Bonus Shares : एका शेअरवर ३ शेअर मोफत! 'या' कंपनीनं पहिल्यांदाच केली बोनस शेअर्सची घोषणा, भाव वधारला!
मराठी बातम्या  /  बिझनेस  /  Bonus Shares : एका शेअरवर ३ शेअर मोफत! 'या' कंपनीनं पहिल्यांदाच केली बोनस शेअर्सची घोषणा, भाव वधारला!

Bonus Shares : एका शेअरवर ३ शेअर मोफत! 'या' कंपनीनं पहिल्यांदाच केली बोनस शेअर्सची घोषणा, भाव वधारला!

Published Oct 03, 2024 05:04 PM IST

Bajaj Steel Industries Bonus share : बजाज स्टील इंडस्ट्रीजनं गुंतवणूकदारांना दिवाळीआधीच मोठं गिफ्ट दिलं आहे. या कंपनीनं पहिल्यांदाच बोनस शेअर्स इश्यू केले आहेत.

एका शेअरवर ३ शेअर मोफत! कंपनीनं पहिल्यांदाच केली बोनस शेअर्सची घोषणा, भाव वधारला!
एका शेअरवर ३ शेअर मोफत! कंपनीनं पहिल्यांदाच केली बोनस शेअर्सची घोषणा, भाव वधारला!

Baja Steel Share Price : जागतिक घडामोडींच्या पार्श्वभूमीवर आज शेअर मार्केट कोसळत असताना बजाज स्टील इंडस्ट्रीजनं गुंतवणूकदारांंना मोठी खूषखबर दिली. कंपनीनं पहिल्यांदाच बोनस शेअर्सची घोषणा केली. त्यानुसार, कंपनी गुंतवणूकदारांना एका शेअरवर ३ शेअर मोफत देणार आहे.  

नागपूरमध्ये झालेल्या कंपनीच्या संचालक मंडळाच्या बैठकीत ३:१ या प्रमाणात बोनस देण्याच्या प्रस्तावास मान्यता देण्यात आली. एक्सचेंज फाइलिंगनुसार, कंपनीकडून १.५६ अब्ज शेअर्स जारी केले जातील. ही प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर कंपनीच्या एकूण शेअर्सची संख्या २.०८ अब्जांवर जाणार आहे. त्यांचं एकूण मूल्य १०,४०,००,००० रुपये असेल.

संचालक नियुक्तीचाही निर्णय

बोनस शेअरव्यतिरिक्त बजाज स्टील इंडस्ट्रीजच्या संचालक मंडळानं डॉ. महेंद्रकुमार शर्मा यांची १२ नोव्हेंबर २०२४ पासून पुढील पाच वर्षांसाठी कंपनीचे पूर्णवेळ संचालक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून पुन्हा नियुक्ती करण्यास मान्यता दिली. लव बजाज यांची ३ ऑक्टोबर २०२४ पासून पुढील पाच वर्षांसाठी कंपनीच्या अतिरिक्त कार्यकारी संचालकपदी नियुक्ती करण्यासही मान्यता देण्यात आली. गौरव सारडा यांची ३ ऑक्टोबर २०२४ पासून पुढील दोन वर्षांसाठी कंपनीचे अतिरिक्त बिगर कार्यकारी स्वतंत्र संचालक म्हणून नियुक्ती करण्यास संचालक मंडळानं मान्यता दिली आहे.

कशी आहे शेअरची वाटचाल?

शेअर बाजारातील गोंधळाच्या पार्श्वभूमीवर बजाज स्टील इंडस्ट्रीजचा शेअर गुरुवारी एनएसईवर ०.९० टक्क्यांनी घसरून ३३२०१० रुपयांपर्यंत खाली आला. असं असलं तरी बजाज स्टीलच्या शेअरचा प्रवास गुंतवणूकदारांसाठी नेहमीच उत्साहवर्धक आणि फायद्याचा ठरला आहे. या शेअरनं मागच्या ५ वर्षांत गुंतवणूकदारांना २९६० टक्के इतका जबरदस्त परतावा दिला आहे. तर, मागच्या एका वर्षांत हा शेअर २०० टक्क्यांहून जास्त वाढला आहे. यंदाच्या कॅलेंडर वर्षात आतापर्यंत शेअरनं १८८ टक्के परतावा दिला आहे.

कंपनीत प्रवर्तकांचा वाटा किती?

जून तिमाहीअखेर बजाज स्टील इंडस्ट्रीजच्या प्रवर्तकांचा कंपनीत ४८.२७ टक्के हिस्सा होता. बजाज स्टील इंडस्ट्रीजमध्ये कोणत्याही म्युच्युअल फंडाचा हिस्सा नाही. कंपनीचं मार्केट कॅप १.७३ हजार कोटी रुपयांच्या आसपास आहे. कंपनीची स्थापना १९६१ मध्ये झाली होती. ही कंपनी स्क्रू कन्व्हेयर, लिफ्ट, कन्व्हेयिंग सिस्टम, मशीन पार्ट्स, इमारती यासह कॉटन जिनिंग उद्योगासाठी अनेक उत्पादनं आणि सेवा पुरवते.

 

(डिस्क्लेमर: हे वृत्त केवळ माहितीपर आहे. हा कोणत्याही प्रकारच्या गुंतवणुकीचा सल्ला नाही. शेअर बाजारातील गुंतवणुकीत जोखीम असते. त्यामुळं गुंतवणूक करण्याआधी आर्थिक सल्लागाराशी चर्चा करा.)

Whats_app_banner