उद्योग-व्यवसाय करताना चुकूनही कुणाचाही स्वाभिमान दुखवू नका....-business ideas avoid hurting other peoples feeling ,बिझनेस बातम्या
मराठी बातम्या  /  बिझनेस  /  उद्योग-व्यवसाय करताना चुकूनही कुणाचाही स्वाभिमान दुखवू नका....

उद्योग-व्यवसाय करताना चुकूनही कुणाचाही स्वाभिमान दुखवू नका....

HT Marathi Desk HT Marathi
Aug 27, 2024 06:01 PM IST

do not hurt peoples feeling : हातात पैसा खुळखुळू लागल्यावर अनेकांच्या वागण्या-बोलण्यात फरक पडतो. ते आपल्याहून परिस्थितीने दुर्बळ अशा इतरांशी तुच्छतेने बोलू लागतात.

उद्योग व्यापारात कुणाचाही स्वाभिमान दुखवू नका
उद्योग व्यापारात कुणाचाही स्वाभिमान दुखवू नका

 

धनंजय दातार

भारतात एकदा आम्ही मित्र हॉटेलमध्ये गेलो होतो. आम्ही सँडविचची ऑर्डर दिली, पण ते तब्बल तासाभराने मिळाले. बिल देणाऱ्या आमच्या मित्राने सेवेतील विलंबाबद्दल नाराजी म्हणून बाऊलमध्ये मुद्दाम केवळ दोन रुपये टिप ठेवली. ते पाहून ऑर्डर सर्व्ह करणारी युवती एकदम उसकली आणि माझ्या मित्राला म्हणाली, ‘सर, मला टिप नकोय.’ त्यावर माझा मित्र उपरोधाने म्हणाला, ‘दहा मिनिटांत द्यायच्या सँडविचसाठी ग्राहकाला तासभर खोळंबून ठेवल्याबद्दल तुला किती रुपये टिप पाहिजे?’ त्यावर ती म्हणाली, ‘सँडविच देण्यात झालेल्या विलंबाबद्दल मी दिलगिर आहे, परंतु त्याचे कारणही सांगते.  सँडविचच्या ब्रेडला कुबट वास येऊन तो खराब झाल्याचे आमच्या कुकच्या लक्षात येताच त्याने साठ्यातील सगळा ब्रेड फेकून दिला आणि जवळच्या बेकरीमधून ताजा ब्रेड मागवून त्याची सँडविच बनवून तुम्हाला दिली. सेवेत उशीर झाला खरा, परंतु आम्हालाही ग्राहकांच्या आरोग्याची काळजी असते, हे तुम्हीही लक्षात घ्या.’ मी या वादात मित्राची कानउघाडणी केली. ‘तू एकवेळ टिप ठेवली नसतीस तरी तुझी नाराजी त्या मुलीने जाणली असती, परंतु तिच्या सेवेची किंमत दोन रुपये केल्याने स्वाभिमानाला ठेच पोचून ती रागावली. लक्षात घे, माणूस कितीही लहान सेवा देत असला तरी त्याचा स्वाभिमान आणि प्रतिष्ठा यांना दुखवू नये.’ माझे म्हणणे मित्राला पटले.

अशीच एक घटना आमच्या अदील सुपर स्टोअरमध्येही घडली होती. तेथे एक प्रामाणिक व कामसू फिलिपिनो ख्रिश्चन मुलगी कॅशियर होती. एक दिवस तिच्याबाबत एक विचित्र घटना घडली. दुबईत शुक्रवार हा साप्ताहिक सुट्टीचा दिवस असल्याने दुकानांमध्ये एरवीपेक्षा ग्राहकांची गर्दी जास्त असते. एका शुक्रवारी अशाच गर्दीत कुणी एक व्यक्ती बिलिंग काऊंटरपुढे या मुलीसमोर उभी राहिली आणि त्या व्यक्तीने काऊंटरवर थाप मारुन लक्ष वेधून घेत काही चौकशी केली. नंतर गर्दी आणि हिशेबाच्या नादात ती मुलगी तो प्रसंग विसरुन गेली. दिवसअखेरीस हिशेब जुळवताना तिच्या असे लक्षात आले की ड्रॉवरमधून जमा रकमेपैकी काही पैसे गायब झाले आहेत. ते कसे आणि कुणी घेतले असावे, हे तिला उमगत नव्हते. बरं ती रक्कमही तशी किरकोळ नव्हती तर जवळपास एक लाख रुपये किंमतीचे दिऱ्हॅम होते. दुकानातील इतर कर्मचारी तिच्याकडेच शंकेने बघायला लागले. ती बिचारी केविलवाणी होऊन घरी गेली. दुसऱ्या दिवशी ती तिच्या आईला घेऊन आली आणि झाल्या प्रकारात आपली काहीही चूक नसल्याचे परोपरीने सांगू लागली. 

आमच्या कंपनीचे मनुष्यबळ व्यवस्थापक (एचआर मॅनेजर) मात्र तिच्यावर विश्वास ठेवायला तयार नव्हते. अखेर हताश होऊन तिच्या आईने गहाळ रक्कम भरुन देण्याची तयारी दाखवली. त्यावर व्यवस्थापक महाशयांनी बोचक टिप्पणी केली, की पैसे लंपास केल्याचे उघडकीला येईल म्हणूनच आता ते परत करण्याचा आव आणतीय. या आरोपामुळे ती मुलगी संतापली. स्वाभिमानाला जबरदस्त ठेच बसल्याने तिने आमच्या कंपनीविरुद्ध कोर्टात धाव घेतली. कायद्यानुसार कंपनीचा मालक म्हणून मला न्यायालयात उभे राहावे लागले. हा वाद दोन्ही पक्षांनी सामंजस्याने मिटवावा, असा निर्णय कोर्टाने दिला.

मग मी स्वतःच त्या प्रकरणात लक्ष घातले. ती मुलगी आणि व्यवस्थापक यांना समोरासमोर बोलवून बाजू मांडायला लावली. मुलीने घडले होते तसे सांगितले, पण आमचे व्यवस्थापक मात्र बाजू मांडताना अडखळू लागले. ती मुलगी खरे बोलत असल्याचे मला पटले होते, कारण त्याच सुमारास नजरबंदी (हिप्नोटाईज) करुन कॅशियरकडून पैसे लंपास करण्याचे आणखी काही प्रकार अन्यत्र घडले होते.

मी तत्क्षणी त्या मुलीची कंपनीच्या वतीने माफी मागितली आणि व्यवस्थापकांना खोटे बोलण्याची शिक्षा म्हणून त्यांचे अधिकार कमी केले. न्याय मिळाल्याने त्या मुलीने माझे आभार मानलेच, परंतु नंतरही दरवर्षी ती ख्रिसमसला माझ्यासाठी आठवणीने फुलांच्या गुच्छासमवेत चॉकलेट्स आणू लागली. तिच्या स्वाभिमानी वृत्तीचे मला नेहमी कौतुक वाटत राहिले.

हे वाचाः ‘उद्योगमंत्र’मधील सर्व लेख वाचण्यासाठी येथे क्लिक करा

मित्रांनो, आपण नेहमी दुसऱ्याचा मान ठेवावा आणि स्वतःचाही राखून घ्यावा. एका सुभाषितात म्हटले आहे, की

अधमा धनमिच्छन्ति धनं मानं च मध्यमाः। 

उत्तमा मानमिच्छन्ति मानो हि महतां धनम् ॥ 

(कनिष्ठ मनोवृत्तीचे लोक धनाची इच्छा करतात, मध्यम मनोवृत्तीचे लोक धनासमवेत मान मिळण्याची इच्छा करतात, परंतु उत्तम वृत्तीचे लोक केवळ मान राखला जाण्याची इच्छा करतात कारण त्यांच्यासाठी मान हेच मोठे धन असते.

(लेखक धनंजय दातार हे दुबईस्थित अदिल उद्योगसमूहाचे व्यवस्थापकीय संचालक आहेत)