मराठी बातम्या  /  बिझनेस  /  business ideas : जोडोनिया धन उत्तम व्यवहारे… पैशाचे महत्त्व संकटात उमगते! 'मसाला किंग' धनंजय दातार सांगतायत स्वानुभव

business ideas : जोडोनिया धन उत्तम व्यवहारे… पैशाचे महत्त्व संकटात उमगते! 'मसाला किंग' धनंजय दातार सांगतायत स्वानुभव

HT Marathi Desk HT Marathi
Jun 10, 2024 10:42 AM IST

आपला बहुसंख्य समाज गरीब राहण्याचे एक कारण म्हणजे त्याला योग्य अर्थार्जनाचे मार्गदर्शन मिळालेले नाही. ‘जोडोनिया धन उत्तम व्यवहारे’ म्हणणारे संत तुकाराम किंवा ‘प्रपंची पाहिजे सुवर्ण’ असे बजावणारे संत रामदास असे काही अपवाद सोडले तर बहुतेक संतांनी ‘पैसा हे अनर्थाचे मूळ’ असाच उपदेश केल्याचे दिसते.

Business Ideas : पैशाचे महत्त्व संकटात उमगते...
Business Ideas : पैशाचे महत्त्व संकटात उमगते...

 

धनंजय दातार

 

ट्रेंडिंग न्यूज

आयुष्यात पैशाला सर्वस्व मानणाऱ्या हावरट लोकांइतकाच पैशाची निंदा करणाऱ्यांचाही मला तिटकारा आहे. एका कीर्तनकाराची गंमतीशीर गोष्ट आहे. त्याने एकदा आदि शंकराचार्यांचे ‘अर्थमनर्थ भावयनित्यम्। नास्तिस्तेषः सुखलेश सत्यं’ (पैसा हे अनर्थाचे मूळ) हे वचन उद्धृत करुन असे काही निरुपण केले, की विरक्तीच्या तत्त्वज्ञानाने श्रोते खूपच प्रभावित झाले. प्रवचन संपल्यावर बुवांनी श्रोत्यांपुढे दक्षिणेसाठी ताट फिरवायला सुरवात केली. त्यावर एका श्रोत्याने खट्याळपणे विचारले, ‘बुवा! आताच तर तुम्ही सांगितलेत ना, की पैसा हे सर्व अनर्थाचे मूळ आहे म्हणून?’ त्यावर बुवा म्हणाले, ‘अरे बाबा! ते सगळे प्रवचनात सांगण्यापुरते ठीक आहे. तुम्ही पैसे न दिल्यास माझ्यापुढे संध्याकाळच्या भाकरीचा प्रश्न उभा राहील.’ वरकरणी आपल्याला हा विनोदी किस्सा वाटला तरी त्यात जीवनातील एक जळजळीत सत्य लपले आहे. ते म्हणजे शब्दांच्या पोकळ बुडबुड्यांपेक्षा पोटाची भूक जास्त महत्त्वाची असते.

पैसा हा मुळात वाईट नसतो. तो मिळवण्यासाठी पापाचा मार्ग अवलंबला किंवा त्याचा विनियोग दुसऱ्याला त्रास देण्यासाठी केला तरच तो वाईट ठरतो. कष्टाने आणि प्रामाणिकपणे मिळवलेला पैसा अभिमानास्पद असतोच, परंतु जीवनात नेहमी आनंद फुलवतो. हा अनुभव मी स्वतः घेतला आहे. संसारी माणसाने पैशाबाबत कधीही उदासीन राहू नये. संकटकाळात जवळ पैसा नसल्यास रडायची पाळी येते. माझ्यावर एकदा अशीच वेळ ओढवली होती, की ज्यातून संकटकाळी पैसा किती महत्त्वाचा असतो, हे मला उमगले.

ही साधारणपणे पंधरा-वीस वर्षांपूर्वीची गोष्ट आहे. मी एकटाच व्यावसायिक कारणासाठी हाँगकाँग, थायलंड व इंडोनेशिया या देशांच्या दौऱ्यावर गेलो होतो. दुबईहून मी हाँगकाँग विमानतळावर पोहोचलो. तेथून मला दुसरे विमान पकडून थायलंडला जायचे होते. मी सरकत्या पट्ट्यांजवळ उभा राहून माझ्या सामानाची वाट बघत होतो, पण माझी बॅग काही आलीच नाही. माझ्या काळजात धस्स झाले कारण मी एक मोठी चूक करून बसलो होतो. माझी औषधे, उबदार कपडे, कागदपत्रे याबरोबर पैशांचे पाकिटही मी त्या बॅगेत ठेवले होते. माझ्याकडे माझ्या पासपोर्टखेरीज काहीही नव्हते. खिशातल्या पाकिटात किरकोळ रक्कम होती. त्या काळात मोबाईल, क्रेडिट-कार्डचा आजच्याइतका प्रसार झालेला नसल्याने मी रोख रक्कमच सोबत घेऊन गेलो होतो. आता बॅग गहाळ झाल्यामुळे पुढे काय करावे, अशा काळजीत मी हाँगकाँग विमानतळावर उभा होतो.

विमानतळाच्या नियमानुसार सामान गहाळ झालेल्या प्रवाशाला तात्पुरता दिलासा म्हणून काही आर्थिक मदत केली जाते. त्यानुसार माझ्या हातात काही डॉलर पडले, पण लवकरच माझा भ्रमनिरास झाला. ते अमेरिकी डॉलर नसून हाँगकाँग डॉलर होते. तेवढ्या रकमेत मला फारतर काही खाद्यपदार्थ विकत घेता आले असते. एव्हाना मला भुकेची जाणीव झाली होती. विमानतळावरील खाद्यपदार्थ महाग असल्याने मी बाहेर आलो आणि रस्त्यावरचे स्वस्तातील पदार्थ खाल्ले. अंगावरचे कपडे घामट झाल्याने बदलण्याची गरज होती, पण सर्व कपडे बॅगेतच राहिले होते. मग मी रस्त्यावरील फेरीवाल्याकडून एक स्वस्तातील शर्ट-पँट विकत घेतली. या दोन खरेदींतच माझ्याकडचे बहुतेक सर्व पैसे संपले. एरवी माझ्या व्यापारी जगात मी एका कंपनीचा अध्यक्ष होतो, पण त्यादिवशी विमानतळावर मी एक निर्धन, असहाय्य माणूस म्हणून उभा होतो.

माझी अवस्था फार कुचंबणेची झाली होती. रस्त्यावरील इटुकले पदार्थ खाऊन भूक भागली नव्हती. हातात पैसे तर नव्हते, आणि हाँगकाँगमध्ये कुणीही ओळखीचे नव्हते. अखेर मी सर्व लाज-संकोच बाजूला ठेऊन हाँगकाँग विमानतळावरुन थायलंडमधील यजमानांना इंटरनॅशनल कॉल करुन माझी अडचण कळवली. त्या भल्या गृहस्थांनी तत्परतेने हालचाल करुन माझा थायलंडपर्यंत पोहोचण्याचा प्रवास सुखकर केला. विमानात बसल्यावर खाणे पुढ्यात आले तेव्हा मी खरोखर हात जोडून त्या अन्नाला नमस्कार केला. लहानपणचे गरीबीचे दिवस आठवले. तेव्हाही असेच ताटात येईल त्या अन्नाला नमस्कार करून आम्ही जेवत असू. वेळ कशी येईल, हे सांगता येत नाही. संकटकाळात आपल्यापाशी काही तरी सुटकेचा उपाय असणे गरजेचे असते.

मित्रांनो! ‘पैशाने सर्व सुखे खरेदी करता येत नाहीत,’ वगैरे तत्त्वज्ञान ज्यांना ऐकायचे त्यांना ऐकू द्यात. मी इतकेच सांगेन, की संकटाच्या काळात आपली भूक भागेल किंवा लाज वाचवेल इतका पैसा नेहमी शिलकीत असू दे.

WhatsApp channel