business ideas : ‘बोलणाऱ्याची मातीही खपते, परंतु न बोलणाऱ्याचे मोती खपत नाहीत… असं का? जाणून घ्या-business ideas do advertisement to promote your business ,बिझनेस बातम्या
मराठी बातम्या  /  बिझनेस  /  business ideas : ‘बोलणाऱ्याची मातीही खपते, परंतु न बोलणाऱ्याचे मोती खपत नाहीत… असं का? जाणून घ्या

business ideas : ‘बोलणाऱ्याची मातीही खपते, परंतु न बोलणाऱ्याचे मोती खपत नाहीत… असं का? जाणून घ्या

HT Marathi Desk HT Marathi
Sep 02, 2024 05:27 PM IST

business ideas - व्यवसाय आणि जाहिरात कलेचा जवळचा संबंध आहे. नवउद्योजकापासून ते सुस्थापित कंपन्यांपर्यंत प्रत्येकाला आपला व्यवसाय व उत्पादनाची माहिती अधिकाधिक ग्राहकांपर्यंत पोचवण्यासाठी जाहिरात करणे गरजेचे असते.

व्यवसाय वृद्धीसाठी जाहिरात हे टॉनिक असते
व्यवसाय वृद्धीसाठी जाहिरात हे टॉनिक असते

 

धनंजय दातार

व्यवसाय छोटासा होता तोवर मला कधीही जाहिरात करण्याची गरज भासली नाही, पण अदील सुपर स्टोअर्सची साखळी उभारताना मात्र आम्हाला जाहिराती गरजेच्या ठरल्या. त्याची सुरुवात स्टोअर्सची सजावट व उत्पादनांच्या आकर्षक मांडणीतून (डिस्प्ले) झाली. नंतर आमचा पिकॉक ब्रँड जसजसा लोकप्रिय होऊ लागला आणि त्याअंतर्गत उत्पादनांची संख्याही वाढू लागली, तेव्हा मात्र आम्ही योजनाबद्ध जाहिरात मोहीम राबवण्याकडे वळलो.

त्या काळात वर्तमानपत्रे आणि रेडिओ हीच प्रभावी माध्यमे होती. आजच्यासारखा टीव्ही चॅनल्स व सोशल मीडियाचा प्रसार झाला नव्हता. मी मुख्यत्वे रेडिओवर भर दिला, कारण लोक दिवसभर त्यावर बातम्या, गाणी ऐकायचे. रेडिओवरील आमच्या प्रारंभीच्या जाहिराती अगदी साध्या असत. नंतर त्यात वैविध्य व कल्पकता आणावीशी मला वाटू लागली. भारतीयांची चित्रपटांची आवड लक्षात घेऊन मी माझ्या जाहिरातींत लोकप्रिय हिंदी चित्रपटातील संवादाचे प्रसिद्ध वाक्य वापरण्याची कल्पना लढवली. त्यासाठी आवाज देणाऱ्या प्रथितयश मिमिक्री आर्टिस्टनी भरमसाट मानधन मागितल्याने मी तो विचार सोडून देणार होतो, परंतु त्याचवेळी एका होतकरु व नम्र मिमिक्री आर्टिस्टने वाजवी मानधन घेऊन आम्हाला मदत केली. त्यांचे नाव राजू श्रीवास्तव. आम्ही केलेल्या जाहिराती लोकांना खूप आवडल्या. राजू आज आपल्यात नसले तरी त्यांची मदतशील वृत्ती कायम माझ्या स्मरणात राहील.

दूरचित्रवाणी चॅनल्सच्या लोकप्रियतेचा फायदा मी जाहिरातींसाठी करुन घेतला. विशेषतः गृहिणींना आवडणाऱ्या कौटुंबिक मालिकांचे भाग सुरु असताना ब्रेकमध्ये आमच्या उत्पादनांच्या जाहिराती झळकत. मी एक जाहिरातींची मालिका बनवली होती. त्यातील प्रत्येक जाहिरातीत मुले आईला त्यांच्या आवडत्या उत्पादनाबाबत विचारत असत ‘मम्मा कहाँ से?’ (आई हे कुठून आणलंस?) आणि त्यानंतर अदील सुपर स्टोअर्सचा तपशील असे. एकदा टीव्हीवर ती जाहिरात दाखवत असताना माझा मोठा मुलगा हृषिकेश (त्यावेळी तो शाळेत होता) ती लक्षपूर्वक बघत होता. नंतर तो अनपेक्षितपणे उद्गारला, “बाबा! कसली बकवास जाहिरात बनवलीय आपण?” मला धक्काच बसला. एवढा प्रचंड खर्च करुन बनवलेली जाहिरात माझ्याच मुलाला आवडलेली नव्हती. मी शांतपणे विचारले, “आपली जाहिरात बकवास आहे, असे तुला का वाटते?” त्यावर त्यानेही प्रांजळपणे सांगितले, “माझ्या वर्गातील मुले तसे म्हणतात.”

मी विचारात पडलो. ही जाहिरात गृहिणींपर्यंत पोचवण्यासाठी आम्ही मालिकांमधील जाहिरात काळाचे स्लॉट्सही खरेदी केले होते. मग मुले या जाहिरातीला का बरे बकवास म्हणत असावीत? विचार करता मला उमगले, की ‘आपण जाहिरात पोचवण्यासाठी केवळ महिला वर्गाचाच विचार केलाय. लहान मुलांमध्ये तिचा प्रसार फारसा झालेला नाही.’ मग मी एक शक्कल लढवली. दुबईत त्या सुमारास क्रिकेटचे आंतरराष्ट्रीय सामने होणार होते. मी त्याच्या प्रसारणादरम्यानचे टाईम स्लॉट विकत घेतले आणि त्याच जाहिरातींचा इतका मारा केला, की काही प्रेक्षकांनी कंटाळून वाहिनीकडे अगदी तक्रारही नोंदवली, पण त्याचवेळी सामन्यांचा आनंद लुटणारी बच्चे कंपनी मात्र एकदम खूश झाली. ती जाहिरात बघून मुले आपल्या आयांना ‘मम्मा कहाँ से?’ असे विचारुन हसवू लागली. माझा उद्देश सफल झाला.

जाहिरात लोकप्रिय होण्यासाठी प्रत्येकवेळी ती खर्चिकच असावी लागते, असे नाही. कल्पकतेने केलेली साधी जाहिरातही प्रभावी ठरते. त्यातून पूर्वीपेक्षा सध्या जाहिरातींची अनेक माध्यमे खुली झाली आहेत. छापील माध्यमे, नभोवाणी व दूरचित्रवाणी वाहिन्या आहेतच, पण सोशल मीडियावरील जाहिरातीही प्रभावी आणि ग्राहकवर्ग मिळवणाऱ्या ठरत आहेत. सर्वांत महत्त्वाचे म्हणजे या कमी खर्चाच्या या जाहिराती नवउद्योजकांना व्यवसायवाढीसाठी फायदेशीर ठरतात. आजकाल प्रत्येकाकडे स्मार्टफोन असल्याने व तरुण पिढी नेटसॅव्ही असल्याने एसएमएसद्वारे, ईमेलद्वारे, फेसबुक, ट्विवटर, यूट्यूब, इन्स्टाग्राम अशा प्लॅटफॉर्मवरुन केलेल्या जाहिरातीही परिणामकारक ठरतात. एखाद्या उत्पादनाबाबत अधिकृत माहिती घेण्यासाठी ग्राहक संबंधित कंपनीच्या संकेतस्थळाला भेट देतात. हे संकेतस्थळही उत्पादनांची आकर्षक जाहिरात करण्याचे फायदेशीर व्यासपीठ असते. मी तर इव्हेंट्सचा वापरही जाहिरातीसाठी करुन घेतो. ही कल्पना मला ग्राहकांनीच सुचवली. पूर्वी आमच्या नव्या स्टोअरचे उद्घाटन साध्या पद्धतीने होत असे, पण ग्राहकांना झगमगाट, सेलेब्रिटी, सेलेब्रेशन यांचे आकर्षण असल्याने लक्षात घेऊन मी त्यांची अपेक्षा पूर्ण करतो आणि उद्घाटन पंधरवड्यात उत्पादनांवर भरघोस सवलत देऊन आमच्या ब्रँडची भरपूर जाहिरात करतो.

मित्रांनो, ‘बोलणाऱ्याची मातीही खपते, परंतु न बोलणाऱ्याचे मोतीही खपत नाहीत.’ ही म्हण प्रत्येक व्यावसायिकाने लक्षात ठेवायला हवी.

हे वाचाः ‘उद्योगमंत्र’मधील सर्व लेख वाचण्यासाठी येथे क्लिक करा

 

(लेखक धनंजय दातार हे दुबईस्थित अदिल उद्योगसमूहाचे व्यवस्थापकीय संचालक आहेत)