Bandhan Bank Share Price : जबरदस्त तिमाही निकालाच्या पार्श्वभूमीवर बंधन बँकेचा शेअर सुस्साट सुटला आहे. आज दिवसभरात या बँकेचा शेअर जवळपास १० टक्क्यांनी वधारून १८४.३५ रुपयांच्या पातळीवर पोहोचला.
चालू आर्थिक वर्षाच्या दुसऱ्या तिमाहीत बँकेचा निव्वळ नफा ३० टक्क्यांनी वाढून ९३७ कोटी रुपयांवर पोहोचला आहे. गेल्या वर्षी याच कालावधीत कंपनीचा निव्वळ नफा ७२१ कोटी रुपये होता. बंधन बँकेने शेअर बाजाराला दिलेल्या माहितीनुसार, या तिमाहीत कंपनीचे एकूण उत्पन्न वाढून ६०९५ कोटी रुपयांवर पोहोचले आहे. जुलै ते सप्टेंबर या तिमाहीत बँकेचे व्याज उत्पन्न वाढून ५,५०० कोटी रुपयांवर पोहोचले आहे. २०२३ च्या याच तिमाहीत ते ४४९२ कोटी रुपये होते.
बँकेच्या मालमत्तेच्या गुणवत्तेत सुधारणा झाली असून सप्टेंबर २०२४ अखेरीस सकल अनुत्पादक मालमत्ता (NPA) एकूण कर्जाच्या ४.६८ टक्के होती. गेल्या वर्षी हेच प्रमाण ७.३२ टक्के होतं. निव्वळ एनपीए किंवा बुडीत कर्जेही गेल्या वर्षीच्या २.३२ टक्क्यांवरून १.२९ टक्क्यांवर आली आहेत. मात्र, बँकेचे भांडवल पर्याप्ततेचे प्रमाण गेल्या वर्षी ३० सप्टेंबर रोजी १९.२१ टक्क्यांवरून १४.३४ टक्क्यांवर आले आहे.
जागतिक ब्रोकरेज फर्म नोमुरानं बंधन बँकेचे समभाग 'न्यूट्रल'मध्ये अपग्रेड केले असून प्रति शेअर १८० रुपये उद्दिष्ट ठेवले आहे. मॅक्वेरीनं बंधन बँकेवर 'आउटपरफॉर्म' रेटिंग असून टार्गेट प्राइस २५० रुपये प्रति शेअर आहे. बंधन बँकेवर जेफरीजचे 'बाय' रेटिंग असून प्रति शेअर २४० रुपये उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे.
संबंधित बातम्या