Avanti Feeds Share price : कोळंबी व्यवसायाशी संबंधित कंपन्यांचे शेअर सध्या सैराट सुटले आहेत. केंद्रीय अर्थसंकल्प सादर झाल्यानंतर उसळलेले हे शेअर आजही तेजीत होते. या कंपन्यांचे समभाग २० टक्क्यांपर्यंत वधारले आहेत. अर्थसंकल्पातील मोठ्या घोषणेनंतर कंपन्यांच्या शेअर्समध्ये ही वाढ झाली आहे.
अवंती फीड्स, वॉटरबेस लिमिटेड, अपेक्स फ्रोजन फूड्स, जील अॅक्वा आणि मुक्का प्रोटीन्सचे समभाग बुधवारी २० टक्क्यांपर्यंत वधारले आहेत. गेल्या काही वर्षांत अवंती फीड्सच्या शेअरमध्ये ६१ हजार टक्क्यांहून अधिक वाढ झाली आहे. या काळात अवंती फीड्सचा शेअर १ रुपयांवरून ७५० रुपयांपर्यंत वाढला आहे.
गेल्या १५ वर्षांत अवंती फीड्सच्या शेअरमध्ये ६१००० टक्क्यांहून अधिक वाढ झाली आहे. कोळंबी व्यवसाय करणाऱ्या अवंती फीड्सचा शेअर ३१ जुलै २००९ रोजी १.२३ रुपयांवर होता. २४ जुलै २०२४ रोजी अवंती फीड्सचा शेअर १७ टक्क्यांनी वधारून ७५६ रुपयांवर पोहोचला आहे. गेल्या वर्षभरात या शेअरमध्ये ९० टक्क्यांहून अधिक वाढ झाली आहे. तर, गेल्या ५ दिवसांत २५ टक्क्यांहून अधिक वाढ झाली आहे.
सीफूड इंडस्ट्री कंपनी वॉटरबेस लिमिटेडचा शेअर बुधवारी २० टक्क्यांनी वधारून १०२.१८ रुपयांवर पोहोचला. त्याचवेळी अपेक्स फ्रोजन फूड्स लिमिटेडचा शेअरही २० टक्क्यांनी वधारून ३११.७५ रुपयांवर पोहोचला आहे. कंपनीच्या शेअरनं बुधवारी ५२ आठवड्यांचा नवा उच्चांक गाठला. सीफूड व्यवसायाशी संबंधित जील अॅक्वा या कंपनीचा समभागही १० टक्क्यांनी वधारून १५.३५ रुपयांवर पोहोचला आहे.
कोळंबी शेतीसाठी केंद्र सरकार मदत करेल, अशी घोषणा अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी आपल्या अर्थसंकल्पीय भाषणात केली आहे. कोळंबीच्या वाढीसाठी न्यूक्लियस ब्रीडिंग सेंटरचे जाळे तयार करण्यासाठी आर्थिक मदत केली जाईल. कोळंबीची शेती, प्रक्रिया आणि निर्यातीसाठी नाबार्डच्या माध्यमातून अर्थसाहाय्य केलं जाईल, असं अर्थमंत्र्यांनी सांगितलं आहे. त्याचा थेट परिणाम कंपन्यांच्या शेअरवर झाला आहे.
संबंधित बातम्या