Business Ideas : व्यवसाय उभारताना पत्नीची साथ घेणे आवश्यक का असते… जाणून घ्या-business ideas building business with the help of life partner ,बिझनेस बातम्या
मराठी बातम्या  /  बिझनेस  /  Business Ideas : व्यवसाय उभारताना पत्नीची साथ घेणे आवश्यक का असते… जाणून घ्या

Business Ideas : व्यवसाय उभारताना पत्नीची साथ घेणे आवश्यक का असते… जाणून घ्या

HT Marathi Desk HT Marathi
Aug 12, 2024 12:07 PM IST

business ideas - प्रत्येक स्त्रीमध्ये एक उद्योजिका सुप्त वसलेली असते. स्त्रियांना निसर्गतःच नेटके नियोजन, व्यवहारी वृत्ती, वास्तवाचे भान, व्यवस्थापकीय कौशल्य, दूरदृष्टी आणि संयम अशा गुणांची देणगी लाभलेली असते.

Business Ideas व्यवसाय उभारताना पत्नीची साथ अवश्य घ्या
Business Ideas व्यवसाय उभारताना पत्नीची साथ अवश्य घ्या

 

धनंजय दातार

‘प्रत्येक यशस्वी पुरुषाच्या मागे एक स्त्रीचा भक्कम हातभार असतो,’ या इंग्रजी म्हणीवर माझा पूर्ण विश्वास आहे, कारण माझ्या बाबांचा आणि माझा याबाबतचा अनुभव अगदी समान आहे. माझ्या बाबांनी निवृत्तीच्या उंबरठ्यावर व्यवसायाच्या अनोळखी क्षेत्रात उतरण्याचे धाडस केले आणि अनेक अडचणींवर मात करुन ते व्यवसायात यशस्वी झाले, पण त्या यशामागे माझ्या आईची भक्कम साथ कारणीभूत होती. पत्नीची उत्कृष्ट साथ मिळण्याबाबत मीही तसाच नशीबवान ठरलो.

विवाह झाल्यानंतर पहिल्याच आठवड्यात प्रवासाला जाताना माझी पत्नी सौ. वंदना हिने ज्या पद्धतीने आम्हा दोघांची बॅग भरली ते बघून मला तिच्यातील शिस्त, नियोजन आणि नीटनेटकेपणा हे गुण जाणवले. तिच्यातील सुप्त कर्तृत्वगुण ओळखून पुढे मी तिला माझ्या व्यवसायात सहभागी होण्याची संधी दिली. सुरवातीला या कृतीला माझ्या बाबांकडून विरोध झाला. अर्थात त्यामागे ‘स्त्रियांनी घरच्या व्यवसायात किंवा पुरुषांच्या कामात दखल देऊ नये’, असा सनातनी दृष्टीकोन नसून आमच्या संसाराबद्दलची काळजी होती. पती-पत्नी दोघेही व्यवसायात गुरफटले तर पुढे मुलांच्या संगोपनाकडे त्यांचे दुर्लक्ष होईल, असे बाबांना वाटत होते. पण मी माझ्या निर्णयावर ठाम राहून पत्नीला कंपनीत मदतीसाठी घेतले आणि तिच्याकडे कंपनीच्या वित्त संचालक पदाची जबाबदारी सोपवली. तिनेही माझा विश्वास सार्थ ठरवत आमच्या कंपनीच्या हिशेबाला शिस्त लावली. अनावश्यक खर्च कमी केले आणि अर्थव्यवहाराची उत्तम घडी बसवली. तिच्या कौशल्यामुळे चमत्कार असा घडला, की जागतिक मंदीच्या काळात जेव्हा बहुतेक उद्योगांना मागणी आणि उत्पन्न कमी होण्याचा फटका बसला तेव्हा आमची कंपनी मात्र तब्बल ४०० टक्के दराने प्रगती करत होती.

दुसरीकडे तिने मुलाबाळांच्या संगोपनात कमतरता राहण्याची माझ्या बाबांची शंकाही अनाठायी असल्याचे दाखवून दिले. कंपनीचे व्यवहार लीलया पार पाडताना तिने गृहिणीपदाची जबाबदारीही तितक्याच समर्थपणे निभावली. तिने कुटुंबातील कुणालाही काही कमी पडू दिले नाही. आमचा समूह कोट्यवधी रुपयांची उलाढाल करत असताना आणि घरी सुबत्ता असतानाही तिची जीवनशैली अगदी साधी आणि मध्यमवर्गीयच राहिली. मुलांनाही तिने शिस्तीने आणि संस्काराने मोठे केले. तिची समंजस साथ लाभल्यानेच मी यशस्वी होऊ शकलो. मी आजारपणामुळे मृत्यूच्या उंबरठ्यावर पोचलो होतो तेव्हा माझ्या पाठीवर दिलासा देणारा हात तिचाच होता. मी पत्नीचा सहयोग आयुष्यभर विसरलो नाही. आजही मी कोणताही पुरस्कार स्वीकारायचा असो, प्रकट मुलाखत द्यायची असो किंवा नव्या दुकानाचे उद्घाटन करायचे असो, प्रत्येक प्रसंगी पत्नीला सोबत नेतोच.

खरे तर स्त्रियांमध्ये कोणतीही गोष्ट शांतपणे विचारपूर्वक आखून घेऊन तडीस नेण्याचा महत्त्वाचा गुण निसर्गतःच असतो. त्यांना संधी दिली गेली तर त्या स्वतःला उत्कृष्ट व्यवस्थापक म्हणून सिद्ध करतात. आपल्या कुटुंबावर संकट आले तर महिला किती जिद्दीने ते परतवून लावतात याचे उदाहरण मी बघितले आहे. मुंबईत माझ्या घराजवळ एक बांधकाम व्यावसायिक राहायचा. त्याची कोट्यवधी रुपयांची येणे रक्कम थकली होती. ती वेळेवर वसूल होत नसल्याने तो काळजीत पडला होता. पत्नी व मुलगी हेच त्याचे कुटूंब असल्याने त्यांचे पुढे कसे होणार, या विचारानेच तो अगतिक झाला होता. चिंतेमुळे तो वारंवार आजारी पडू लागला. त्याची ती हताश अवस्था बघून अखेर त्याची पत्नी व मुलगी निश्चयाने पुढे सरसावल्या. त्या दोघींनी दोन आघाड्या वाटून घेतल्या. पत्नीने घरकाम आणि दैनंदिन व्यवहार उत्तम सांभाळले, तर मुलीने वडिलांच्या कंपनीची जबाबदारी अंगावर घेत स्वतः बाजारपेठेत जाऊन चतुराई आणि कौशल्याने सगळीच्या सगळी थकबाकी वसूल करुन दाखवली. यात उल्लेखनीय गोष्ट अशी, की हा व्यावसायिक अशा रुढीप्रिय समाजातील होता, जेथे स्त्रियांनी घरकामाखेरीज अन्य गोष्टींत दखल देणे नापसंत होते. पण वेळ येताच घरातील महिलांनीच पुढे होऊन व्यवसाय वाचवला.

मित्रांनो! आपली पत्नी अल्पशिक्षीत असो, की उच्चशिक्षीत तिच्यातील व्यवस्थापकीय कौशल्याला जरुर संधी द्या. जी स्त्री संसार उत्तम सांभाळू शकते ती व्यवसाय समर्थपणे का नाही सांभाळणार? पत्नी ही आपली सर्वांत जवळची विश्वासू मित्र असते, असे एका सुभाषितातही म्हटले आहे.

विद्या मित्रं प्रवासेषु भार्या मित्रं गृहेषु च।

व्याधितस्यौषधं मित्रं धर्मो मित्रं मृतस्य च॥

(प्रवासात तुम्ही शिकलेली विद्या मित्र असते. संसारात पत्नी तुमची मित्र असते. आजारात औषध मित्र असते आणि मृत्यूनंतर तुम्ही निभावलेला माणुसकी धर्मच मित्र उरतो.)

(लेखक धनंजय दातार हे दुबईस्थित अदिल उद्योगसमूहाचे व्यवस्थापकीय संचालक आहेत)