भारतात डिजिटल माध्यमाद्वारे गेली अनेक दशके वृत्तसेवा देणाऱ्या बीबीसी या ब्रिटनस्थित माध्यमसंस्थेने भारतात त्यांच्या वृत्तसंकलन प्रक्रियेत फेरबदल केले आहे. बीबीसीच्या चार माजी पत्रकारांनी एकत्र येऊन नुकतेच 'कलेक्टिव्ह न्यूजरूम प्रायव्हेट लिमिटेड' ही स्वतंत्र वृत्तसंस्था सुरू केली असून बीबीसीने भारतातील त्यांचा वृत्त प्रकाशनाचा परवाना (न्यूजरुम पब्लिशिंग लायसन्स) ‘कलेक्टिव्ह न्यूजरूम’ या नव्या कंपनीकडे हस्तांतरित केला आहे. ही नवी कंपनी केंद्र सरकारच्या नव्या थेट परकीय गुंतवणुकीच्या (Foreign Direct Investment) च्या नियमांचे पालन करून भारतात विविध भाषांमध्ये न्यूज कंटेंटची निर्मिती करून बीबीसीला पुरवणार आहे.
ईडीने ‘बीबीसी इंडिया’विरोधात परकीय चलन कायद्याचे उल्लंघन केल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला होता. ईडीच्या अधिकाऱ्यांनी बीबीसी विरोधात ‘परकीय चलन व्यवस्थापन कायदा’ (Foreign Exchange Management Act) अर्थात 'फेमा' कायद्यातील तरतुदींनुसार कागदपत्रांची मागणी करून बीबीसीच्या काही अधिकाऱ्यांचे जबाब नोंदवण्याची मागणी केली होती. प्राप्तिकर विभागाने दिल्लीतील बीबीसी कार्यालयात जाऊन चौकशी केल्यानंतर ईडीने हे पाऊल उचलले होते.
दरम्यान, बीबीसीच्या माजी पत्रकार रूपा झा, मुकेश शर्मा, संजय मजुमदार आणि सारा हसन या चौघांनी 'कलेक्टिव्ह न्यूजरूम प्रायव्हेट लिमिटेड' ही स्वतंत्र वृत्तसंस्था सुरू केली असून या कंपनीद्वारे भारतात हिंदी, गुजराती, मराठी, पंजाबी, तमिळ आणि तेलुगू भाषांमध्ये बीबीसीच्या डिजिटल सेवांसाठी न्यूज कंटेंटची निर्मिती केली जाणार आहे. हा कंटेंट बीबीसीच्या न्यूज वेबसाइट्स, यूट्यूब चॅनल, फेसबुक आणि इन्स्टाग्रामवरील मीडिया पेजेस आणि इंग्रजीतील बीबीसी इंडियाच्या यूट्यूब चॅनेलवर प्रकाशित केला जाणार असल्याचे कंपनीने म्हटले आहे. एफडीआर धोरणानुसार डिजिटल कंटेंट निर्मिती क्षेत्रात ब्रिटनस्थित बीबीसीची २६ टक्के भागीदारी असणार आहे.
‘कलेक्टिव न्यूजरूम ही नवीन कंपनी बीबीसीपेक्षा वेगळी नाही. आम्ही येथे वाढलो असल्याने आमच्या दोघांचे डीएनए एकच असणार आहे. सार्वजनिक हितासाठी आम्ही वस्तुस्थितीचा पाठपुरावा करू. नवीन कंपनी पूर्णपणे भारतीयांच्या मालकीची आहे, हा मोठा फरक असणार आहे. आम्हाला फक्त बीबीसीच नव्हे तर इतर अनेकांसाठी कंटेंट तयार करायचा आहे. बीबीसी आमचा पहिला ग्राहक आहे. ब्रिटनबाहेर भारत हा बीबीसीचे जगातले सर्वात मोठे मार्केट आहे’ असं 'कलेक्टिव्ह न्यूजरूम'च्या मुख्य कार्यकारी अधिकारी रुपा झा यांनी ‘मिंट’ला दिलेल्या मुलाखतीत सांगितलं.
‘कलेक्टिव्ह न्यूजरूम’मध्ये या चार पत्रकारांंचे एकत्रित मिळून ७५ टक्के शेअर्स असतील, तर उर्वरित शेअर्स इतर पाच भागदारकांकडे असणार आहे.
संबंधित बातम्या