Ashok Leyland Share : वाहन निर्माता कंपनी अशोक लेलँडचा शेअर आज शेअर बाजारात जोरदार चर्चेत होता. कंपनीच्या शेअर्समध्ये आज ३.७ टक्क्यांची जोरदार वाढ झाली आणि हा शेअर २३०.४० रुपयांच्या उच्चांकी पातळीवर पोहोचला. शुक्रवारी हा शेअर २२२ रुपयांवर बंद झाला होता. शेअर्समधील या तेजीमागे सप्टेंबर तिमाहीचे निकाल आहेत.
हिंदुजा समूहाची फ्लॅगशिप कंपनी असलेल्या अशोक लेलँडनं चालू आर्थिक वर्षाच्या दुसऱ्या तिमाहीत ७६६.५५ कोटी रुपयांचा निव्वळ नफा कमावला आहे. गेल्या आर्थिक वर्षात याच तिमाहीत (जुलै-सप्टेंबर) कंपनीचा निव्वळ नफा ५५०.६५ कोटी रुपये होता.
अशोक लेलँडनं दिलेल्या माहितीनुसार, तिमाहीत कंपनीचे एकत्रित एकूण उत्पन्न ११२६१.८४ कोटी रुपयांवर पोहोचले आहे. मागील वर्षी याच तिमाहीत ते १०७५४.४३ कोटी रुपये होते. देशांतर्गत मध्यम आणि अवजड व्यावसायिक वाहन विभागात कंपनीचा बाजारातील वाटा ३१ टक्क्यांहून अधिक असल्याचे कंपनीने म्हटले आहे.
कंपनीचे व्यवस्थापकीय संचालक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी (सीईओ) शेनू अग्रवाल म्हणाले, 'आम्ही सातत्याने नफ्यावर लक्ष केंद्रित करत आहोत. उत्पादनांचा दर्जा सुधारतानाच खर्च कमी करून आणि ग्राहकांना उत्तम सेवेचा दर्जा देऊन नफा वाढवण्याचा आमचा प्रयत्न आहे. अशोक लेलँडचे करपूर्व उत्पन्न जुलै ते सप्टेंबर या तिमाहीत ११.६ टक्क्यांनी वाढून १,०१७ कोटी रुपयांवर पोहोचले आहे. अशोक लेलँडने जुलै ते सप्टेंबर २०२४ या तिमाहीत टिप्पर, बस, होलेज आणि लाइट कमर्शियल व्हेइकल सेगमेंटमध्ये विस्तार केला आहे.
मॉर्गन स्टॅनलीने दुसऱ्या तिमाहीच्या निकालानंतर अशोक लेलँडच्या शेअर्सची टार्गेट प्राइस २६८ रुपये केली आहे. याचा अर्थ ब्रोकरेजला अजूनही हा शेअर नोव्हेंबरच्या बंद किमतीपेक्षा २५% वाढण्याची अपेक्षा आहे. जेपी मॉर्गनचे अशोक लेलँडवर 'ओव्हरवेट' रेटिंग असून टार्गेट प्राइस २५० रुपये आहे. नोमुराने अशोक लेलँडवर आपल्या खरेदी रेटिंगचा पुनरुच्चार केला आहे, परंतु आर्थिक वर्ष २०२५ च्या चौथ्या तिमाहीपासून सकारात्मक वाढीचा कल अपेक्षित ठेवून लक्ष्य २४७ रुपयांवर आणले आहे.
अशोक लेलँडवर सीएलएसएचे अंडरपरफॉर्म रेटिंग असून त्याची टार्गेट प्राइस १८८ रुपये आहे. सिटीचे बाय रेटिंग असून टार्गेट प्राइस २६० रुपये आहे. अशोक लेलँडच्या शेअर्सवर जेफरीजचे होल्ड रेटिंग असून टार्गेट प्राइस २३५ रुपये आहे.