Bangladesh crisis impact on stocks : तंत्रज्ञानामुळं जग इतकं जवळ आलं आहे की जगातल्या कुठल्याही देशातील घडामोडींचा परिणाम इतर देशांवर होत असतो. त्यात गडबड झालेला देश शेजारी असेल तर बोलायलाच नको. बांगलादेशातील अस्थिरतेचा भारतावरही अनेक अंगांनी परिणाम होणार आहे. त्यात पहिला परिणाम आर्थिक आहे. शेअर बाजारात त्याचे पडसाद सर्वात आधी उमटणार आहेत. अर्थात हे परिणाम चांगले आणि वाईट दोन्ही असू शकतात.
बांगलादेशातील अराजकीय परिस्थितीमुळं भारतातील कंपन्यांना जसा फटका बसणार आहे, तसा काही कंपन्यांना थेट फायदाही होणार आहे. शेअर बाजार आताच तसे संकेत देऊ लागला आहे. बांगलादेशातील सद्य परिस्थितीचा फायदा कापड निर्यात करणाऱ्या भारतीय कंपन्यांना होऊ शकतो. त्यात कापड निर्मिती उद्योगातील कंपन्या आहेत.
बांगलादेशातील अस्थिरतेनंतर गोकलदास एक्सपोर्टच्या शेअरमध्ये आज सुमारे १८ टक्क्यांची वाढ झाली. बीएसईवर कंपनीचे शेअर्स ५२ आठवड्यांच्या उच्चांकी पातळीवर पोहोचले. मंगळवारी गोकलदास एक्सपोर्ट्सचा शेअर ९२८.१५ रुपयांवर उघडला आणि सोमवारच्या बंदच्या तुलनेत तो वधारला. त्यानंतर काही वेळातच कंपनीच्या शेअरची किंमत १०९४.३५ रुपयांच्या पातळीवर पोहोचली. हा शेअरचा ५२ आठवड्यांचा उच्चांक आहे. विशेष म्हणजे, गेल्या ५ ट्रेडिंग दिवसांपासून कंपनीच्या शेअर्समध्ये घसरण झाली होती.
बांगलादेश हा वस्त्रोद्योगाचा प्रमुख निर्यातदार आहे. तिथं निर्माण झालेल्या परिस्थितीचा फायदा भारतीय कंपन्यांना होऊ शकतो. शेअर बाजारात सूचीबद्ध असलेल्या टेक्सटाइल क्षेत्रातील कंपन्यांच्या शेअर्समध्ये तेजी आहे. अरविंद लिमिटेड (१६ टक्के), एसपी अपेरल्स (१८ टक्के), सेंच्युरी एन्का (२० टक्के), किटेक्स गारमेंट्स (१६ टक्के) आणि नहार स्पिनिंग (१४ टक्के) हे शेअर वधारले आहेत.
जागतिक व्यापार संघटनेच्या आकडेवारीनुसार अमेरिकेच्या एकूण निर्यातीत बांगलादेशचा वाटा ९ टक्के आहे. हे प्रमाण भारतापेक्षा ६ टक्क्यांनी अधिक आहे. युरोपियन युनियनच्या एकूण निर्यातीपैकी २१ टक्के निर्यात बांगलादेश करतो. सीएनबीसी टीव्ही १८ च्या वृत्तानुसार, या निर्यातीत चीनचा वाटा कमी होत आहे. त्यामुळं भारताला चांगली संधी आहे.
गोकलदास एक्सपोर्ट्सला दुहेरी अंकी वाढीची अपेक्षा आहे. येत्या ३ ते ५ वर्षांत महसूल दुप्पट करण्याच्या दिशेनं कंपनी काम करत आहे. आठ तज्ज्ञांनी या कंपनीचे शेअर खरेदी करण्याचा सल्ला दिला आहे. २०२४ मध्ये आतापर्यंत या कंपनीच्या शेअर्सच्या किंमतीत २४ टक्क्यांनी वाढ झाली आहे.