नवी दिल्ली
: वृत्तसंस्था – टेलिकॉम क्षेत्रातील दिग्गज कंपनी भारती एअरटेलसाठी गुरुवारचा दिवस खूप खास होता. आठवड्याच्या चौथ्या दिवशी या कंपनीच्या शेअरने आतापर्यंतचा उच्चांक गाठला. व्यवहारादरम्यान या शेअरची किंमत 1711 रुपयांवर पोहोचली होती. त्याचवेळी कंपनीचे बाजार भांडवल १० लाख कोटी रुपयांच्या पुढे गेले. यासह हा टप्पा गाठणारी एअरटेल चौथी भारतीय कंपनी ठरली आहे. एअरटेलचा शेअर 0.75 टक्क्यांच्या वाढीसह 1665.05 रुपयांवर बंद झाला. एअरटेलच्या शेअरमध्ये 62 टक्क्यांनी वाढ झाली आहे. त्या तुलनेत बेंचमार्क निफ्टी१७ टक्क्यांनी वधारला आहे.
एअरटेलच्या बाजार भांडवलात केवळ १८ दिवसांत एक लाख कोटी रुपयांची वाढ झाली आहे. वर्षाच्या सुरुवातीला बाजार भांडवलात सातव्या क्रमांकावर असलेल्या भारती एअरटेलने हिंदुस्थान युनिलिव्हर, इन्फोसिस आणि आयसीआयसीआय बँक या कंपन्यांना मागे टाकले आहे. मार्केट कॅपिटलच्या बाबतीत रिलायन्स इंडस्ट्रीज लिमिटेड ही देशातील सर्वात मोठी कंपनी आहे. रिलायन्स इंडस्ट्रीजचे बाजार भांडवल सुमारे २० लाख कोटी रुपये आहे, तर सॉफ्टवेअर कंपनी टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेसचे (टीसीएस) बाजार भांडवल १५.६ लाख कोटी रुपये आहे. एचडीएफसी बँक १३ लाख कोटी रुपयांच्या बाजार भांडवलासह तिसऱ्या क्रमांकावर आहे.
विदेशी ब्रोकरेज कंपनी जेफरीजच्या म्हणण्यानुसार, कंपनीने बिझनेस-टू-कन्झ्युमर (बी 2 सी) आणि बी 2 बी या दोन्ही मार्केटच्या मिडल / प्रीमियम सेगमेंटमधील संधींवर लक्ष केंद्रित केले आहे आणि या सेगमेंटमध्ये वाढीची रणनीती स्पष्ट केली आहे. विदेशी ब्रोकरेज कंपनीने एअरटेलच्या शेअरवर 'बाय' रेटिंग दिले असून, १९७० रुपयांचे टार्गेट प्राइस दिले आहे.
एअरटेलचा नफा अडीच पटीने वाढून ४,१६० कोटी रुपये झाला आहे. गेल्या वर्षी याच तिमाहीत कंपनीला १,६१२.५ कोटी रुपयांचा नफा झाला होता. या कालावधीत कंपनीचा भारतातील व्यवसायातून मिळणारा महसूल वार्षिक आधारावर १०.१ टक्क्यांनी वाढून २९,०४६ कोटी रुपये झाला आहे. गेल्या तिमाहीत भारती एअरटेलचा मोबाइल सरासरी प्रतिवापरकर्ता महसूल (एआरपीयू) भारतात वाढून २११ रुपये झाला आहे, जो गेल्या वर्षी याच कालावधीत २०० रुपये होता. गेल्या तिमाहीत एअरटेलचे एकूण ग्राहक 7.3 टक्क्यांनी वाढून 567.5 दशलक्ष झाले आहेत, तर भारतीय ग्राहक संख्या 7 टक्क्यांनी वाढून 409.2 दशलक्ष झाली आहे.