ITR filing : इन्कम टॅक्स रिटर्न फाइल करण्याआधी या गोष्टी समजून घ्या! नाहीतर पडेल महागात
मराठी बातम्या  /  बिझनेस  /  ITR filing : इन्कम टॅक्स रिटर्न फाइल करण्याआधी या गोष्टी समजून घ्या! नाहीतर पडेल महागात

ITR filing : इन्कम टॅक्स रिटर्न फाइल करण्याआधी या गोष्टी समजून घ्या! नाहीतर पडेल महागात

Jun 28, 2024 02:53 PM IST

ITR filing News : इन्कम टॅक्स रिटर्न फाइल करण्यासाठी लगबग सुरू आहे. या धावपळीत काही महत्त्वाच्या गोष्टी विसरलात तर तुम्हाला महागात पडेल. कोणत्या आहेत या गोष्टी?

इन्कम टॅक्स रिटर्न फाइल करण्याआधी या गोष्टी समजून घ्या! नाहीतर पडेल महागात
इन्कम टॅक्स रिटर्न फाइल करण्याआधी या गोष्टी समजून घ्या! नाहीतर पडेल महागात

ITR filing News : जर तुम्ही स्वत: इन्कम टॅक्स रिटर्न भरणार असाल तर आतापासूनच काही गोष्टी समजून घेणं गरजेचं आहे. अन्यथा, प्राप्तिकर विभागाकडून नोटिसा येण्याची शक्यता आहे. ‘लाइव्ह मिंट’शी बोलताना कर तज्ज्ञांनी या संदर्भात माहिती दिली आहे. त्यानुसार रिटर्न फाइल केल्यास भविष्यात अडचणीचा सामना करावा लागणार नाही.

इन्कम टॅक्स विभागाकडून करदात्यांना २६ एएस हा फॉर्म उपलब्ध करून दिला जातो. यात करदात्यांना मिळालेलं व्याज, लाभांश, पगार असं विविध उत्पन्न व त्यावर कापल्या गेलेल्या टीडीएसची माहिती असते. याशिवाय, प्राप्तिकर विभागाकडून वार्षिक माहिती विवरण (AIS) दिलं जातं.

एआयएस म्हणजे काय?

एआयएसमध्ये आपण वर्षभरात केलेल्या आर्थिक व्यवहारांची माहिती असते. त्यात मालमत्तेची खरेदी-विक्री, शेअर्स आणि म्युच्युअल फंडातील व्यवहार, बँक एफडी, क्रेडिट कार्ड पेमेंट, बँक खाते शिल्लक, बचत बँक व्याज इत्यादीचा समावेश असतो. ही आकडेवारी आयटीआर योग्य पद्धतीनं दाखल करण्यासाठी उपयुक्त ठरते.

फॉर्म क्रमांक २६ एएस मध्ये दिलेल्या टॅक्स क्रेडिटच्या तपशीलांची पडताळणी करावी. जर आपल्याला एआयएसमध्ये विसंगती दिसली तर आपण आपला अभिप्राय ऑनलाइन सबमिट करू शकता.

फॉर्म नंबर १६/१६ ए ची पडताळणी करा

कंपनीनं जारी केलेल्या फॉर्म क्रमांक १६ किंवा १७ ए मध्ये तुमचा पॅन क्रमांक योग्य प्रकारे नमूद केला आहे की नाही याची पडताळणी करा. जर आपण जुन्या कर प्रणालीचा पर्याय निवडला असेल तर करातून सूट मिळणारे एचआरए, एलटीएसारखे सर्व भत्ते फॉर्म १६ मध्ये योग्यरित्या दर्शविले आहेत की नाही याची पडताळणी करा.

आपला चार्टर्ड अकाउंटंट आयटीआर भरताना सर्वसाधारणपणे फॉर्म क्रमांक १६ वरच अवलंबून असतो. त्यामुळं फॉर्म क्रमांक १६ मध्ये काही विसंगती आढळल्यास ती ताबडतोब आपल्या कंपनीला निदर्शनास आणून द्या आणि ती दुरुस्त करण्याची विनंती करा. फॉर्म १६ आणि आयटीआरमध्ये विसंगती आढळल्यास इन्कम विभागाकडून नोटीस मिळू शकते. त्यामुळं तुम्हाला बँकेकडून मिळालेल्या फॉर्म क्रमांक १६ अ वरील पॅन क्रमांक, त्यावर दर्शविलेल्या उत्पन्नाची रक्कम व टीडीएसची रक्कम याची पडताळणी करा.

३१ जुलैच्या आधी उघडा कॅपिटल गेन अकाउंट

निवासी घरात गुंतवणूक केली असेल तर कलम ५४ किंवा ५४ एफ अंतर्गत दीर्घकालीन भांडवली नफ्यावरील करातून सूट मिळवता येते.

उत्पन्नाच्या अचूक नोंदीसाठी विविध तपशील तपासा

आयटीआर दाखल करण्यासाठी तयार करण्यात येत असलेल्या उत्पन्न विवरण पत्रात सर्व व्यवहारांचा तपशील योग्यरित्या समाविष्ट केला जात आहे का याची पडताळणी करण्यासाठी आपला ब्रोकर, म्युच्युअल फंड हाऊस आणि बँकेकडून वार्षिक खाते स्टेटमेंट मिळवा.

Whats_app_banner