केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी आज वैयक्तिक करदात्यांना दिलासा देताना १२ लाखांपर्यंतचं उत्पन्न करमुक्त करण्याची घोषणा केली. म्हणजेच, १२ लाखांच्या उत्पन्नावर आता शून्य टॅक्स लागणार आहे. त्याचवेळी, सीतारामन यांनी नवीन टॅक्स स्लॅबच्या दरातही बदल केले आहेत. मात्र, या स्लॅबमुळं काही जणांचा गोंधळ उडाला आहे.
सीतारामन यांनी अर्थसंकल्पात जाहीर केलेल्या नवीन स्लॅब दरांमध्ये केवळ ४ लाखांपर्यंतचं उत्पन्न करमुक्त दिसत आहे. त्यापुढील ४ ते ८ लाखांवरच्या उत्पन्नावर ५ टक्के आणि ८ ते १२ लाखापर्यंतच्या उत्पन्नावर १० टक्के कर दिसत आहे. मग १२ लाखांपर्यंतचं उत्पन्न करमुक्त कसा असा प्रश्न सर्वसामान्यांकडून विचारला जात आहे. मात्र, नव्या रचनेत टप्पानिहाय करात कपात करण्यात आल्यामुळं विविध सवलतींनंतर १२ लाखांपर्यंतच्या उत्पन्नावर काहीच कर भरावा लागत नाही असं ते गणित आहे.
नवीन कर टप्पे आणि इतर आकडेवारीवरून सविस्तर समजून घेऊ…
० ते ४ लाख - शून्य
४ ते ८ लाख - ५ टक्के
८ ते १२ लाख - १० टक्के
१२ ते १६ लाख - १५ टक्के
१६ ते २० लाख - २० टक्के
२० ते २४ लाख - २५ टक्के
२४ लाखांपेक्षा जास्त - ३० टक्के
जर तुमचं उत्पन्न १२,७५,००० रुपये असेल तर तुमचा कर शून्य असेल. आतापर्यंत तो ८० हजार रुपये होता. नव्या करदरामुळं व सवलतींमुळं तो शून्य असेल.
जर तुमचं वेतन उत्पन्न १५.७५ लाख रुपये असेल तर तुमचा कर १.०५ लाख रुपये असेल. याआधी तो १.४ लाख रुपये होता. म्हणजेच आणखी ३५,००० रुपयांची बचत होणार आहे.
जर तुमचं पगाराचं उत्पन्न २५,७५,००० रुपये असेल तर तुमचा कर खर्च ४.४ लाख रुपयांवरून ३.३ लाख रुपये होईल. त्यातून १.१० लाख रुपयांची बचत होईल.
१२ लाखांपर्यंत : एखाद्या करदात्याचं उत्पन्न १२ लाख रुपयांपर्यंत असेल तर अशा करदात्यांना (भांडवली नफ्यासारख्या विशेष दराचं उत्पन्न वगळता) नव्या स्लॅब दर कपाती व्यतिरिक्त वेगळी सवलत मिळणार आहे. त्यामुळं त्याला कोणताही कर भरावा लागणार नाही.
नव्या व्यवस्थेत १२ लाख रुपयांचं उत्पन्न असलेल्या करदात्याला ८०,००० रुपयांचा करलाभ मिळणार आहे. (जो सध्याच्या दरानुसार देय कराच्या १०० टक्के इतका आहे).
सध्या २५ हजार रुपये असलेली करसवलत वाढवून ६० हजार रुपये करण्यात आली आहे. पगारदारांसाठी १२.७५ लाख रुपयांपर्यंत आयकर लागणार नाही, कारण ७५,००० रुपयांचं स्टँडर्ड डिडक्शन आहे,' अशी माहिती दिल्लीतील पीडी गुप्ता अँड कंपनी या कंपनीच्या भागीदार सीए प्रतिभा गोयल यांनी दिली.
१८ लाख रुपयांपर्यंत : १८ लाख रुपये उत्पन्न असलेल्या व्यक्तीला ७०,००० रुपये कर (सध्याच्या दरानुसार देय कराच्या ३० टक्के) लाभ मिळेल.
२५ लाख रुपयांपर्यंत : २५ लाख रुपये उत्पन्न असलेल्या व्यक्तीला १,१०,००० रुपये (सध्याच्या दरानुसार देय कराच्या २५ टक्के) लाभ मिळेल.
संबंधित बातम्या