Business Ideas : उद्योगधंद्यामध्ये ‘एकमेका साह्य करु, अवघे धरु सुपंथ...’ चे अतिशय महत्व
मराठी बातम्या  /  बिझनेस  /  Business Ideas : उद्योगधंद्यामध्ये ‘एकमेका साह्य करु, अवघे धरु सुपंथ...’ चे अतिशय महत्व

Business Ideas : उद्योगधंद्यामध्ये ‘एकमेका साह्य करु, अवघे धरु सुपंथ...’ चे अतिशय महत्व

HT Marathi Desk HT Marathi
Updated Jul 20, 2024 12:36 AM IST

‘आपण जगाला जे देतो ते दहापटीने आपल्याकडे परत येते’, हा गौतम बुद्धांचा उपदेश मला पटतो. इतरांना प्रेम दिले तर आपल्यालाही प्रेम मिळते, मदत केली तर मदत मिळते आणि इतरांचा राग-द्वेष केला तर आपल्याही वाट्याला तेच येते. ‘एकमेका साह्य करु, अवघे धरु सुपंथ’…

समाजात एकमेकांना मदत करण्याचे फायदे
समाजात एकमेकांना मदत करण्याचे फायदे

 

 

धनंजय दातार

दुबईमध्ये माझे तेथील व्यवसाय सहयोगी एकदा एका तरुण गर्भवती महिलेला सोबत घेऊन माझ्या कार्यालयात आले. गप्पांच्या ओघात त्यांनी तिची करुण कहाणी मला सांगितली. एका आखाती देशातून निर्वासित म्हणून दुबईत आलेली ती निराधार स्त्री चरितार्थासाठी हॉटेलांमध्ये बेली डान्स हा नृत्य प्रकार करत होती. तिचे नृत्यकौशल्य व सौंदर्य यावर भाळून एका श्रीमंताने संसार करण्याचे आश्वासन देत तिच्याशी विवाह केला. मात्र काही महिन्यांतच तिच्यावर मातृत्व लादून प्रतारणा करत त्याने तिला घटस्फोट दिला. त्यामुळे त्या नृत्यांगनेची अवस्था फार विचित्र झाली होती. गर्भवती अवस्थेमुळे तिचे उपजीविकेचे साधन असलेले नृत्य बंद झाले होते, त्यातून ती निराधार निर्वासित असल्याने दुबईत मदतीला धावणारे कुणी नातलग नव्हते आणि बाळंतपणाच्या खर्चाइतके पैसेही तिच्याजवळ नव्हते. माझ्या सहयोगींनी तिला काही आर्थिक मदत करण्याची विनंती मला केली. तिची ती अवस्था बघून मी सहानुभूतीने काही रक्कम दिली. त्या स्त्रीने कृतज्ञतेने माझे पुन्हा पुन्हा आभार मानले. जाताना ती इतकेच म्हणाली, “साहेब! माझ्या खूप ओळखी आहेत, एरवी माझ्या नृत्यावर फिदा असलेला एकही चाहता अडचणीच्या वेळी मदतीला आला नाही. पण तुमचा आणि माझा काहीएक परिचय नसताना तुम्ही सहानुभूतीने पैसे देऊ केलेत. मी तुमचे उपकार विसरणार नाही.” मी नंतर हा प्रसंग विसरुनही गेलो.

पुढे काही वर्षांनी मला स्वतःला व्यवसायात एका विचित्र समस्येला सामोरे जावे लागले. माझ्या एका स्टोअरच्या परिसरात राहणाऱ्या काही निर्वासितांची किशोरवयीन मुले आमच्या स्टोअरसमोर क्रिकेट, फुटबॉल असे खेळ कधीही खेळत. त्यामुळे दर्शनी भागाच्या काचा फुटण्याचे किंवा किंवा ग्राहकांच्या अंगावर चेंडू आदळण्याचे प्रकार घडू लागले. सांगूनही ती मुले उद्दामपणे वागायची. पोलिसांकडे तक्रार केली तर अल्पवयीन मुलांवर काय कारवाई करणार, असे म्हणत त्यांनी दुर्लक्ष केले. मी अगदी दोन वकिलांचा कायदेशीर सल्लाही घेतला, पण त्यांनी भरमसाट फी उकळून काम मात्र केलेच नाही.

एक दिवस मी त्या स्टोअरजवळच्या हॉटेलमध्ये चहा घेत या समस्येवर मार्ग कसा काढावा, या काळजीत बसून होतो. तेवढ्यात एक रुपवान महिला समोर येऊन बसली आणि ‘साहेब! मला ओळखलेत का?’ असे विचारु लागली. ही तीच बेली डान्सर होती, जिला मी पूर्वी मदत केली होती. ‘तुम्ही एकटेच येथे चिंतातुर बसलेला दिसलात. काही अडचण आहे का?’, असे तिने विचारले. बड्या वकिलांनी हात टेकले तेथे ही बेली डान्सर काय करणार, असा विचार प्रथम माझ्या मनात आला पण दुसरीकडे निर्वासित समुदायात तिच्या ओळखी असतील तर काही मार्ग निघेल, य़ा आशेने मी तिला सर्व हकीगत सांगितली. तिने ती लक्षपूर्वक ऐकली आणि ‘काळजी करु नका. मी मदत करते’ असे सांगून ती निघून गेली. आश्चर्य म्हणजे दुसऱ्याच दिवशी आमच्या त्या स्टोअरपुढील रस्त्यावर पोलिसांची गाडी हजर झाली. पोलिसांनी त्या मुलांसकट त्यांच्या पालकांनाही चौकीत नेले आणि पुन्हा दुकानदारांना त्रास देणार नाही, असे हमीपत्र घेऊन मगच सोडले.

हे वाचाः ‘उद्योगमंत्र’ सदरातील सर्व लेख वाचण्यासाठी येथे क्लिक करा

पोलिसांनी सज्जड दम भरल्याने त्या उनाड पोरांचे रस्त्यावर खेळणे तत्काळ बंद झाले. हा चमत्कार त्या सामान्य महिलेने एका दिवसात कसा करुन दाखवला, याचे मला फार आश्चर्य वाटले. मी तसे विचारता ती म्हणाली, “साहेब! सिंहाला उंदराने मदत केल्याची इसापनीतीमधील गोष्ट तुम्हाला ठाऊक असेलच. तुम्ही माझ्या संकटात माणुसकीच्या भावनेतून मदत केली होतीत. तुमची अडचण समजताच मी ती सोडवण्याचा निश्चय केला. मी फार काही केले नाही. मदतीची परतफेड केली इतकेच.” नंतर मला समजले, की या महिलेने तिच्या ओळखी वापरुन माझ्यासाठी थेट शहर पोलिस प्रमुखांपर्यंत धाव घेतली होती आणि पोलिसांना कारवाई करायला भाग पाडले होते. आपण माणुसकी धर्म पाळून इतरांना मदत करत राहिल्यास आपल्यालाही अडचणीत मदत मिळते, हे मी या अनुभवातून शिकलो.

संत कबीर म्हणतात

‘धन रहै न जोबन रहे, रहै न गांव न ठांव। कबीर जग में जस रहे, करिदे किसी का काम।’ 

अर्थात… धन, यौवन, मालमत्ता यापैकी काहीही शाश्वत राहात नाही. मनुष्याच्या मागे जगात उरते ती त्याची कीर्ती आणि ती दुसऱ्याला मदत करुन मिळत असते.

(लेखक धनंजय दातार हे दुबईस्थित अदिल उद्योगसमूहाचे व्यवस्थापकीय संचालक आहेत.)

Whats_app_banner