यंदाचं २०२४ हे लोकसभा निवडणुकीचं वर्ष असणार आहे. निवडणुकीपूर्वी पुढील फेब्रुवारी महिन्यात या सरकारचा शेवटचा अर्थसंकल्प संसदेत सादर केला जाणार आहे. आगामी बजेटमध्ये काय महत्वाच्या घोषणा केल्या जाऊ शकतात किंवा कोणत्या सेक्टरला अधिक निधी मिळू शकते, याविषयी मोतीलाल ओसवाल एएमसीचे फंड मॅनेजर संतोष सिंह यांच्याशी केलेली ही बातचित.
२०२४ चा हा अर्थसंकल्प हा अंतरिम असेल. पूर्ण अर्थसंकल्पापूर्वीचा हा अर्थसंकल्प असल्याने यातून मला फार महत्त्वाच्या घोषणांची अपेक्षा नाही. मात्र, अर्थसंकल्पातील भाष्य आणि हेतू यावर मी लक्ष केंद्रित करेन. सरकारने भांडवली खर्च, उत्पादन आणि विकास यावर जे लक्ष केंद्रित केले आहे, ते यापुढेही सुरूच राहिल, अशी माझी अपेक्षा आहे. सरकारने धोरण राबवण्यामध्ये सातत्य राखलं तर बाजाराला भविष्याचा दृष्टिकोन तयार करण्यात मदत होईल, असं मला वाटते.
बाजारात चढ दिसून येण्याची तीन कारणे आहेत १) अर्थव्यवस्थेत चांगली वाढ होत आहे. २) व्याजदरवाढ संपुष्टात आल्याने अमेरिकेचे मॅक्रोज चांगले होताना दिसत आहेत क) सध्या देशात राजकीय परिस्थितीबाबत स्पष्टता दिसून येत आहे. चालू वर्षाच्या तुलनेत पुढील वर्षात आर्थिक वाढ ही मध्यम गतीची राहील, असं मला वाटतं.
गेल्या वर्षी उत्पादन क्षेत्र, भांडवली मालमत्ता, ऑटोमोबाइल, ऊर्जा आणि सार्वजनिक क्षेत्रातील उपक्रम (Public Sector Undertakings) या क्षेत्रांमध्ये सर्वोत्तम कामगिरी पहायला मिळाली. या क्षेत्रात सरकारी मोठ्या प्रमाणावर भांडवल गुंतवत असून ते लक्षात घेता पुढेही कामगिरी उत्तम राहिल असा माझा अंदाज आहे.
आर्थिकदृष्ट्या पुढील वर्ष हे मध्यम राहील अशी माझी अपेक्षा आहे. असे असले तरी व्याजदर शिगेला पोहोचले आहे, हे लक्षात ठेवायला हवं. मात्र यावर्षी माहिती तंत्रज्ञान क्षेत्र (IT Sector) बहुतेक अपेक्षेपेक्षा अधिक कामगिरी करू शकेल असे मला वाटते.
विद्यमान सरकारलाच निवडणुकीत बहुमत मिळेल या अपेक्षेनेच बाजारामध्ये उलाढाल सुरू आहे. तसे झाल्यास आत्ताच्या बाजाराच्या अपेक्षांशी ते जुळणारे असेल. प्रचलित मूल्यांकनामुळे अर्थव्यवस्था वाढीचे व्यापक निर्देशांक एका मर्यादेतच राहतील असा माझा अंदाज आहे.
अल्पकालीन घडामोडींचा परिणाम होऊ न देता दीर्घकालीन गुंतवणूक करण्यावर आमचा विश्वास आहे. कोणताही गुंतवणूकदार केवळ इनपुटवर नियंत्रण ठेवू शकतो. वाजवी किंमतीत चांगल्या प्रशासनासह उच्च ईपीएस ग्रोथ असणाऱ्या, उत्तमरित्या चालविल्या जाणाऱ्या कंपन्या शोधून त्यात गुंतवणूक करू शकता. त्यामुळे कंपन्यांचा पाया भक्कम असल्यास शेअरच्या किमतीतील अल्पकालीन घडामोडींमुळे चिंतीत होण्याचे कारण नाही.
संबंधित बातम्या