मला खरं तर शाळकरी वयापासून खेळ आणि व्यायामाची आवड होती, पण शरीरसंवर्धनाचे स्वप्न परिस्थितीमुळे मागे राहिले होते. दुकानाची शिस्तशीर घडी बसवल्यानंतर मनातील सुप्त आकांक्षा पूर्ण करण्याचा मी निश्चय केला. कष्टाच्या कामांमुळे माझे शरीर पीळदार होते. आता त्याला एखाद्या शरीर संरक्षण विद्येची जोड द्यावी, असे मला वाटू लागले. त्या काळात म्हणजे १९८० च्या दशकात तरुणांमध्ये कराटेची क्रेझ होती, शिवाय मार्शल आर्ट्स इंग्रजी चित्रपटांचाही प्रेक्षकांवर प्रभाव होता. त्यामुळे मीसुद्धा कराटे शिकायचे ठरवले. नियमित व्यायामासाठी मी एक जिम जॉईन केली. तेथेच ज्युदो, कराटे, किक-बॉक्सिंग अशा शरीर संरक्षण कला शिकवण्याचीही सोय होती.
मी तेथील विभाग प्रमुखांना भेटून कराटे शिकण्याची इच्छा व्यक्त केली. त्या प्रशिक्षकाने मला माझी माहिती विचारली. मी व्यावसायिक असल्याचे सांगताच तो विचारमग्न होत मला म्हणाला, ‘कृपया राग मानू नका, पण तुम्ही कराटेआधी ज्युदो शिका. कराटेमध्ये आक्रमणाला तर ज्युदोमध्ये बचावाच्या डावपेचांना महत्त्व असते. प्रतिस्पर्ध्याचा डाव त्याच्यावरच उलटवून नामोहरम करण्याचे तंत्र ज्युदोमध्ये शिकवले जाते. तुम्हाला याचा फायदा व्यवसायाची व्यूहरचना करतानाही होईल. लक्षात ठेवा आक्रमणापेक्षा आधी स्वसंरक्षण महत्त्वाचे असते.’ त्याच्या सूचनेमुळे मी थोडा आश्चर्यचकित झालो, कारण या माणसाला व्यवसायाचा अनुभव नव्हता तरीही त्याचा आडाखा अचूक होता.
त्या प्रशिक्षकाच्या सल्ल्याचा मनाशी विचार करताना मला शिवाजी महाराजांच्या जीवनातील एका प्रसंगाची आठवण झाली. आग्र्यातून सुटका करुन घेतल्यावर ते बैराग्याच्या वेशात मराठी मुलखात परत येत होते. वाटेत सीमेवरील एका खेड्यात एका गरीब शेतकऱ्याच्या घरी त्यांना रात्रीचा मुक्काम करावा लागला. शेतकऱ्याच्या पत्नीने स्वयंपाक रांधून पाहुण्यांना पानात आमटी-भात वाढला. राजांनी भाताच्या ढीगावर आमटी ओतून घेतली, तर ती पानभर पसरली. ते बघून ती गृहिणी म्हणाली, ‘अरे बाबा! तू अगदी शिवाजीराजासारखाच चूक करतोयस. त्याने राज्याला कुंपण केले नाही म्हणून शत्रूला आक्रमण करायला मोकळे रान मिळतंय. तुसुद्धा भाताला आळं कर बाबा. नाहीतर कालवण असंच पानभर पसरेल.’
शिवाजीराजांनी त्या माऊलीच्या उपदेशातील तथ्यांश जाणला आणि घरी परतल्यावर नंतरची तीन वर्षे मुघलांशी लढाया करण्यापेक्षा स्वतःच्या राज्याचा बंदोबस्त करण्याकडे काटेकोर लक्ष पुरवले. त्याचा फायदा त्यांना झाला. पुढची सगळी वर्षे म्हणजे राजे हयात असेपर्यंत औरंगजेबाला स्वराज्यात पाय ठेवता आला नाही. आक्रमण करणाऱ्या मुघल सैन्याला प्रत्येक लढाईत पराभूत व्हावे लागले. आक्रमणापेक्षा आधी संरक्षण किती महत्त्वाचे असते, हेच त्यातून सिद्ध झाले.
मी याच विचाराने पुढची काही वर्षे प्रयत्नपूर्वक ज्युदोचे डावपेच शिकलो आणि त्याचा उपयोग माझ्या व्यवसायातही करुन घेतला. या संरक्षण व्यूहरचनेचा फायदा मला कसा झाला हेही सांगतो. एकदा एक व्यापारी आमच्या कंपनीच्या ब्रँडनावाच्या अक्षरांत पटकन् लक्षात येणार नाही असा बदल करुन त्याखाली बनावट उत्पादने विकू लागला होता. ग्राहकांच्या व आमच्या उत्पादनांच्या सुरक्षिततेचा प्रश्न असल्याने मी त्या प्रकरणाच्या मुळाशी जायचे ठरवले. जो माणूस हे उपद्व्याप करत होता त्याला आधी इशारा दिला, पण त्याने त्याकडे साफ दुर्लक्ष केले.
मग मात्र मी त्याला धडा शिकवण्याचा निश्चय केला. आधी माझ्या ब्रँडच्या सुरक्षिततेचा बंदोबस्त केला, कायदेशीर सल्ला घेतला, कागदपत्रे व्यवस्थित जमा केली, त्या माणसाचे कच्चे दुवे हेरुन त्याला कोंडीत पकडले आणि मग कोर्टात खेचले. ग्राहकांच्या सुरक्षेचा प्रश्न असल्याने कोर्टानेही त्याची लबाडी खपवून घेतली नाही. अखेर तो माझ्याकडे गयावया करु लागला, पण प्रकरण कोर्टापुढे गेल्याने माझाही नाईलाज झाला. त्या माणसाला प्रचंड दंड भरावा लागलाच, पण व्यापारी वर्तुळातही त्याची बदनामी झाली.
मित्रांनो! मी कधीही इतर ब्रँडशी स्पर्धा करायला जात नाही, याचे कारण हेच आहे. आक्रमणाच्या जोशात माणूस बेफिकीर बनतो आणि त्याच्या हातून चुका होत जातात. दुसऱ्यावर कुरघोडी करायला जाण्यापेक्षा आपल्या व्यवसायात सजग राहावे आणि धोकादायक ठरु शकतील, अशा पोकळ्या बुजवण्याला प्राधान्य द्यावे. समर्थ रामदासांनी दासबोधामध्ये खूप छान उपदेश केला आहे. ते म्हणतात
जो जो ज्याचा व्यापार । तेथे असावे खबरदार ।
दुश्चितपणे तरी पोर । वेढा लावी ॥
संबंधित बातम्या