Bajaj Groups Stocks : बजाज स्टील इंडस्ट्रीज लिमिटेडने बोनस शेअर देण्याची घोषणा केली आहे. कंपनी एका शेअरसाठी ३ शेअर्स बोनस म्हणून देणार आहे. यासाठी रेकॉर्ड डेटही निश्चित करण्यात आली असून ती पुढील आठवड्यात आहे. कंपनी पहिल्यांदाच गुंतवणूकदारांना बोनस शेअर्स गिफ्ट करणार आहे.
बजाज स्टील इंडस्ट्रीजनं एक्सचेंजला या संदर्भात माहिती दिली आहे. त्यानुसार, एका शेअरवर ३ शेअर्स बोनस म्हणून दिले जाणार आहेत. या बोनस इश्यूसाठी कंपनीने १२ नोव्हेंबर, मंगळवार ही रेकॉर्ड डेट निश्चित केली आहे. ज्या गुंतवणूकदारांना बोनस समभागांचा लाभ घ्यायचा आहे, त्यांना रेकॉर्ड डेटच्या एक दिवस आधी समभाग खरेदी करावे लागतील.
कंपनी सातत्यानं गुंतवणूकदारांना लाभांश देत आहे. कंपनीनं शेवटचा डिविडंड ऑगस्ट महिन्यात दिला होता. त्यावेळी कंपनीनं प्रति शेअर ३ रुपये लाभांश दिला होता. २०२३ मध्येही बजाज स्टीलनं प्रत्येक शेअरवर ३ रुपये लाभांश दिला होता.
शुक्रवारी बीएसईवर कंपनीचा शेअर ०.२७ टक्क्यांनी घसरून ३४४५.८५ रुपयांवर बंद झाला. गेल्या ३ महिन्यांत कंपनीच्या शेअर्सच्या किंमतीत ७० टक्क्यांहून अधिक वाढ झाली आहे. तर ज्या गुंतवणूकदारांनी ६ महिने शेअर ठेवला आहे, त्यांना आतापर्यंत बजाज स्टीलनं १६६ टक्के परतावा दिला आहे.
गेल्या १ वर्षात कंपनीच्या शेअरच्या किंमतीत २०९ टक्क्यांनी वाढ झाली आहे. कंपनीचा ५२ आठवड्यांचा उच्चांक ३७२४ रुपये आहे आणि कंपनीचा ५२ आठवड्यांचा नीचांकी स्तर १०३०.६० रुपये आहे. कंपनीचे मार्केट कॅप १७९१.८४ कोटी रुपये आहे.