Business Ideas : उद्योग-व्यवसायात सावकारी पाश...सुखाचा नाश…
मराठी बातम्या  /  बिझनेस  /  Business Ideas : उद्योग-व्यवसायात सावकारी पाश...सुखाचा नाश…

Business Ideas : उद्योग-व्यवसायात सावकारी पाश...सुखाचा नाश…

HT Marathi Desk HT Marathi
Dec 24, 2024 10:43 PM IST

कर्ज ही अशी गोष्ट आहे जी म्हटले तर उपाय आणि म्हटले तर अपाय आहे. व्यावसायिकासाठी कर्ज ही संजीवनी असते, परंतु सामान्य माणसासाठी तेच ओझे ठरते. शक्यतो कर्जाच्या वाटेला जाऊ नये, पण ते घेणे अपरिहार्यच असेल तर निदान आपल्याला भार पेलवेल इतकेच असावे.

उद्योग-व्यवसायात सावकाराकडून कर्ज घेणे चुकीचे
उद्योग-व्यवसायात सावकाराकडून कर्ज घेणे चुकीचे

 

धनंजय दातार

कर्जबाजारी होण्याची समस्या आजकालची नसून फार प्राचीन काळापासून आहे. ऋग्वेदासारख्या प्राचीन ग्रंथातही देवतांनी आपल्याला धन देऊन कर्जाच्या विळख्यातून सोडवावे, अशी याचना करणाऱ्या ऋचा आहेत. कर्ज फिटावे म्हणून कुणी ऋणमोचन स्तोत्र म्हणतात, कुणी लक्ष्मीचे व्रत करतात, कार्तिकस्वामीचे दर्शन घेतात. पण हे सगळे मनाला दिलासा देणारे उपाय आहेत. यामुळे मूळ समस्या सुटत नाही. मी आजवर आयुष्यात आर्थिक अडचणीसाठी उधार-उसनवारी आणि खासगी सावकारांकडून कर्जाचा मार्ग कधीच पत्करला नाही. पैसे येईपर्यंत मनाला मुरड घालून तग धरुन राहाण्याचे धोरण अवलंबले. व्यवसायात लोक खेळत्या भांडवलाची गरज म्हणून नियमितपणे कर्ज उचलतात पण मी तोही मार्ग कधी पत्करला नाही. अगदी सुरवातीला धंदा वाढवण्यासाठी बँकेच्या आग्रहामुळे कर्ज घेतले, पण त्याच्या व्याजाचे दडपण माझ्यावर येऊ लागले. त्यामुळे वर्षभरातच मी ते कर्ज फेडून टाकले आणि नंतर बचतीचा मार्ग धरला. रोज मिळणाऱ्या उत्पन्नातून काही हिस्सा नियमितपणे वाचवू लागलो. वर्षभराने जी गंगाजळी साठली ती मला फेरगुंतवणूक म्हणून उपयोगाला आली. आजही मी तेच करतो त्यामुळे मला कुणाकडे याचना करावी लागत नाही. 

खासगी सावकारी ही किती भयंकर असते याची खूप उदाहरणे मी डोळ्यांनी पाहिली आहेत. माझ्या कंपनीत एक कर्मचारी होता. त्याला त्याच्या सहकाऱ्याने जुगार खेळण्याचे व्यसन लावले. त्याला पैसा पुरेनासा झाला. सुरवातीला उधार-उसनवाऱ्या झाल्या आणि मग चटक वाढत गेली. मग त्याच्या मित्रानेच त्याला रक्कम कर्जाऊ दिली तीसुद्धा महिना दहा टक्के अशा अविश्वसनीय व्याजदराने. याला वर्षभरात मूळ रक्कम व त्यावरचे १२० टक्के व्याज असे देणे द्यायचे होते. ते अशक्य झाल्याने मित्रा-मित्रांत जोरदार भांडणे झाली. प्रकरण धमक्या व मारामारीपर्यंत पोचू लागले. ती गोष्ट माझ्या कानावर आली. घडलेला प्रकार समजताच मी दोघांनाही बोलवून घेतले. कर्ज देणाऱ्याला चांगलेच खडसावले. त्याला व्याजाचा दर वाजवी पातळीपर्यंत खाली आणायला लावला आणि तो व्यवहार तिथेच संपवून टाकण्यास भाग पाडले. 

मुंबईत माझा एक मित्र होता ज्याला प्रथम उसनवारीची आणि नंतर कर्ज काढण्याची खोडच लागली. त्याने मिळेल तेथून कर्जाऊ रक्कम उचलण्याचा सपाटा लावला. नंतर तो एकाचे कर्ज फेडण्यासाठी दुसरीकडून कर्ज काढू लागला. थकबाकीदार म्हणून बँकांनी कर्ज नाकारल्यावर तो खासगी सावकारांकडे वळला. त्यांचे देणे थकवल्यानंतर ते लोक घरी येऊन तमाशा करु लागले. फोनवरुन धमक्या देऊ लागले व वसुलीसाठी घरी गुंडांना पाठवू लागले. यामुळे त्याची पत्नी व मुलांना लाजीरवाणे जीवन जगण्याची वेळ आली. सामाजिक प्रतिष्ठा नष्ट झाली. त्याने एक दिवस माझ्याकडेही मदत मागितली. मी मित्राला संकटातून बाहेर काढण्यासाठी त्याचे कर्ज एकरकमी फेडले आणि त्याच्याकडून शपथ घेववली, की तो पुन्हा कर्जाच्या वाट्याला जाणार नाही. पण त्याने शब्द पाळला नाही. सहा महिन्यांनी मला कळले, की त्याचे पहिले पाढे पंचावन्न सुरु झाले होते. मी त्याला कितीवेळा मदतीला पुरा पडणार होतो? पुन्हा त्याने आमच्या सर्वच मित्रांकडून अशाच लाखांनी रकमा उसन्या घेतल्या होत्या. नाईलाजाने मी त्याच्याकडे पाठ फिरवली. 

माणसाने एकवेळ बँकांकडून सर्व नियम व अटींची पूर्तता करुन कर्ज घ्यावे, ते काटेकोरपणे फेडावे, पण खासगी सावकारीच्या वाटेला जाऊ नये, असे माझे मत आहे. त्याहीआधी अंथरुण पाहून पाय पसरावेत, ही म्हण लक्षात ठेवावी. पैसा ही फार विचित्र गोष्ट आहे. ती हातात आल्यावर त्याला बारा वाटा फुटतात. ज्या गोष्टीसाठी कर्ज घेतले आहे त्यासाठीच ते वापरावे. कर्जाचा पैसा चैनीसाठी वापरणे शहाणपणाचे नसते. कर्ज प्रामाणिकपणे फेडले तर पुढच्या खेपेस बँका आपल्याला तत्काळ आणि वाढीव कर्ज देतात. पण ज्यांना कर्जफेड किंवा व्याजदराचे दडपण येते त्यांनी माझ्यासारखा बचतीतून गंगाजळीचा मार्ग पत्करावा. आयुष्यात कधीच मान खाली घालण्याची वेळ येत नाही. एक छान सुभाषित आहे. 

अग्निशेषम् ऋणशेषम् शत्रुशेषम् तथैव च ।

पुनः पुनः प्रवर्धेत तस्मात् शेषम् न कारयेत् ॥ 

(आग, कर्ज व शत्रू यांचा अंशही बाकी राहिला तरी तो पुन्हा पुन्हा वाढत जातो म्हणून हे शिल्लक ठेऊ

नयेत.)

(लेखक धनंजय दातार दुबईस्थित अदिल उद्योगसमूहाचे व्यवस्थापकीय संचालक आहे)

Whats_app_banner