अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी आज संसदेत अर्थसंकल्प सादर केला. आता यापुढे १२ लाख रुपयांपर्यंतच्या उत्पन्नावर इन्कम टॅक्स लागू होणार नसल्याची महत्वपूर्ण घोषणा अर्थमंत्र्यांनी आपल्या भाषणात केली आहे. अर्थमंत्र्यांच्या भाषणावर विरोधी पक्षाच्या खासदारांनी काही प्रश्न उपस्थित केले आहे. ‘अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी आपल्या भाषणादरम्यान देशात विकासाचे चार इंजिन असल्याचे सांगितले आहे. कृषी क्षेत्र, एमएसएमई, गुंतवणूक आणि निर्यात ही विकासाची चार पॉवर इंजिन असल्याचे सीतारामन म्हणाल्या. असे असले तरी अर्थसंकल्प मात्र पूर्णपणे कोलमडला आहे’ अशी टीका काँग्रेस सरचिटणीस, राज्यसभेचे खासदार जयराम रमेश यांनी शनिवारी केली.
रमेश म्हणाले, 'अर्थमंत्र्यांनी कृषी, एमएसएमई, गुंतवणूक क्षेत्र आणि निर्यात या चार इंजिनांचा उल्लेख केला. इंजिने इतकी झालीत की अर्थसंकल्प पूर्णपणे कोलमडला आहे, असं रमेश म्हणाले.
द्रमुक पक्षाचे खासदार दयानिधी मारन यांनी २०२५ चा अर्थसंकल्प अत्यंत निराशाजनक असल्याचे म्हटले आहे. संसदेबाहेर पत्रकारांशी बोलताना मारन म्हणाले, ‘दिल्लीसाठी मतदारांना आकर्षित करण्यासाठीच हा अर्थसंकल्प मांडलेला दिसतो. ५ फेब्रुवारी रोजी दिल्ली निवडणुकीसाठी हे नियोजन करण्यात आले आहे. १२ लाखरुपयांसाठी कर लागणार नाही असे अर्थमंत्र्यांनी सांगितलं. मग पुढे त्या म्हणाल्या की ८ ते १२ लाख रुपयांपर्यंत १०% चा टॅक्स स्लॅब असणार आहे. हे सोपे आणि सरळ नाहीए. हे अतिशय गोंधळात टाकणारे आहे. अर्थमंत्र्यांनी पुन्हा एकदा मध्यमवर्गाची फसवणूक केल्याचे यातून दिसून येत आहे. यावर्षी बिहारमध्ये निवडणुका आहेत. त्यामुळे केवळ बिहारमध्ये पायाभूत सुविधांचा विकास होताना दिसतो आहे. देशाच्या उर्वरित भागातील पायाभूत सुविधांच्या विकासाचे काय? तामिळनाडू किंवा दक्षिणेकडील इतर कोणत्याही राज्यांसाठी अर्थसंकल्पात एकही शब्द नव्हता’ असं मारन म्हणाले. सरकारने यापूर्वीच्या अर्थसंकल्पात खूप साऱ्या घोषणा केल्या होत्या. या अर्थसंकल्पात सुद्धा अनेक घोषणा केलेल्या दिसतात. पूर्वीच्या अर्थसंकल्पातील घोषणांवर काय अंमलबजावणी झाली, त्या घोषणांचे काय झाले, असा सवाल कॉंग्रेस खासदार कार्ती चिदंबरम यांनी केला.
काँग्रेस खासदार मनीष तिवारी म्हणतात, ' निर्मला सीतारामन यांनी संसदेत सादर केलेला अर्थसंकल्प हा भारत सरकारचा होता की बिहार सरकारचा अर्थसंकल्प होता, हे मला समजलं नाही? केंद्रीय अर्थमंत्र्यांच्या संपूर्ण अर्थसंकल्पीय भाषणात बिहारशिवाय दुसऱ्या राज्याचे नाव तुम्ही ऐकले आहे का? असा सवाल तिवारी यांनी केला.
संबंधित बातम्या