मराठी बातम्या  /  बिझनेस  /  Business Ideas : परिवर्तन संसार का नियम है… बदल वेळीच ओळखून जुळवून घेणे उत्तम, सांगतायत 'मसाला किंग' धनंजय दातार

Business Ideas : परिवर्तन संसार का नियम है… बदल वेळीच ओळखून जुळवून घेणे उत्तम, सांगतायत 'मसाला किंग' धनंजय दातार

HT Marathi Desk HT Marathi
Jul 08, 2024 10:21 AM IST

Business Ideas from Dhananjay Datar : ‘अनित्य अशा या जगाचा परिवर्तन हाच नियम आहे,’ हे भगवद्गीतेतील वचन केवळ उपदेश नसून त्रिकालाबाधित सत्य आहे.

उद्योगमंत्र: बदल वेळीच ओळखून जुळवून घेणे उत्तम
उद्योगमंत्र: बदल वेळीच ओळखून जुळवून घेणे उत्तम

 

धनंजय दातार

आमचे दुबईतले दुकान सुरवातीला टिपिकल भारतीय शैलीचे होते. वस्तूंच्या मांडणीला शिस्त नव्हती. ग्राहकाने काऊंटरपलिकडे उभे राहून वस्तूंची यादी द्यायची आणि आम्ही त्यानुसार त्याला वस्तू काढून द्यायच्या, अशी पारंपरिक पद्धत आम्ही अनुसरत होतो. बिलाचा हिशेब आम्ही कोऱ्या कागदांवर लिहायचो. नंतर ग्राहकांची संख्या वाढली तसे वेळ वाचवण्यासाठी आम्ही एक कॅलक्युलेटिंग मशिन घेतले. तेही बरीच वर्षे वापरात होते. पण व्यवसायाच्या कार्यशैलीत आणि माझ्या विचारसरणीत बदलास माझ्या कौटुंबिक जीवनातील एक गंमतीचा प्रसंग कारणीभूत ठरला.

माझा मोठा मुलगा हृषिकेश शाळकरी वयात असताना एकदा त्याचे केस खूप वाढले होते. मी त्याला ते कापून घेण्यास सांगितले तेव्हा तो म्हणाला, “बाबा! मला केस कापण्यासाठी सलूनमध्ये फोन करुन अपॉइंटमेंट घ्यावी लागणार आहे.” या बोलण्याचा अर्थबोध न झाल्याने मी म्हणालो, “अरे! तुला सलूनमध्ये जायचंय, डॉक्टरकडे नव्हे. अपॉइंटमेंट कसली ठरवतोस? आपल्या नेहमीच्या सलूनमध्ये जा आणि २० दिऱ्हॅममध्ये केस कापून ये. मी गेली २० वर्षे तिथूनच केस कापून घेतोय.” मुलगा नजर टाळत म्हणाला, “मला ते आपले नेहमीचे सलून नकोय. माझे सर्व मित्र जेथे केस कापतात तिथेच मी जाणार आहे. त्या पॉश सलूनमध्ये खूप गर्दी असते. स्पेशल हेअरकटसाठी १०० दिऱ्हॅम घेतात, पण त्यासाठी अपॉइंटमेट घ्यावी लागते.”

ट्रेंडिंग न्यूज

“काय! १०० दिऱ्हॅम! म्हणजे पाचपट महाग?” मी ओरडलोच. “अरे! हे लोक वाटेल ते दर आकारताहेत आणि तुम्हाला बरी अशीच ठिकाणे सापडतात उधळपट्टी करायला!” त्यावर हृषिकेश शांतपणे म्हणाला, “बाबा! तुम्ही एकदा त्या सलूनमध्ये केस कापून बघाच म्हणजे तुम्हालाही समजेल, की तेथे गर्दी का असते ते.” मुलाच्या बोलण्याने माझ्याही मनात कुतूहल निर्माण होऊन मी त्या सलूनला भेट दिली. हृषिकेश खरेच सांगत होता. त्या सलूनची पूर्ण रचनाच ग्राहकांच्या गरजा आणि आराम लक्षात ठेऊन केली होती. सौंदर्यपूर्ण अंतर्रचना, कमालीची स्वच्छता आणि शांतता, मंद संगीत, प्रसन्न करणारा सुगंध, अत्याधुनिक यंत्रसामग्री, गणवेशधारी उच्च प्रशिक्षित केशकर्तनकार. सलून न वाटता ते एखाद्या कंपनीचे कार्यालयच वाटत होते. तेथे प्रत्येक ग्राहकाला कोणती केशरचना चांगली दिसेल, याचे मार्गदर्शनही केले जात होते.

मी अंतर्मुख झालो. प्रत्येकवेळी ‘जुने ते सोने’ विचारसरणीला चिकटून बसण्यात अर्थ नसतो तर वेळ ओळखून नव्याचा अंगीकार करणे फायद्याचे असते, हे मला उमगले. त्यानंतर मीही आमच्या साध्या दुकानांचे रुपांतर सुपर स्टोअर्समध्ये करण्याचा धडाका लावला. नवी दुकाने प्रशस्त जागी उघडू लागलो. ग्राहकांना स्वतः वस्तू निवडण्यास आणि हाताळण्यास आवडते, हे लक्षात घेऊन स्टोअर्समध्ये वस्तूंची मांडणी आटोपशीर, ग्राहकांना सोयीची आणि सौंदर्यपूर्ण केली. इंटेरियर डिझायनरना बोलवून त्यांच्या सल्ल्याने आकर्षक अंतर्रचना केली. बिलिंग सिस्टिम संगणकाधारित बनवली. त्यात बार कोड स्कॅनर्सचा वापर सुरु केला. ग्राहकांना खरेदीसाठी कार्ट्स आणि बास्केट्स उपलब्ध करुन दिल्या. आमची उत्पादने अस्सल, शुद्ध व सुरक्षित असावीत आणि मानवी स्पर्श न होता पॅकबंद स्वरुपात थेट ग्राहकांच्या हातात पडावीत, यासाठी अत्याधुनिक यंत्रसामग्री खरेदी करुन प्रकल्प उभारले. त्यात आंतरराष्ट्रीय गुणवत्तेचे निकष स्थापित केले. पूर्वी मी नव्या दुकानांचे उद्घाटन अगदी साध्या पद्धतीने करत होतो. परंतु ग्राहकांना मात्र उद्घाटनाच्या झगमगाटी समारंभाचे आकर्षण होते. उद्घाटनासाठी कुणी सेलिब्रिटी असला तर त्यांना हवा होता. मी हे लक्षात ठेऊन प्रत्येक उद्घाटनाला बॉलिवूडची नामवंत तारका बोलवू लागलो. या परिपाठाचा फायदा मला आजही होतो आहे.

मित्रांनो! जग आता सेलर्स मार्केटकडून बायर्स मार्केटकडे चालले आहे. ग्राहकांची गरजा, अपेक्षा व पसंती ओळखून उत्तम सेवा देण्यास कमालीचे महत्त्व आले आहे. एकेकाळी आमची अन्यत्र कुठेही शाखा नाही, अशी पाटी अभिमानाने मिरवली जायची. आजकाल ग्राहकांना त्यांच्या घराजवळ हे ब्रँड्स हवे असल्याने शाखा विस्तार ही काळाची गरज ठरली आहे. उत्पादने, तंत्रज्ञान, कामाची शैली, विचारसरणी, ग्राहकसेवा या सगळ्यांत परिवर्तन घडवून अभिनवता आणणारेच पुढील काळात यशस्वी होतील, हे निश्चित.

केशवसुतांच्या ‘तुतारी’ कवितेतील दोन ओळी मला पटतात.

जुने जाऊद्या मरणालागुनी, जाळुनी किंवा पुरुनी टाका

सडत न एका ठायी ठाका, सावध! ऐका पुढल्या हाका

 

(लेखक धनंजय दातार हे दुबईस्थित अदिल उद्योगसमूहाचे व्यवस्थापकीय संचालक आहेत.)

WhatsApp channel