मी एकदा एका मित्राच्या दुकानात त्याला भेटायला गेलो होतो. नेमके त्याचवेळी माझा मित्र दुकानातील कामगारांची खरडपट्टी काढत होता. त्याचा चढलेला आवाज आणि रागीट आवीर्भाव बघून त्याचे कामगार चिडीचूप झालेच, पण दुकानातील ग्राहकही खरेदी घाईघाईने आटोपती घेत बाहेर पडले. मी कुतूहलाने मित्राला त्याच्या रागावण्याचे कारण विचारताच तो म्हणाला, “अरे! हे लेकाचे कामचुकार आहेत. पैशाला हात पुढे आणि कामाला पाय मागे अशी वृत्ती आहे. मी चिडलो तरच धावपळ करतात म्हणून मला हे नाटक करावे लागते.”
मी मित्राला समजावले, “दुकानात भांडणामुळे ग्राहक तुटतात व कामगारही दुरावतात. संतापामुळे तुझ्याच आरोग्यावर विपरीत परिणाम होईल. आपल्या रोजच्या तणावात रागीटपणाची भर पडल्यास उच्च रक्तदाब, मधुमेह, हृदयरोग अशा रोगांचा धोका निर्माण होतो. वेळीच सावध हो.” माझ्या मित्राला माझे म्हणणे पटले आणि नंतर तो दुकानात शांत राहू लागला.
व्यवसायात यशासाठी ‘डोक्यावर बर्फ आणि जिभेवर साखर’ म्हणजेच मनावर संयम आणि तोंडावर ताबा गरजेचा असतो, हा मोलाचा धडा माझ्या बाबांनी मला शिकवला. गंमतीची गोष्ट म्हणजे ते स्वतःच तापट होते, पण राग कुठे दाखवायचा आणि कुठे गुंडाळून ठेवायचा, याची उत्तम जाण त्यांना होती. घरी आमच्यासाठी ते कडक पालक होते, पण दुकानात मात्र ते व्यवहारी, गोड बोलणारे आणि शांत असत. दुबईतील आमच्या दुकानात येणाऱ्या विविध प्रांतांतील ग्राहकांशी बाबा सौजन्याने बोलून गप्पांच्या ओघात त्यांची आवड, ठिकठिकाणची लोकप्रिय उत्पादने, दर्जेदार उत्पादक अशी उपयुक्त माहिती मिळवत. कुणी भारतात जात असल्यास त्याला त्याच्या गावातील प्रसिद्ध उत्पादने आणायला सांगत. बाबांनी चातुर्याने जोडलेल्या या ग्राहकांचा फायदा मलाही पुढे झाला.
एकदा मी बाबांबरोबर मुंबईत मस्जिद बंदर येथे मसाले खरेदीसाठी गेलो होतो. परत येताना भोजनासाठी आम्ही एका हॉटेलमध्ये शिरलो. भोजनथाळी मिळण्याची वेळ जवळपास संपत आली होती, पण आमची ऑर्डर घेतली गेली. आम्ही भोजनाची वाट बघत असताना जवळच्या टेबलवरील एका माणसाचे वेटरशी भांडण सुरु झाले, कारण त्याला जेवणातील पापड खूप आवडल्याने त्याने आणखी पापडांची मागणी केली, पण हॉटेलमधील पापड संपल्याचे कारण सांगून वेटरने नकार दिला. त्यातून वादाची ठिणगी पडली. ‘एकवेळ जास्तीचे पैसे घ्या, पण मला पापड हवाच,’ असा हट्ट त्या ग्राहकाने धरला तर ‘तुम्हाला याआधीच जास्त पापड दिले आहेत, आता जेवणाची वेळ आणि पापड संपले आहेत,’ असा पवित्रा वेटरने घेतला. दुर्दैवाने हॉटेलचा मालकही वेटरची बाजू घेत त्या भांडणात उतरला आणि सुरवातीला शाब्दिक असलेला हा वाद हातघाईवर येण्याची चिन्हे दिसू लागली. या सगळ्या गडबडीत बाबा मध्येच उठून बाहेर कधी गेले ते मलाही कळले नाही. पाचच मिनिटांनी ते परत आले आणि त्यांनी हॉटेल मालकाला एका बाजूला घेऊन त्याच्या हातात एक पापडाचे पाकिट ठेवले आणि प्रथम ग्राहकाचे समाधान करण्यास सुचवले. पापड मिळाल्यावर त्या ग्राहकाचा राग निवळला आणि तो शांतपणे जेऊ लागला.
आम्ही जेवण संपवून बिल देण्यासाठी काऊंटरवर गेलो तेव्हा त्या हॉटेल मालकाने बाबांचे आभार मानले व पापडाच्या पाकिटाची किंमत देऊ केली. बाबा त्याला म्हणाले, “आजच्यासारखा प्रसंग पुन्हा घडू देऊ नका, असे एक व्यवसायबंधू म्हणून मी तुम्हाला सांगतो. पापडासाठी ग्राहक जादा पैसे द्यायला तयार असताना तुम्ही विनाकारण भांडण का वाढवलेत? पापड संपले तर शेजारच्या किराणा दुकानातून मागवून घ्यायचे. जो आपल्याला पैसे देतो त्याच्याशी भांडून काय मिळणार? चूक तुमची आहे कारण बोर्डवर नमूद केलेल्या वेळेदरम्यान मेनूतील कोणताही पदार्थ संपल्याची सबब तुम्हाला ग्राहकाला सांगता येणार नाही. प्रथम आलेल्याला जे वाढाल तेच शेवटच्या ग्राहकापर्यंत कायम ठेवा. पदार्थ संपले तर तत्क्षणी भोजन संपल्याचा बोर्ड लावा, पण ताटावर बसलेल्या ग्राहकाला नाराज करु नका.” बाबांच्या या लहानशा कृतीतून मी खूप शिकलो.
मित्रांनो, क्रोधाच्या दुष्परिणामाबाबत एक छान सुभाषित आहे.
क्रोधो हि शत्रुः प्रथमो नराणां देहस्थितो देहविनाशनाय।
यथा स्थितो काष्ठगतो हि वह्निः स एव वह्निः दहते शरीरम्॥
(अर्थ – संताप हा माणसाचा पहिला शत्रू आहे. लाकडातील सुप्त अग्नी पेटताच जसे त्या लाकडालाच जाळून टाकतो तसेच मनातील संतापाला हवा मिळताच तो भडकतो आणि शरीराचा विनाश घडवतो.)
संबंधित बातम्या