IPO Listing Today : आयपीओची घोषणा झाल्यापासूनच प्रचंड चर्चेत असलेला बजाज हाऊसिंग फायनान्सचा शेअर आज बाजारात सूचीबद्ध झाला. एनएसई आणि बीएसई या दोन्ही प्लॅटफॉर्मवर या शेअरनं दणक्यात पदार्पण केलं. तब्बल ११४ टक्के वाढीसह हा शेअर सूचीबद्ध झाला. त्यामुळं पहिल्याच दिवशी गुंतवणूकदारांचे पैसे दुप्पट झाले आहेत.
व्यवस्थापनांतर्गत मालमत्तेच्या (AUM) निकषानुसार देशातील दुसऱ्या क्रमांकाची गृहकर्ज वित्तपुरवठादार कंपनी असलेल्या बजाज हाऊसिंग फायनान्सचा आयपीओ मागील आठवड्यात दाखल झाला होता. बजाज समूहाचं नाव, कंपनीचा आतापर्यंतचा ट्रॅक रेकॉर्ड आणि आर्थिक स्थिती मजबूत असल्यामुळं आयपीओला तुफान प्रतिसाद मिळाला.
आयपीओमधून मिळणारी निव्वळ कमाई कंपनी भविष्यातील कर्जाशी संबंधित व्यावसायिक गरजा पूर्ण करण्यासाठी वापरणार आहे. कंपनीची एकूण परिस्थिती पाहता गुंतवणूकदारांनी मध्यम ते दीर्घकालीन गुंतवणुकीचा विचार करावा, असं तज्ज्ञांचं मत आहे.
बजाज हाऊसिंग फायनान्सच्या तथा बीएचएफलच्या आयपीओसाठी दरपट्टा ६६ ते ७० रुपये प्रति शेअर असा होता. यात ५० टक्के शेअर पात्र संस्थात्मक खरेदीदारांसाठी (QIB), १५ टक्के बिगर संस्थात्मक गुंतवणूकदारांसाठी (NII) आणि ऑफरच्या किमान ३५ टक्के हिस्सा किरकोळ गुंतवणूकदारांसाठी राखून ठेवण्यात आले होते. रिटेल, संस्थात्मक आणि बिगर संस्थात्मक गुंतवणूकदारांच्या मानक आरक्षणाव्यतिरिक्त शेअरहोल्डर्ससाठी एक विशिष्ट कोटा राखून ठेवण्यात आला होता.
बजाज हाऊसिंग फायनान्स ही कंपनी गृहकर्ज वितरणाच्या व्यवसायात आहे. ही नॉन डिपॉझिट हाऊसिंग वित्त पुरवठादार कंपनी आहे. आर्थिक वर्ष २०१८ पासून ही कंपनी तारण घेऊन कर्ज पुरवण्याचं काम करते. बजाज फायनान्स या बड्या कंपनीच्या पूर्ण मालकीची ही उपकंपनी आहे. बजाज फायनान्समध्ये बजाज फिनसर्व्हची ५१.३४ टक्के हिस्सेदारी आहे.