IPO news : बजाज हाउसिंग फायनान्सचा आयपीओ येतोय! शेअरची किंमतही ठरली! जाणून घ्या सर्वकाही-bajaj housing finance ipo to be open on 9 september check ipo price lot size and other key details ,बिझनेस बातम्या
मराठी बातम्या  /  बिझनेस  /  IPO news : बजाज हाउसिंग फायनान्सचा आयपीओ येतोय! शेअरची किंमतही ठरली! जाणून घ्या सर्वकाही

IPO news : बजाज हाउसिंग फायनान्सचा आयपीओ येतोय! शेअरची किंमतही ठरली! जाणून घ्या सर्वकाही

Sep 03, 2024 01:20 PM IST

Bajaj Housing Finance IPO : बजाज हाऊसिंग फायनान्सचा आयपीओ ९ सप्टेंबररोजी खुला होणार आहे. आयपीओसाठी प्राइस बँड ६६ ते ७० रुपये निश्चित करण्यात आला आहे. ग्रे मार्केटमध्ये आयपीओ सातत्याने चांगली कामगिरी करत आहेत.

IPO news : बजाज हाउसिंग फायनान्सचा आयपीओ येतोय! शेअरची किंमतही ठरली!
IPO news : बजाज हाउसिंग फायनान्सचा आयपीओ येतोय! शेअरची किंमतही ठरली!

IPO News : आयपीओ गुंतवणूकदारांसाठी खूषखबर आहे. उद्योग जगतात प्रतिष्ठित नाव असलेल्या बजाज उद्योग समूहातील बजाज हाऊसिंग फायनान्स कंपनीचा आयपीओ येत्या ९ सप्टेंबरला खुला होणार आहे. कंपनीनं या आयपीओचा दरपट्टा जाहीर केला आहे. त्यानुसार, १० रुपयांच्या अंकित मूल्यासाठी (Face Value) ७० ते ६६ रुपयांचा प्राइस बँड निश्चित केला आहे.

गुंतवणूकदारांना ९ सप्टेंबर २०२४ पासून या आयपीओसाठी अर्ज करता येणार आहे. तर, ११ सप्टेंबरपर्यंत हा आयपीओ सबस्क्रिप्शनसाठी खुला असेल. अँकर गुंतवणूकदारांसाठी (मोठ्या गुंतवणूकदारांसाठी) आयपीओ ६ सप्टेंबर रोजी खुला होणार आहे.

ग्रे मार्केटमध्ये काय आहे स्थिती?

बजाज हाउसिंग फायनान्सचा आयपीओ ग्रे मार्केटमध्ये उत्तम कामगिरी करत आहे. इन्व्हेस्टर्स गेन्सच्या अहवालानुसार, आयपीओ आज ५५.५० रुपयांच्या प्रीमियमवर व्यवहार करत आहे. लिस्टिंगपर्यंत हीच परिस्थिती राहिल्यास आयपीओची लिस्टिंग १२० रुपयांच्या पुढे जाऊ शकते. तसं झाल्यास गुंतवणूकदारांना आधीच मोठा फायदा होणार आहे.

आयपीओविषयी सविस्तर

बजाज हाऊसिंग फायनान्स आयपीओच्या माध्यमातून ऑफर फॉर सेल अंतर्गत ३,००० कोटी रुपयांचे शेअर्स जारी करणार आहे. तर, ३६५० कोटी रुपयांचे शेअर्स नव्यानं विक्रीस काढले जाणार आहेत. पात्र संस्थात्मक खरेदीदारांसाठी जास्तीत जास्त ५० टक्के राखीव ठेवण्यात येणार आहे. किमान १५ टक्के हिस्सा बिगर संस्थात्मक गुंतवणूकदारांसाठी राखीव ठेवण्यात येणार आहे. तर, किरकोळ गुंतवणूकदारांसाठी किमान ३५ टक्के शेअर राखीव ठेवण्यात येणार आहेत. कंपनीचा आयपीओ १२ सप्टेंबर रोजी वितरीत केला जाईल. तर, लिस्टिंग १६ सप्टेंबरला अपेक्षित आहे.

बजाज फायनान्सच्या आयपीओसाठी कोटक महिंद्रा बँक, बोफा सिक्युरिटीज इंडिया लिमिटेड, अ‍ॅक्सिस कॅपिटल लिमिटेड, गोल्डमन सॅक्स (इंडिया) सिक्युरिटीज प्रायव्हेट लिमिटेड, एसबीआय कॅपिटल मार्केट्स लिमिटेड, जेएम फायनान्शियल लिमिटेड आणि आयआयएफएल सिक्युरिटीज यांना प्रमुख व्यवस्थापक म्हणून नियुक्त करण्यात आले आहे.

काय करते ही कंपनी?

बजाज हाऊसिंग फायनान्स ही नॅशनल हाऊसिंग बँक (NHB) कडे २०१५ पासून नोंदणीकृत असलेली गृहनिर्माण वित्त कंपनी आहे. निवासी आणि व्यावसायिक मालमत्तांचे नूतनीकरण आणि खरेदीसाठी ही कंपनी अर्थसहाय्य पुरवते. आर्थिक वर्ष २०२३-२४ या वर्षात बजाज हाउसिंग फायनान्सनं १७३१ कोटींचा निव्वळ नफा कमावला आहे. मागील वर्षीच्या तुलनेत तो ३८ टक्क्यांनी जास्त आहे.

 

(डिस्क्लेमर : हे वृत्त केवळ माहितीपर आहे. हा कोणत्याही प्रकारचा गुंतवणुकीचा सल्ला नाही. शेअर बाजारातील गुंतवणुकीत जोखीम असते. गुंतवणूक करण्यापूर्वी आपल्या सल्लागाराचा सल्ला घ्या.)

विभाग