Interest on Bank Loan : सलग नऊव्यांदा रेपो दर 'जैसे थे' ठेवण्याचा निर्णय रिझर्व्ह बँक ऑफ इंडियानं (RBI) घेतल्यानंतर त्याचा थेट परिणाम बँकांच्या व्याजदरांवर झाला आहे. काही बँकांनी लगेचच व्याजदरात बदल करून त्यात वाढ केली आहे. यात कॅनरा बँक, बँक ऑफ बडोदा आणि युको बँक यांचा समावेश आहे.
कॅनरा बँकेनं एमसीएलआर (MCLR) रेटमध्ये ०.०५ टक्क्यांनी वाढ केली आहे. सर्व मुदतीच्या कर्जासाठी ही वाढ करण्यात आली आहे. यामुळं बहुतांश ग्राहकांची कर्जे महाग होणार आहेत. कॅनरा बँकेनं शेअर बाजाराला दिलेल्या माहितीत म्हटलं आहे की, एक वर्षाच्या कालावधीसाठी MCLR आता ९ टक्के असेल. सध्या कॅनराचा एमसीएलआर ८.९५ टक्के आहे. वाहन आणि वैयक्तिक कर्जासारख्या बहुतांश ग्राहक कर्जावरील व्याज ठरविण्यासाठी या दराचा आधार घेतला जातो.
तीन वर्षांसाठी एमसीएलआर ९.४० टक्के असेल, तर दोन वर्षांसाठी एमसीएलआर ०.०५ टक्क्यांनी वाढवून ९.३० टक्के करण्यात आला आहे. एक महिना, तीन महिने आणि सहा महिन्यांच्या कालावधीसाठी व्याज ८.३५ ते ८.८० टक्के असेल. नवीन दर १२ ऑगस्ट २०२४ पासून लागू होतील.
बँक ऑफ बडोदानं १२ ऑगस्टपासून काही कालावधीसाठी MCLR मध्ये बदल केले आहेत. युको बँकेची मालमत्ता दायित्व व्यवस्थापन समिती (ALCO) १० ऑगस्टपासून काही कालावधीसाठी कर्जदरात ५ आधारभूत पॉइंट्स (bps) ने वाढ करेल.
रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर शक्तीकांत दास यांनी मंगळवारपासून सुरू झालेल्या पतधोरण समितीच्या (MPC) तीन दिवसीय बैठकीत घेतलेल्या निर्णयाची माहिती दिली. महागाईबाबत सावध भूमिका घेत रेपो दर ६.५ टक्क्यांवर कायम ठेवण्याचा निर्णय त्यांनी जाहीर केला. पतधोरण समितीतील ६ पैकी ४ सदस्यांनी पॉलिसी रेट जैसे थे ठेवण्याच्या बाजूनं मतदान केलं. पतधोरण समितीनं गेल्या वर्षीच्या फेब्रुवारी महिन्यात रेपो रेटमध्ये बदल केला होता. त्यावेळी हा दर ६.५ टक्के करण्यात आला होता.