Income Tax Expectations from Budget 2024 : लोकसभा निवडणुकीला अवघे काही महिने शिल्लक असताना सादर होत असलेल्या अंतरिम अर्थसंकल्पाबाबत सर्वांनाच उत्सुकता आहे. 'केअर रेटिंग' या संस्थेनं अर्थसंकल्पापूर्वी केलेल्या सर्वेक्षणातून अनेक गोष्टी समोर आल्या आहेत. इन्कम टॅक्समधील सवलतींबाबतही लोकांनी मतं व्यक्त केली आहेत.
'केअर रेटिंग'नं उद्योगाशी संबंधित १२० प्रमुख लोकांकडून अभिप्राय मागवला आहे. प्राप्तिकरातील सवलतीबाबत लोकांना फारच कमी आशा आहेत. प्राप्तिकरात कुठलीही सूट मिळणार नाही, असं मत ६३ टक्के लोकांनी व्यक्त केलं आहे, तर इन्कम टॅक्समध्ये सूट मिळू शकते, असं ३७ टक्के लोकांचं मत आहे. जगातील काही देशात सुरू असलेली युद्धे हे अर्थसंकल्पासमोरील सर्वात मोठं आव्हान आहे, असं मत ५५ टक्के लोकांनी व्यक्त केलं आहे.
नोकऱ्यांमधील वाढ हा धोका असल्याचं २५ टक्के लोकांचं मत आहे. निर्यातीत झालेली घट १३ टक्के लोकांना चिंताजनक वाटते. तर, ८ टक्के लोक ग्रामीण भागातील समस्या अर्थसंकल्पापुढील आव्हान असल्याचं मानतात.
उद्योगपतींच्या मागण्यांबाबत ५७ टक्के लोकांनी मत मांडलं आहे. सरकारनं रोजगार वाढवण्यासाठी उपाययोजनांवर भर दिला पाहिजे. तर, देशातील उत्पादन क्षमता वाढवण्यावर सरकारनं भर द्यायला हवा, असं मत ४६ टक्के लोकांनी मांडलंय.
व्यवसायाला मदत करण्यासाठी सरकारनं उपाययोजना करायला हव्यात असं ४३ टक्के लोकांना वाटतं. तर, व्यापारी निर्यातीला बळ द्यायला हवं, अशी मागणी २८ टक्के लोकांनी केली आहे.
सरकार क्षमता विस्तारावर लक्ष केंद्रीत करेल, असा विश्वास व्यावसायिकांनी व्यक्त केला आहे. व्यावसायिकांना भू-राजकीय घडामोडींची चिंता सतावत आहे. तसंच, रोजगार घटण्याचीही शक्यता आहे.
अर्थसंकल्प सकारात्मक असेल असं मत ८६ टक्के लोकांनी व्यक्त केलं आहे. उत्पादन व अन्य विविध क्षेत्रातील क्षमता विस्ताराबाबत ३० टक्के लोक आशावादी आहेत. क्षमता विस्तारावर गेल्या वर्षीच्या १० लाख कोटींच्या तुलनेत यंदा १३ लाख कोटी रुपयांपेक्षा जास्त तरतूद केली जाईल, अशी अपेक्षा व्यावसायिकांनी व्यक्त केली आहे. तर ही रक्कम सुमारे १० ते ११.५ लाख कोटी रुपये असू शकते, असं मत ३० टक्के लोकांनी व्यक्त केलं आहे. बजेट नकारात्मक असू शकतं, असं एक टक्का लोकांना वाटतं.