Dividend News in Marathi : तिमाही नफ्यात मोठी वाढ झाल्याच्या पार्श्वभूमीवर भारत पेट्रोलियम कॉर्पोरेशन लिमिटेड (BPCL) कंपनीनं शेअरहोल्डर्सना खास भेट दिली आहे. कंपनीनं अंतरिम लाभांशाची घोषणा केली आहे.
कंपनीच्या संचालक मंडळानं २२ जानेवारी २०२५ रोजी झालेल्या बैठकीत २०२४-२५ या आर्थिक वर्षासाठी प्रत्येकी १० रुपये अंकित मूल्याच्या प्रत्येक शेअरवर ५० टक्के अंतरिम लाभांश देण्याचा निर्णय घेतला. स्टॉक एक्सचेंजला ही माहिती देण्यात आली आहे. कंपनीच्या निर्णयानुसार, शेअरहोल्डर्सना त्यांच्याकडं असलेल्या प्रत्येक शेअरमागे ५ रुपये मिळणार आहेत.
अंतरिम लाभांशासाठी भागधारकांची पात्रता ठरविण्याच्या दृष्टीनं कंपनीच्या संचालक मंडळानं बुधवार, २९ जानेवारी २०२५ ही रेकॉर्ड डेट निश्चित केली आहे. लाभांशाची रक्कम २० फेब्रुवारी २०२५ रोजी किंवा त्याआधी लाभार्थ्यांच्या खात्यावर जमा होईल.
ट्रेंडलिनच्या आकडेवारीनुसार बीपीसीएलनं १८ जून २००१ पासून ४१ लाभांश जाहीर केले आहेत. बीपीसीएलनं मागील १२ महिन्यांत प्रति शेअर १०.५० रुपये लाभांश जाहीर केला.
बीपीसीएलनं आजच तिमाही निकाल जाहीर केले. त्यानुसार ऑक्टोबर-डिसेंबर या कालावधीत कंपनीनं तिमाही आधारावर निव्वळ नफ्यात ३६.८५ टक्क्यांची वाढ नोंदवली आहे. हा नफा २३९७ कोटी रुपयांवरून ४६४९ कोटींवर गेला आहे. डिसेंबर तिमाहीच्या महसुली उत्पन्नात १० टक्के वाढ झाली आहे. सप्टेंबर तिमाहीत १.०३ लाख कोटी रुपये असलेला महसूल डिसेंबरअखेरच्या तिमाहीत १.१३ लाख कोटी रुपयांवर पोहोचला आहे. व्याज, कर, घसारा आणि कर्जमाफीपूर्वीची कमाई (EBITDA) ४५४६ कोटींवरून ६७ टक्क्यांनी वाढून ७५८१ कोटी रुपये झाली आहे.
संबंधित बातम्या