Bim Bissell Death : फॅबइंडिया हा ब्रँड भारतातील घराघरांत पोहोचवणाऱ्या बिमला नंदा बिसेल यांचं वृद्धापकाळानं निधन झालं आहे. त्या ९३ वर्षांच्या होत्या. त्यांच्या पश्चात एक मुलगा व एक मुलगी असा परिवार आहे. फॅबइंडिया व्यवसायाला नव्या उंचीवर नेण्यात त्यांचा मोठा वाटा होता. त्यांच्या निधनाबद्दल उद्योगविश्वात तीव्र दु:ख व्यक्त होत आहे.
बिम बिसेल यांनी १९५८ मध्ये एक भागीदार आणि सल्लागार म्हणून Fabindia मध्ये प्रवेश केला. त्या काळात ही कंपनी त्यांचे पती जॉन बिसेल चालवत होते. बिमला यांनी या व्यवसायाची बाजारपेठ समजून घेतली आणि काळाबरोबर आपल्या व्यवसायात बदल केले व अनेक नवनवीन कल्पना आणल्या. त्यांच्या या बुद्धीकौशल्यामुळं व द्रष्टेपणाणुळं फॅबइंडिया ही जागतिक कंपनी बनली.
फॅबिंडियाची स्थापना अमेरिकन रहिवासी जॉन बिसेल यांनी केली होती. विशेष म्हणजे त्यांनी भारतात येऊन ही कंपनी सुरू केली. फॅबइंडियाच्या जन्माची कथाही खूप रंजक आहे. १९५८ मध्ये जॉन बिसेल यांना फोर्ड फाऊंडेशननं २ वर्षांसाठी भारतात पाठवलं होतं. भारतातील गावकऱ्यांना निर्यातीसाठी वस्तू बनवण्यासाठी प्रेरित करणं हे त्यांचं काम होतं. ते अमेरिकन फर्म सेंट्रल कॉटेज इंडस्ट्रीज कॉर्पोरेशन (CCIC) चे सल्लागार देखील होते. दोन वर्षे भारतात असताना ते देशाच्या प्रेमात पडले. विशेषतः इथली संस्कृती आणि स्वत:च्या हातानं कपडे बनवणारे कारागीर त्यांना आवडले. त्यानंतर त्यांनी भारतात राहून काम करण्याचा निर्णय घेतला.
जॉनला भारतातील विणकरांची कला अवगत होती. त्यामुळं त्यांनी आजीकडून मिळालेल्या ९५,००० रुपयांमध्ये एक छोटी कंपनी सुरू केली. १९६० मध्ये स्थापन झालेल्या या कंपनीचं नाव होतं Fabindia Limited. घरातील दोन छोट्या खोल्यांपासून कंपनीची सुरुवात झाली. ही कंपनी भारतात स्थानिक पातळीवर बनवलेल्या वस्तू विकत घेऊन परदेशात पाठवायची. जॉनला भारतीय कलाकुसर जगासमोर न्यायची होती. यासाठी ते अशा व्यक्तीच्या शोधात होते. हा शोध सुरू असताना त्यांची भेट एएस खेरा या होम फर्निशिंग उत्पादकाशी झाली. हा उत्पादक त्यांच्यासाठी पहिला पुरवठादार देखील होता. १९६५ मध्येच फॅबइंडियाचा महसूल २० लाख रुपयांवर पोहोचला होता.
याच काळात जॉन यांनी बिमला नंदासोबत लग्न केलं. बिमला पंजाबी कुटुंबातील होती. फॅबइंडियाला पुढं नेण्यासाठी त्यांनी आपल्या पतीला सल्लागार म्हणून देखील सामील केलं. बिमला यांना त्यांच्या मैत्रिणी बिम म्हणत. बिमला या उद्योगाबद्दल सर्व काही पटकन समजलं. त्यानंतर त्यांनी कपड्यांमध्ये अनेक प्रयोग केले, जे लोकांना खूप आवडले. कंपनीनं १९७६ मध्ये पहिल्यांदा रिटेलमध्ये प्रवेश केला. त्यांनी ग्रेटर कैलास, दिल्ली इथं फॅबइंडियाचं पहिलं आउटलेट उघडलं. दुसरं आउटलेट १९९४ मध्ये दिल्लीत उघडण्यात आलं. त्यामुळं कंपनीची विक्री १२ कोटींवर पोहोचली.
जॉन बिसेल याचं १९९८ मध्ये वयाच्या ६६ व्या वर्षी निधन झालं. मात्र, फॅबइंडियाचा प्रवास थांबला नाही. चंदेरी, संगानेरी, कच्छी, बनारसी असे देशातील पारंपरिक कपडे नव्या स्वरूपात त्यांनी पुढं नेले. आज फॅबइंडिया ही कंपनी केवळ देशातच नाही तर देशाबाहेरही दर्जेदार कपड्यांसाठी आणि भारतातील पारंपारिक पोशाखासाठी ओळखली जाते.
सध्या ही कंपनी जॉन-बिम यांचा मुलगा विल्यम नंदा बिसेल पुढं नेत आहे. २००६ मध्ये, कंपनीनं नॉन-टेक्सटाईल रेंजही बाजारात आणली. यामध्ये ऑरगॅनिक फूडपासून पर्सनल केअर आणि हातानं बनवलेल्या दागिन्यांपर्यंत सर्व गोष्टींचा समावेश आहे. आता देशातील अनेक राज्यांतील ५५,००० हून अधिक कारागीर कंपनीशी जोडले गेले आहेत.
२००७ मध्ये कंपनीनं पहिल्यांदा २०० कोटी रुपयांचा महसूल पार केला. फॅबइंडिया आता सिंगापूर, भूतान, इटली, नेपाळ, मलेशिया आणि मॉरिशसमध्ये पोहोचलं आहे. हा प्रवास अखंड चालू आहे. २०१६ मध्ये कंपनीची एकूण संपत्ती ५३९७ कोटी रुपये होती. २०२४ मध्ये कंपनीची एकूण संपत्ती १६,००० कोटी रुपयांच्या आसपास पोहोचेल. त्याची देशभरात ४०० हून अधिक दुकानं आहेत. कंपनीचा महसूल अंदाजे १,७०० कोटी रुपयांवर पोहोचला आहे.
संबंधित बातम्या