Union Budget 2025 : देशाचा सर्वसाधारण अर्थसंकल्प येत्या १ फेब्रुवारी रोजी मांडला जाणार आहे. मोदी सरकारनं सत्तेत आल्यापासून रेल्वे विकासावरील खर्च मोठ्या प्रमाणात वाढला आहे. यंदाच्या अर्थसंकल्पात रेल्वेवरील खर्चात मोठी वाढ होऊ शकते. त्यासाठीची तरतूद ३ लाख कोटींच्या वर जाण्याची शक्यता आहे.
केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन भारतीय रेल्वेच्या पायाभूत सुविधांचं आधुनिकीकरण आणि रेल्वे नेटवर्कच्या विस्तारासाठी तसंच, सेमी हायस्पीड ट्रेन वंदे भारत, वंदे भारत स्लीपर, अमृत भारत आणि वंदे मेट्रोच्या उभारणीसाठी मोठी तरतूद करण्याची शक्यता आहे.
रेल्वे बोर्डाच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्यानं दिलेल्या माहितीनुसार, सन २०२४-२५ च्या सर्वसाधारण अर्थसंकल्पात रेल्वेसाठी २ लाख ६५ हजार कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली होती. यंदा सरकार बजेट वाढवून तीन लाख कोटींहून अधिक करण्याची शक्यता आहे. अमृत चतुष्कोणीय (ताशी १६० ते २४० किमी) प्रकल्प सरकारच्या आर्थिक मदतीनं प्रस्तावित १६,९०० किमी डेडिकेटेड सेमी हायस्पीड कॉरिडॉरअंतर्गत पुढं नेला जाणार आहे.
दिल्ली, कोलकाता, मुंबई, चेन्नई, हैदराबाद, जम्मू-काश्मीर, बेंगळुरू ही शहरं सेमी हाय स्पीड कनेक्टिव्हिटीनं जोडली जातील. या शहरांदरम्यान वंदे भारत, वंदे भारत स्लीपर, अमृत भारत ट्रेन चालवता येतील. याशिवाय सध्या अस्तित्वात असलेल्या रेल्वे मार्गांचं विद्युतीकरण, नूतनीकरण, गेज रूपांतरण, नवीन रेल्वे मार्ग, दुहेरीकरण, तिहेरीकरण आदींचा विस्तार करण्यात येणार आहे.
रेल्वे गाड्यांचा वेग वाढविण्यासाठी रुळाचं अद्ययावतीकरण करण्यात येणार असून, सध्याच्या रेल्वेचा वेग वाढविण्याबरोबरच नवीन पॅसेंजर ट्रेन चालवता येणार आहे. सर्वसाधारण अर्थसंकल्पात मिळालेल्या आर्थिक मदतीतून २६० हून अधिक वंदे भारत स्लीपर, ५०४ हून अधिक वंदे भारत (चेअर कार), ११० अमृत भारत गाड्या (पुल-पुश) आदींची निर्मिती केली जाणार आहे.
मेल-एक्स्प्रेस गाडी ताशी जास्तीत जास्त ११० किमी वेगानं चालविण्यासाठी ५४,३३७ किमी रेल्वे मार्गाच्या अद्ययावतीकरणाच्या कामाला गती देण्यात येणार आहे. ताशी १३० किमी वेगानं २१ हजार ८१३ किलोमीटर लांबीच्या रेल्वे रुळांवर कुंपण घालण्यात येणार आहे. सर्वसाधारण अर्थसंकल्पातून मिळालेल्या निधीमुळं या विकासकामांना गती मिळणार आहे.
संबंधित बातम्या