Shantanu Deshpande : 'भारतातील बहुतेक लोकांना त्यांची नोकरी आवडत नाही. प्रत्येक भारतीयाला आर्थिक सुरक्षा पुरवली आणि त्यांच्या पोटापाण्याची सोय झाली तर दुसऱ्या दिवशी ९९ लोक कामावर जाणार नाहीत, असं मत बॉम्बे शेव्हिंग कंपनीचे संस्थापक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी शंतनू देशपांडे यांनी मांडलं आहे. त्यांच्या या विधानावरून सोशल मीडियात उलटसुलट चर्चा रंगली आहे.
शंतनू देशपांडे यांनी लिंक्डइनवरील एक सविस्तर पोस्ट लिहून भारतीय कार्यसंस्कृतीबद्दल विचार करायला लावणारं मत मांडलं आहे. 'ब्लू कॉलर कामगारांपासून ते सरकारी कर्मचाऱ्यांपर्यंत, गिग वर्कर्सपर्यंत, कारखान्यांपर्यंत, विमा सेल्समनपासून बँकांपर्यंत, छोट्या व्यावसायिकांपासून ते बीएससीसारख्या 'फन अँड एम्प्लॉई फ्रेंडली स्टार्टअप्स' पर्यंत सर्वच कर्मचाऱ्यांची व्यथा सारखीच आहे. कोणी स्वत:च्या नोकरीत खूष नाही. असमाधानाच्या प्रमाणात थोडाफार फरक असेल इतकंच, असं देशपांडे यांनी पोस्टमध्ये म्हटलं आहे.
अनेकदा पहाटेपासून संध्याकाळपर्यंत आणि कधी कधी दिवस किंवा आठवडे पगाराच्या आशेनं लोक अथक परिश्रम घेतात. २५० वर्षांहून अधिक काळापासून आपण हेच स्वीकारलं आहे.
'पती-पत्नी, मुले, वृद्ध आई-वडील किंवा भावंडांच्या उदरनिर्वाहाची जबाबदारी असते. त्यामुळं नाईलाज म्हणून लोक काम करतात. सकाळपासून रात्रीपर्यंत, कधी कधी दिवस आणि आठवडे, पगाराच्या लटकत्या गाजरासाठी एखाद्याला आपल्या घरापासून आणि कुटुंबापासून दूर राहावं लागतं. पण हे असं जगायचं असतं हे आपण आता गृहित धरलं आहे. अशातूनच राष्ट्रांची निर्मिती झाली आहे. म्हणून आम्ही ते करतो, असं शंतनू यांनी पुढं म्हटलं आहे.
देशाची मोठी संपत्ती केवळ दोन हजार कुटुंबांकडं केंद्रित झालेली आहे. राष्ट्रीय संपत्तीची १८ टक्के मालकी या कुटुंबांकडं आहे. ही नक्कीच चांगली गोष्ट नाही. नेमकी आकडेवारी माहीत नाही पण या कुटुंबांचा एकूण करात १.८ टक्क्यांपेक्षाही कमी वाटा आहे, असं शंतनू देशपांडे यांनी म्हटलं आहे.
‘कठोर परिश्रम करा आणि प्रगती करा,’ असं नरेटिव्ह पसरवण्यासाठी ही प्रमुख घराणी आणि माझ्यासारखे इतर 'इक्विटी बिल्डर्स' कारणीभूत आहेत. कारण हे सगळं स्वत:साठीच करावं लागलं. नाहीतरी दुसरा कोणता पर्याय आहे? आम्हाला दुसरा कोणताही मार्ग माहित नाही, असं ते म्हणाले.
देशपांडे यांच्या मताशी अनेकांनी असहमती दर्शवली. नोकरीमुळं मन-बुद्धी सतत कार्यरत राहण्यास मदत होते आणि लोकही सोफ्यावर बसून सोशल मीडियावर स्क्रोल करण्यापासून दूर राहतात. 'सर्वांच्या बाबतीत हे खरं नाही. नोकरी ही माणसाचा मेंदू कार्यरत ठेवण्यासाठी काही ना काही देत असते. अन्यथा तुम्हाला दुसरं कामच राहिलं नसतं, असं एका युजरनं म्हटलं आहे.
९९ टक्के कॉर्पोरेट कर्मचारी दिसत नसले, तरी शेती, शिक्षण, अभियांत्रिकी, आरोग्य सेवा आणि अगदी फेरीवाले अशा क्षेत्रांतील कामगारांनी देशाची उभारणी केली आहे, त्यापैकी बरेच जण अजूनही कामावर जातील, याकडे आणखी एका नेत्याने लक्ष वेधले.
कॉर्पोरेटमध्ये काम करणारे ९९ टक्के कर्मचारी दाखवत नसले तरी राष्ट्र केवळ त्यांच्याच कामातून उभं राहतं असं नाही. शेतकरी, शिक्षक, अभियंते, आरोग्य कर्मचारी, रस्त्यावरील विक्रेते अशा अनेकांनी देश घडवला आहे. विश्वास ठेवा किंवा ठेवू नका. यांच्यातील बरेच लोक घरी बसणार नाहीत. बहुतेक जण कामावर जातील, असं दुसऱ्या एका युजरनं म्हटलं आहे.
एका युजरनं म्हटलं आहे की, 'अब्जावधी रुपयांच्या मोफत उदरनिर्वाहासाठी पैसे कुठून आणणार? सध्याची व्यवस्था वाईट, मोडकळीस आलेली, विषम आहे हे मान्य केली तरी आतापर्यंत बहुतेक लोकांसाठी तीच आपल्या परीनं काम करत आली आहे.
आणखी एकानं म्हटलं आहे की, म्हणूनच तर रामायण, महाभारतात ही महाकाव्ये दु:खाविषयी बोलतात. जीवनाचा केवळ आनंद लुटण्यासाठी आपण इथं जन्माला आलो असतो, तर ती महाकाव्ये ‘पृथ्वीवरील जीवनाचा आनंद कसा घ्यावा’ या थीमसह लिहिली गेली असती. तसंच बुद्धानं सांगितल्यानुसार, आपण दु:ख भोगण्यासाठी पृथ्वीवर आहोत. आर्थिकदृष्ट्या यशस्वी लोकही म्हातारपणी वेगवेगळ्या अडचणीतून जात असतात.'
संबंधित बातम्या