Stock Market updates : स्मॉल कॅप मल्टिबॅगर स्टॉक ग्रोव्ही इंडिया लिमिटेडनं शेअरहोर्ल्डसना ३:१ या प्रमाणात बोनस शेअर देण्याची घोषणा केली असून त्यासाठी २२ ऑक्टोबर ही रेकॉर्ड डेट निश्चित केली होती. ती आता २३ ऑक्टोबर करण्यात आल्यामुळं हा शेअर सध्या चांगलाच चर्चेत आहे.
ग्रोव्ही इंडियाचा शेअर आज तब्बल ४.९९ टक्क्यांनी घसरला आणि तो २७९.८० रुपयांवर पोहोचला. या शेअरला आज लोअर सर्किट लागलं. गेल्या वर्षभरात ग्रोव्ही इंडियाच्या शेअरमध्ये २२० टक्क्यांनी वाढ झाली आहे, तर चालू कॅलेंडर वर्षात हा शेअर १६० टक्के वधारला आहे. गेल्या ६ महिन्यांत हा शेअर ७८ टक्क्यांनी वधारला आहे.
कंपनीनं दिलेल्या माहितीनुसार, बुधवार, २३ ऑक्टोबर २०२४ ही बोनस शेअर्सची रेकॉर्ड डेट असेल. या तारखेला ज्या भागधारकांच्या खात्यात शेअर असतील, त्या पात्र भागधारकांना कंपनीचे प्रत्येकी तीन शेअर्स मोफत मिळतील. ट्रेंडलाइनवर उपलब्ध आकडेवारीनुसार कंपनी पहिल्यांदाच बोनस शेअर्स देणार आहे.
सर्वसाधारणपणे कंपन्या त्यांच्या फ्री रिझर्व्हचा वापर करण्यासाठी, प्रति शेअर कमाई (EPS) वाढविण्यासाठी आणि रिझर्व्ह कमी करताना पेड-अप कॅपिटल वाढविण्यासाठी बोनस शेअर्स जारी करतात. या शेअर्सना फ्री शेअर्स असं देखील म्हणतात. भागधारकांना कोणत्याही अतिरिक्त किंमतीशिवाय हे शेअर दिले जातात.
ग्रोव्ही इंडिया ही एक रिअल इस्टेट डेव्हलपमेंट कंपनी आहे. दक्षिण दिल्लीतील निवासी इमारती आणि एनसीआर क्षेत्रातील व्यावसायिक मालमत्तांच्या बांधकाम व्यवसायात ही कंपनी कार्यरत आहे.