Bonus Share News : गुंतवणूकदारांना पहिल्यांदाच बोनस शेअर्सची भेट देणाऱ्या इंद्रप्रस्थ गॅस लिमिटेडनं आता बोनस शेअर्सचा लाभ घेण्यासाठी रेकॉर्ड डेट जाहीर केली आहे. कंपनीचा शेअर याच महिन्यात शेअर बाजारात एक्स-बोनस स्टॉक म्हणून व्यवहार करणार आहे.
इंद्रप्रस्थ गॅस लिमिटेडनं १६ जानेवारी रोजी १:१ या प्रमाणात बोनस शेअर देण्याचा निर्णय घेतला होता. तशी माहिती स्टॉक एक्स्चेंजला देण्यात आली होती. आता या बोनसचा लाभ घेण्यासाठी मुदतीची तारीख जाहीर केली आहे.
कंपनीनं दिलेल्या माहितीनुसार, शुक्रवार, ३१ जानेवारी २०२५ रोजी ही रेकॉर्ड डेट निश्चित करण्यात आली आहे. म्हणजे ज्या गुंतवणूकदारांच्या खात्यावर या तारखेला कंपनीचे शेअर्स असतील त्यांनाच बोनस शेअर्सचा लाभ मिळणार आहे. पात्र गुंतवणूकदारांना शेअर्सचं वाटप ३ फेब्रुवारी रोजी करण्यात येणार आहे.
गेल्या वर्षी म्हणजे २०२४ मध्ये कंपनीनं गुंतवणूकदारांना २ वेळा लाभांश दिला होता. पहिल्यांदा कंपनीनं प्रति शेअर ५ रुपये लाभांश दिला तर दुसऱ्यांदा प्रति शेअर ५.५० रुपये लाभांश दिला. इंद्रप्रस्थ गॅस लिमिटेड सातत्यानं गुंतवणूकदारांना लाभांश देत आहे.
शेअर बाजारातील उलथापालथीचा परिणाम मंगळवारी या शेअरवरही दिसून आला. कंपनीचा शेअर १.६३ टक्क्यांनी घसरून ३९५.५५ रुपयांवर बंद झाला. गेल्या अनेक वर्षांपासून सकारात्मक परतावा देण्यात कंपनीला यश आलेलं नाही. गेल्या वर्षभरात कंपनीच्या शेअरमध्ये १० टक्क्यांहून अधिक घसरण झाली आहे. या काळात सेन्सेक्समध्ये ६ टक्क्यांहून अधिक वाढ झाली आहे. कंपनीच्या शेअरचा ५२ आठवड्यांचा उच्चांक ५७०.६० रुपये आणि ५२ आठवड्यांचा नीचांकी स्तर ३०६.५० रुपये आहे. कंपनीचं मार्केट कॅप २७,६८८.५३ कोटी रुपये आहे.
संबंधित बातम्या