Budget Expectation: भारतातील रिटेल क्षेत्रात थेट गुंतवणूक वाढवण्यासाठी अनिवासी भारतीयांना प्रोत्साहन मिळावे
मराठी बातम्या  /  बिझनेस  /  Budget Expectation: भारतातील रिटेल क्षेत्रात थेट गुंतवणूक वाढवण्यासाठी अनिवासी भारतीयांना प्रोत्साहन मिळावे

Budget Expectation: भारतातील रिटेल क्षेत्रात थेट गुंतवणूक वाढवण्यासाठी अनिवासी भारतीयांना प्रोत्साहन मिळावे

Published Jan 30, 2024 11:50 AM IST

Budget Expectations for NRI : देशाचा अर्थसंकल्प १ फेब्रुवारी रोजी सादर होणार आहे. या अर्थसंकल्पापासून अनिवासी भारतीयांना अनेक अपेक्षा आहेत. भारतातील रिटेल क्षेत्रात थेट गुंतवणूक वाढवण्यात यावी अशी मागणी करण्यात आली आहे.

अदील ग्रुप ऑफ सुपरमार्केट्स कंपनीचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक डॉ. धनंजय दातार
अदील ग्रुप ऑफ सुपरमार्केट्स कंपनीचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक डॉ. धनंजय दातार

Budget Expectations for NRI : भारतीय अर्थव्यवस्थेला प्रचंड ताकद देण्याचे सामर्थ्य रिटेल क्षेत्रात आहे. परंतु सध्या भारतात या क्षेत्रात खूप कमी व्यावसायिक आहेत. जे आहेत ते अतिरिक्त करांच्या दडपणामुळे आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत सक्षमतेने स्पर्धा करु शकत नाहीत. यामुळे यावर उपाय म्हणून सरकारने हे व्यावसायिक व सर्वसामान्यांवरील करांचे ओझे कमी करून अनिवासी भारतीय तसेच आंतरराष्ट्रीय व्यावसायिकांना भारतातील रिटेल क्षेत्रात थेट गुंतवणूक करण्यासाठी प्रोत्साहन द्यावे, अशी अपेक्षा दुबई स्थित अदील ग्रुप ऑफ सुपरमार्केट्स कंपनीचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक डॉ. धनंजय दातार यांनी आगामी केंद्रीय अर्थसंकल्पाकडून व्यक्त केली आहे.

भारतीय नौदलाची मोठी कामगिरी! समुद्री चाच्यांच्या तावडीतून केली १९ पाकिस्तानी नागरिकांसह इराणच्या जहाजाची सुटका

दातार म्हणाले, “भारतीय रिटेल क्षेत्रापुढे एकाच वेळी संधी आणि आव्हाने उभी आहेत. कोविड साथीनंतरच्या काळात वस्तूंच्या किंमती वाढल्या. मात्र, त्या प्रमाणात सर्वसामान्यांचे उत्पन्न अथवा नोकरदारांचे पगार वाढलेले नाहीत. वाढत्या महागाईला तोंड देण्यासाठी लोक दैनंदिन गरजेच्या वस्तूंच्या वापरात कपात करु लागले आहेत. ज्याचा परिणाम उत्पादनांचा खप कमी होण्यात दिसून येत आहे. सरकारने हे करांचे दर कमी करुन वैयक्तिक करदात्यांना दिलासा दिल्यास त्यांच्या मासिक उत्पन्नाचा अधिक भाग ते खरेदीवर खर्च करु शकतील आणि उत्पादनांचा खप पुन्हा वाढेल. त्याचवेळी रिटेल क्षेत्रातील व्यावसायिकांवरही उच्च करांचे दडपण असल्याने ते अडचणीत आले आहेत. त्यांना आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत स्पर्धा करणे कठीण होत आहे. म्हणूनच रिटेल क्षेत्र अर्थसंकल्पाकडे मोठ्या आशेने पाहात आहे.”

BKC Plot to ED : ईडीला मिळणार हक्काची जागा! मुंबई कार्यालयासाठी बीकेसीत तब्बल ३६२ कोटींंचा भूखंड

ते पुढे म्हणाले, “भारतातील प्रचंड लोकसंख्येच्या तुलनेत तसेच रिटेल बाजारपेठही प्रचंड उलाढालीची असताना या क्षेत्रात व्यावसायिकांची संख्या अद्यापही पुरेशी नाही. त्यामुळे भारतीय परदेशात जाऊन व्यवसाय करतात पण देशात मात्र मोठ्या प्रमाणावर रोजगार निर्मिती होत नाही परदेशांच्या तुलनेत स्थानिक वेतनमानही आकर्षक नसते. यावर उपाय म्हणून सरकारने अनिवासी भारतीय व आंतरराष्ट्रीय व्यवसायांना भारतीय रिटेल क्षेत्रात आकर्षित करुन कर सवलती दिल्यास तसेच परकी थेट गुंतवणुकीस (एफडीआय) प्रोत्साहन दिल्यास येथे नव्या नोकऱ्या आणि प्रत्यक्ष व अप्रत्यक्ष रोजगार निर्माण होतील, कर्मचाऱ्यांना चांगले वेतनही मिळेल आणि व्यावसायिकांची संख्या वाढल्यास स्पर्धात्मकतेमुळे वस्तूंच्या किंमती कमी होऊन सर्वसामान्यांना वस्तू स्वस्तात मिळतील.अनेक अनिवासी भारतीय जगभरात उत्तम व्यवसाय करतात, पण भारतात गुंतवणुकीस राजी होत नाहीत. हे चित्र बदलणे गरजेचे आहे.”

 

भारतातील रीटेल क्षेत्रात प्रचंड सुप्त सामर्थ्य आहे आणि आगामी काळ भारतासाठी अत्यंत आश्वासक आहे, असे स्पष्ट करत डॉ. दातार म्हणाले, की काही वर्षांपूर्वी भारत खरेदीदारांची बाजारपेठ होता. यात बदल होऊन आज विक्रेत्यांची बाजारपेठ बनला आहे. जगातील अनेक देश भारतीय अन्नधान्य, कृषी व अन्य उत्पादने तसेच सेवांकडे डोळे लावून बसले आहेत. आपण या बाजारपेठेची परिसंस्था (इकोसिस्टिम) परिपूर्ण विकसित करु शकलो तर त्याचा फायदा भारतीय अर्थव्यवस्था उद्दिष्टापेक्षा फार लवकर आर्थिक महासत्ता बनण्यात होईल, असेही दातार म्हणाले.

Whats_app_banner