्स्ट डिपॉझिट) का घेत नाही?” त्याच्या तोंडचा कर्ज हा शब्द ऐकून मी दचकलो आणि गडबडीने म्हणालो, “छे...छे! मला ती कर्जाची भानगड नको. कर्ज म्हणजे डोक्याला ताप असतो.” हे उत्तर ऐकल्यावर मी धंद्यात अद्याप मुरलो नसल्याचे ओळखून त्या व्यवस्थापकाने मला भेटायला बोलवले.
भेटीदरम्यान तो म्हणाला, “साहेब! कर्ज नेहमीच वाईट नसते तर धंद्यासाठी खरेतर संजीवनी असते. कर्ज व्यवसायाच्या वाढीसाठी वापरले आणि शिस्तीने फेडले तर त्याचा फायदाच होतो. माझे ऐकाल तर तुम्ही कर्ज घेऊन नवे दुकान सुरु केलेत तर तुमची उलाढालही वाढेल.” विचारांती मला त्याच्या सल्ल्यात तथ्य जाणवले कारण अनेक ग्राहक दुबईतूनच नव्हे, तर जवळच्या अबू धाबी शहरातूनही आमच्या दुकानात खरेदीसाठी येत असत आणि मी त्यांच्या शहरात मध्यवर्ती ठिकाणी दुकान उघडावे, अशी सूचना करत असत. ग्राहकांना घराजवळच वस्तू उपलब्ध होण्याची सोय झाली तर मलाही ते हवेच होते.
मी बिचकतच ते कर्ज घेऊन नव्या दुकानासाठी अजमानमध्ये जागा बघितली. आनंदाची गोष्ट म्हणजे ते दुकानही फायद्यात चालू लागले. तो नफा साठवून सहा महिन्यांनी मी कर्ज एकरकमी फेडण्याच्या निर्धाराने बँकेत गेलो. तो व्यवस्थापक हसून मला म्हणाला, “कर्जफेडीची घाई करु नका. नफ्याच्या पैशांची भर घालून तुमची ठेव रक्कम वाढवा आणि त्यावर मोठे कर्ज घेऊन तिसरे दुकान टाका.” त्या सल्ल्याने मी गोंधळून गेलो.
माझ्या भांबावलेपणाचा किस्सा त्या व्यवस्थापकाने बहुधा आपल्या मित्रांच्या वर्तुळात सांगितला असावा, कारण दोन दिवसांनी मला दुसऱ्या एका बँकेच्या व्यवस्थापकाचा फोन आला आणि त्याने दोन टक्के कमी व्याजदराने कर्ज देण्याची तयारी दाखवली. आता मात्र मला या खेळाची गंमत वाटू लागली. स्पर्धात्मक वातावरणात व्याजदर असा कमी होऊ शकतो, हे मला ठाऊकच नव्हते. मी पहिल्या बँकेच्या व्यवस्थापकाला कळवले, की दुसरी बँक मला दोन टक्के कमी व्याजदराने कर्ज देत असून त्यातून मी तुमचे कर्ज फेडून टाकणार आहे. त्यावर तो घाईघाईने म्हणाला, “साहेब! तुम्ही आमचे प्रतिष्ठित कर्जदार असल्याने मी तुम्हाला आणखी दोन टक्के व्याज कमी करुन देतो, पण तुम्ही अन्यत्र जाऊ नका.”
आता मला या खेळाचे व्यूहतंत्र उमगले. धंद्यात पुरवठादारांशी सौदा करता येतो तेच येथेही घडते. अखेर बँकिंग हाही एक व्यवसायच आहे आणि त्यातही ग्राहक टिकवण्याची स्पर्धा असते. मी संधी साधून फक्त चार टक्के व्याजाने नवे कर्ज घेतले आणि त्यातून पहिले कर्ज फेडून शारजामध्ये तिसरे दुकान सुरु केले. जागा दाखवण्यासाठी मी त्या बँक व्यवस्थापकाला बोलावले तेव्हा तो म्हणाला, “शेजारचा रिकामा गाळाही आताच घेऊन टाका. अजुन दहा वर्षांनी हा भाग वर्दळीचा झाल्यावर अशी मोक्याची जागा पुन्हा मिळणार नाही.” मी त्याचा सल्ला मानून दोन्ही जागा घेतल्या आणि ती दूरदृष्टी ठरली.
हेही वाचाः पुढे टाकलेले पाऊल मागे घेऊ नका...
अशा रीतीने ‘दिमाग मेरा पैसा तेरा’ या कौशल्यात मी पारंगत झालो. अर्थात मी दोन पथ्ये कायम पाळली. कर्जाची रक्कम केवळ नव्या दुकानासाठी भांडवल म्हणून वापरली आणि कर्जाचे हप्ते एकदाही चुकू दिले नाहीत. धनंजय दातार हे प्रामाणिक उद्योजक असून कर्जाचे हप्ते वेळेवर भरतात, ही माहिती आपोआप बँकांच्या वर्तुळात पसरली. या सदिच्छेचा उपयोग मला नेहमी होत राहिला. एक महत्त्वाची बाब म्हणजे व्यावसायिकाची तीन-चार वेगवेगळ्या बँकांत खाती असणे गरजेचे असते, कारण गरजेच्या वेळी किमान एक तरी बँक कर्जपुरवठा करतेच.
हे वाचाः गरिबी माणसाला खूप काही शिकवते...
मित्रांनो, गंगाजळीची ताकद स्पष्ट करणारे एक छान सुभाषित आहे.
अर्थेरथा निबध्यन्ति गजैरिव महागजाः।
न ह्यनर्थवता शक्यं वाणिज्यं कर्तुमीहया॥
(अर्थ – पदरी असलेला एक लहानसा निधी वापरुनही आपण व्यापारात अधिक श्रीमंत होऊ शकतो. पाळीव हत्तींचा वापर करुन जंगली हत्तींना आकर्षित केले जाते व पकडले जाते तसेच धनाद्वारे धन आकर्षित करुन अधिक धन मिळवता येते.)