Union Budget 2024 : भाजपप्रणित एनडीए सरकारच्या तिसऱ्या कार्यकाळातील पहिला पूर्ण अर्थसंकल्प केंद्रीय मंत्री निर्मला सीतारामन पुढील आठवड्यात सादर करणार आहेत. देशातील विविध क्षेत्रांचं लक्ष या अर्थसंकल्पाकडं लागलं आहे. विविध वर्गांकडून अपेक्षा व्यक्त केल्या जात आहेत.
केंद्र सरकारच्या मनात नेमकं काय आहे हे २३ जुलैला समजू शकणार आहे. मात्र, अर्थसंकल्प हा अनेकांच्या उत्सुकतेचा विषय असतो. तो अभ्यासकांसाठी जितका महत्त्वाचा असतो, तितकाच सर्वसामान्यांसाठीही. या सगळ्या पार्श्वभूमीवर केंद्रीय अर्थसंकल्पाविषयी काही गोष्टी जाणून घेणं सर्वांसाठीच महत्त्वाचं आहे. कोणत्या आहेत या गोष्टी?
स्वतंत्र भारताचा पहिला अर्थसंकल्प २६ नोव्हेंबर १९४७ रोजी देशाचे पहिले अर्थमंत्री आर. के. षण्मुखम चेट्टी यांनी सादर केला.
सर्वात मोठ्या अर्थसंकल्पीय भाषणाचा विक्रम विद्यमान अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांच्या नावे आहे. त्यांनी १ फेब्रुवारी २०२० रोजी तब्बल दोन तास ४० मिनिटं अर्थसंकल्पीय भाषण केलं होतं. दोन पानं शिल्लक असताना सीतारामन यांना आपलं भाषण थांबलं होतं. अर्थसंकल्पात त्यांनी नवीन आयकर स्लॅब आणि एलआयसी आयपीओची घोषणा केली. मात्र, शब्दसंख्येचा विचार करता १९९१ मध्ये माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांनी १८,६५० शब्दांचं सर्वात प्रदीर्घ अर्थसंकल्पीय भाषण केलं होतं.
हिरुभाई मुल्जीभाई पटेल यांचं १९७७ सालचं अंतरिम अर्थसंकल्पीय भाषण हे आतापर्यंतचं केवळ ८०० शब्दांचं सर्वात लहान भाषण होतं.
सर्वाधिक १० अर्थसंकल्प सादर करण्याचा विक्रम सध्या माजी पंतप्रधान मोरारजी देसाई यांच्या नावावर आहे. त्यातील सहा अर्थसंकल्प त्यांनी सलग मांडले होते. सलग अर्थसंकल्प मांडण्याचा त्यांचा हा विक्रम यंदा निर्मला सीतारामन मोडतील.
१९९९ पर्यंत फेब्रुवारीच्या शेवटच्या दिवशी संध्याकाळी ५ वाजता संसदेत अर्थसंकल्प सादर केला जात असे. १९९५ मध्ये पहिल्यांदा हिंदी आणि इंग्रजी या दोन्ही भाषांमध्ये अर्थसंकल्प छापण्यात आला. कोव्हिड-१९ च्या काळात अर्थसंकल्प पेपरलेस स्वरूपात आला. २०१७ मध्ये रेल्वे अर्थसंकल्पाचा केंद्रीय अर्थसंकल्पात समावेश करण्यात आला.
संबंधित बातम्या