31 march news : आर्थिक वर्षाचा शेवटचा दिवस ३१ मार्च यंदा रविवारी येत असल्यानं तारांबळ उडालेल्या करदात्यांना मोठा दिलासा मिळाला आहे. बँकांबरोबरच एलआयसीसह खासगी विमा कंपन्यांची कार्यालयं देखील रविवारी खुली राहणार आहेत. त्यामुळं शेवटच्या क्षणापर्यंत करदात्यांना आपली आर्थिक कामं पूर्ण करता येणार आहेत.
विम्यातील गुंतवणूक हा करबचतीचा एक मार्ग असतो. मात्र, अनेकदा करदाते शेवटच्या क्षणापर्यंत गुंतवणूक करण्याचं टाळतात किंवा कामाच्या गडबडीत विसरून जातात. मार्चमध्ये कर सल्लागाराकडून सूचना येताच मग धावपळ सुरू होते. यंदाच्या आर्थिक वर्षाच्या शेवटी वीकेंड आला व त्यातच गुड फ्रायडेची सुट्टी आली. त्यामुळं 'लास्ट मिनिटवाल्या' करदात्यांची चांगलीच तारांबळ उडाली होती. आरबीआय व विमा नियामक प्राधिकरणानं ही अडचण लक्षात घेऊन अनुक्रमे बँका व विमा कंपन्यांना शनिवारी व रविवारीही कामकाज सुरू ठेवण्याचे आदेश दिले आहेत.
विमा नियामक प्राधिकरणानं (IRDAI) केलेल्या सूचनेनुसार एलआयसीनं ३० मार्च आणि ३१ मार्च या दोन्ही दिवशी कामकाज सुरू ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. तसं निवेदन एलआयसीनं प्रसिद्ध केलं आहे. त्यानुसार, ३० मार्च २०२४ आणि ३१ मार्च २०२४ रोजी अधिकृत कामकाजाच्या वेळेपर्यंत पॉलिसिधारकांना आपली दैनंदिन कामं करता येतील. इतर विमा कंपन्यांनीही असाच निर्णय घेतला आहे.
करदात्यांच्या सोयीसाठी चालू आर्थिक वर्षाचे शेवटचे दोन दिवस आरबीआयची सरकारशी संबंधित सर्व कार्यालये आणि एजन्सी बँकांच्या सर्व नियुक्त शाखा सामान्य कामकाजाच्या तासांनुसार खुल्या राहतील. नॅशनल इलेक्ट्रॉनिक फंड ट्रान्सफर (NEFT) आणि रिअल टाइम ग्रॉस सेटलमेंट (RTGS) प्रणालीद्वारे होणारे व्यवहार ३१ मार्च २०२४ च्या मध्यरात्री १२ पर्यंत सुरू राहतील.
येत्या शनिवारी (३० मार्च) आणि रविवारी (३१ मार्च) प्राप्तिकर विभागाची कार्यालयेही सुरू राहणार आहेत. या दिवसापर्यंत करदाते चालू आर्थिक वर्षाच्या कर बचतीसाठी गुंतवणूक करू शकतात. तसंच, प्राप्तिकराशी संबंधित इतर कामं करू शकणार आहेत.