Budget 2024 impact on share market : गेल्या काही दिवसांपासून वरच्या दिशेनं धावणारा शेअर बाजार आज अचानक मोठ्या प्रमाणावर कोसळला. त्याला कारण होतं केंद्रीय मंत्री निर्मला सीतारामन यांनी सादर केलेला अर्थसंकल्प. त्यांचं भाषण सुरू असतानाच सेन्सेक्स व निफ्टीनं गटांगळ्या खायला सुरुवात केली. करांच्या संदर्भातील घोषणा त्यासाठी कारणीभूत ठरली.
निर्मला सीतारामन यांनी अर्थसंकल्पीय भाषणात भांडवली नफ्यावरील कर वाढविण्याची घोषणा केली. दीर्घकालीन भांडवली नफ्यावरील करात २.५ टक्के तर, अल्पकालीन भांडवली नफ्यावरील करात ५ टक्के वाढ करण्यात आली आहे. त्याचा थेट परिणाम गुंतवणूकदारांवर होणार आहे. याचे पडसाद शेअर बाजारात उमटले आणि सेन्सेक्स आणि निफ्टी प्रत्येकी २ टक्क्यांनी घसरले. काही वेळानंतर ते पुन्हा सावरले.
भारतीय शेअर बाजारात आज घसरण होण्याची दोन प्रमुख कारणे आहेत:
ट्रेडिंगला लगाम घालण्यासाठी सीतारामन यांनी सुरक्षा व्यवहार कराचा (STT) दर अनुक्रमे ०.०२ टक्के आणि ०.१ टक्के करण्याची घोषणा केली. या अर्थसंकल्पीय प्रस्तावाची अंमलबजावणी केल्यानंतर इक्विटी आणि इंडेक्स व्यापाऱ्यांना त्यांच्या व्यापारासाठी दुप्पट कर भरावा लागणार आहे. सिक्युरिटीजच्या फ्युचर्स आणि ऑप्शनवरील सिक्युरिटी ट्रान्झॅक्शन टॅक्स अनुक्रमे ०.०२ टक्के आणि ०.१ टक्के करण्याचा प्रस्ताव आहे. दुसरं म्हणजे शेअर्सच्या बायबॅकवर मिळणाऱ्या उत्पन्नावर कर लावण्याची घोषणा सीतारामन यांनी केली आहे.
सर्व वित्तीय आणि बिगर वित्तीय मालमत्तेवरील दीर्घकालीन भांडवली नफ्यावरील (LTCG) कर १० टक्क्यांवरून १२.५ टक्के कर करण्यात आला आहे. तर, वित्तीय मालमत्तेवरील अल्पमुदतीच्या नफ्यावर १५ टक्क्यांवरून २० टक्के कर करण्यात आला आहे.
एलटीसीजी करातील वाढ मोठी नसून त्याचा बाजारावर फारसा परिणाम होण्याची गरज नाही, असं मत तज्ज्ञांनी व्यक्त केलं आहे. 'कराचा हा फटका फार मोठा नाही. तसंच, कर सवलत एक लाख रुपयांवरून सव्वा लाख रुपयांपर्यंत सूट वाढवण्यात आली आहे. एलटीसीजी १५ टक्के किंवा २० टक्क्यांपर्यंत वाढवला जाईल, अशी भीती व्यक्त केली जात होती. मात्र, तो केवळ १२.५ टक्क्यांवर गेला आहे. एकंदरीतच हा अर्थसंकल्प बाजारासाठी चांगला आहे,' असं जिओजित फायनान्शियल सर्व्हिसेसचे चीफ इन्व्हेस्टमेंट स्ट्रॅटेजिस्ट व्ही. के. विजयकुमार म्हणाले. वित्तीय तूट ४.९ टक्क्यांवर आणण्यासाठी सरकारनं वित्तीय दृष्ट्या विवेकी राहून आरबीआयच्या लाभांशाचा मोठा हिस्सा वापरला आहे, हे सकारात्मक असल्याचं ते म्हणाले.
संबंधित बातम्या