Budget Impact : नुकत्याच सादर करण्यात आलेल्या केंद्रीय अर्थसंकल्पात दीर्घकालीन भांडवली लाभ कराचे दर आणि कर गणनेच्या पद्धतीत मोठा बदल करण्यात आला आहे. याचा थेट परिणाम सोने-चांदी, म्युच्युअल फंड, शेअर बाजार आणि मालमत्तेत गुंतवणूक करणाऱ्यांवर होणार आहे.
भांडवली उत्पन्नावरील कर दर वाढविण्यात आला आहे, तर सोने, चांदी यावरील कस्टम ड्युटीमध्ये कपात करण्यात आली आहे. तसंच, इंडेक्सेशनचा लाभ पूर्णपणे रद्द करण्यात आला आहे. यामुळं कराचं गणित पूर्णपणे बदललं आहे. अशा परिस्थितीत नेमकी कुठं गुंतवणूक करावी, याबाबत गुंतवणूकदार संभ्रमात आहेत. सध्या गोल्ड ईटीएफ (Gold ETF) हा सर्वोत्तम पर्याय असल्याचं तज्ज्ञांचं म्हणणं आहे.
केंद्रीय अर्थसंकल्पात सोने आणि चांदीवरील सीमा शुल्क १५ टक्क्यांवरून ६ टक्के करण्यात आलं आहे. त्यामुळं सोन्या-चांदीच्या किंमतीत मोठी घसरण झाली आहे. २३ जुलैपासून सोन्याच्या दरात ५ हजार रुपयांनी घट झाली आहे. हा सोन्याचा भाव तोळ्यामागे ७०,७०० रुपयांपर्यंत घसरला आहे.तर, चांदीच्या दरातही ७ हजार रुपयांची घसरण झाली आहे. चांदीचा भाव किलोमागे ८४,४०० रुपये प्रति किलोपर्यंत खाली आला आहे. सर्वसामान्यांच्या आवाक्याबाहेर होत चाललेल्या या मौल्यवान धातूंच्या किमतीतील घसरण यापुढंही कायम राहू शकतो.
दीर्घकालीन भांडवली नफ्यावरील कराची गणना करण्यासाठी निश्चित करण्यात आलेला कालावधी ३६ महिन्यांवरून २४ महिन्यांपर्यंत कमी करण्यात आला आहे. त्यामुळं आता २४ महिने होल्ड केलेली मालमत्ता दीर्घकालीन गणली जाणार आहे. तसंच, दीर्घकालीन भांडवली लाभ कर (LTCG) १० टक्क्यावरून १२.५ करण्यात आला आहे.
सोने आणि सोन्याच्या दागिन्यांच्या विक्रीवर दीर्घकालीन भांडवली नफा कर मोजताना पूर्वी इंडेक्सेशनला परवानगी होती. याद्वारे महागाई निर्देशांकानुसार सोन्याची किंमत निश्चित करून त्यावर कर मोजला जात असे. त्यानंतर त्यावर २० टक्के कर आकारला जात असे. मात्र आता इंडेक्सेशन पद्धतच बाद करण्यात आली आहे. आता एकूण नफ्याच्या रकमेवर थेट १२.५ टक्के कर भरावा लागणार आहे.
सध्याच्या परिस्थितीत सोने आणि चांदीच्या ईटीएफमध्ये गुंतवणूक करणं हा एक चांगला पर्याय असल्याचं तज्ज्ञांचं म्हणणं आहे. याचं कारण सोन्या-चांदीच्या दागिन्यांच्या किमतीत आणखी घसरण होऊ शकते. जर एखाद्या गुंतवणूकदारानं यात गुंतवणूक केली आणि किंमती घसरल्या, तर त्याला पुन्हा त्यात पैसे गुंतवणे (सरासरी) कठीण होऊ शकतं. ईटीएफमध्ये मात्र अशी कोंडी होण्याची शक्यता नाही.
ईटीएफची किंमत दागिन्यांपेक्षा खूपच कमी असते. ईटीएफचे व्यवहार शेअर्सच्या धर्तीवर केले जातात. एका युनिटची किंमत ६० रुपयांपासून सुरू होऊ शकते. गुंतवणूकदार एकावेळी कितीही युनिट्स एकरकमी खरेदी करू शकतो. एकाच वेळी जास्त गुंतवणूक करणं जमत नसेल तर त्यासाठी एसआयपी सुविधा उपलब्ध आहे. म्हणजेच दर महिन्याला छोटी रक्कम गुंतवता येते. ईटीएफ युनिट्स शेअर्सप्रमाणे कधीही खरेदी आणि विक्री करता येतात. त्याचा मोठा फायदा असा की सोन्या-चांदीच्या किमती घसरल्यास ईटीएफच्या युनिटची किमत कमी होते. अशावेळी गुंतवणूकदार हे युनिट्स खरेदी करून अॅव्हरेज करू शकतात. त्यामुळं नुकसान होण्याची शक्यता कमी असते.
संबंधित बातम्या