bajaj ipo : बजाज हाऊसिंग फायनान्सच्या आयपीओची जोरदार चर्चा! सबस्क्राइब करावा का? पाहा जीएमपी व इतर माहिती-bajaj housing finance ipo day 1 should you subscribe check gmp review more ,बिझनेस बातम्या
मराठी बातम्या  /  बिझनेस  /  bajaj ipo : बजाज हाऊसिंग फायनान्सच्या आयपीओची जोरदार चर्चा! सबस्क्राइब करावा का? पाहा जीएमपी व इतर माहिती

bajaj ipo : बजाज हाऊसिंग फायनान्सच्या आयपीओची जोरदार चर्चा! सबस्क्राइब करावा का? पाहा जीएमपी व इतर माहिती

Sep 09, 2024 11:19 AM IST

Bajaj Housing Finance IPO Day : बजाज हाऊसिंग फायनान्स लिमिटेडचा आयपीओ आजपासून सबस्क्रिप्शनसाठी खुला झाला आहे.

बजाज हाऊसिंग फायनान्सच्या आयपीओची चर्चा मोठी! सबस्क्राइब करावा का? पाहा जीएमपी व इतर माहिती
बजाज हाऊसिंग फायनान्सच्या आयपीओची चर्चा मोठी! सबस्क्राइब करावा का? पाहा जीएमपी व इतर माहिती

भारतातील गृहनिर्माण वित्त उद्योगातील आघाडीची कंपनी बजाज हाऊसिंग फायनान्स लिमिटेड (BHFL)चा आयपीओ आजपासून सबस्क्रिप्शनसाठी खुला झाला आहे. बजाज समूहासारखं मोठं नाव पाठिशी असल्यानं या आयपीओची मार्केटमध्ये मोठी चर्चा आहे. येत्या ११ सप्टेंबरपर्यंतसाठी यात गुंतवणूक करता येणार आहे. 

बजाज हाऊसिंग फायनान्सच्या आयपीओसाठी दरपट्टा ६६ ते ७० रुपये प्रति शेअर निश्चित करण्यात आला आहे. या आयपीओतील ५० टक्के शेअर पात्र संस्थात्मक खरेदीदारांसाठी (QIB), १५ टक्के बिगर संस्थात्मक गुंतवणूकदारांसाठी (NII) आणि ऑफरच्या किमान ३५ टक्के हिस्सा किरकोळ गुंतवणूकदारांसाठी राखीव ठेवण्यात आला आहे. किरकोळ, संस्थात्मक आणि बिगर संस्थात्मक गुंतवणूकदारांसाठी मानक आरक्षणाव्यतिरिक्त शेअरहोल्डर्ससाठी एक विशिष्ट कोटा राखून ठेवण्यात आला आहे.

काय करते बीएचएफएल?

बजाज हाऊसिंग फायनान्स ही कंपनी कर्ज वितरणाच्या व्यवसायात आहे. ही नॉन डिपॉझिट हाऊसिंग फायनान्सिंग कंपनी आहे. आर्थिक वर्ष २०१८ पासून ही कंपनी तारण घेऊन कर्ज पुरवण्याचं काम करते. ही बजाज फायनान्सची पूर्ण मालकीची उपकंपनी आहे. बजाज फायनान्समध्ये बजाज फिनसर्व्हची ५१.३४ टक्के हिस्सेदारी आहे.

काय आहे आयपीओ सब्सक्रिप्शन स्टेटस?

बीएसईच्या आकडेवारीनुसार, बजाज हाऊसिंग फायनान्सचा आयपीओ पहिल्या दिवशी ७ टक्के वेळा सब्सक्राइब झाली आहे. बीएसईच्या आकडेवारीनुसार, सुरुवातीच्या विक्रीत ७२,७५,७५,७५६ शेअर्सच्या तुलनेत ५,४२,९६,९३६ शेअर्ससाठी बोली लागली होती.

किरकोळ गुंतवणुकदारांच्या श्रेणीत ९ टक्के, तर बिगर संस्थात्मक गुंतवणूकदारांसाठी १८ टक्के सब्सक्रिप्शन मिळालं. पात्र संस्थात्मक खरेदीदार (QIB) श्रेणीत अद्याप बुकिंग झालेलं नाही. कर्मचारी विभागात १% आणि विद्यमान भागधारक विभागात ५% सबस्क्रिप्शन मिळालं आहे. 

एक्सपर्ट्स काय म्हणतात…

स्वस्तिका इन्व्हेस्टमार्ट लिमिटेड ब्रोकरेजनुसार, बजाज हाऊसिंग फायनान्सला प्रसिद्ध बजाज समूहाच्या नावाचा फायदा होऊ शकतो. बीएचएफलचा व्यवसाय स्थिर राहिला असून विक्री आणि नफ्यात वाढ दर्शविली आहे. आयपीओचं मूल्यांकनही वाजवी आहे. आयपीओला मोठी मागणी आणि अपेक्षा आहेत. कंपनीचा मजबूत इतिहास, उत्कृष्ट आर्थिक कामगिरी आणि उत्तम बाजारपेठ लक्षात घेता लिस्टिंगच्या दिवशी नफा आणि दीर्घकालीन फायद्यासाठी आयपीओ घेता येईल.

स्टोक्सबॉक्सचे संशोधन विश्लेषक प्रथमेश मासडेकर यांनीही बीएचएफलच्या आयपीओबाबत आशावाद व्यक्त केला आहे. आर्थिक वर्ष २०२५ च्या पहिल्या तिमाहीपर्यंत बजाज हाऊसिंग फायनान्सचं एकूण बाजारमूल्य ९७१ अब्ज रुपये आहे. बजाज फायनान्सद्वारे प्रवर्तित ही सर्वात मोठी नॉन-डिपॉझिट घेणारी एचएफसी आहे. २१५ शाखांसह ही कंपनी ८ महानगरांमध्ये कार्यरत आहे.

आर्थिक वर्ष २०२२ ते २०२४ दरम्यान कंपनीचं बाजारमूल्य ३०.९ चक्रवाढ वार्षिक वाढीच्या दरानं वाढलं. सध्याची वाटचाल पाहता रिझर्व्ह बँकेनं या कंपनीला भारतातील चौथ्या क्रमांकाची एनबीएफसी म्हणून स्थान दिलं आहे. भविष्यवेधी धोरणात्मक निर्णयामुळं कंपनीला भविष्यात वाढीची संधी आहे, असं मासडेकर यांना वाटतं.

ग्रे मार्केटमध्ये काय आहे स्थिती?

बजाज हाऊसिंग फायनान्सचा आयपीओ जीएमपी + ५६ आहे. या कंपनीच्या शेअरचा भाव ग्रे मार्केटमध्ये ५६ रुपयांच्या प्रीमियमवर व्यवहार करत असल्याची माहिती investorgain.com नं दिली आहे. सध्याची स्थिती लक्षात घेता हा शेअर आयपीओ किंमतीपेक्षा ८० टक्क्यांनी वाढून लिस्ट होऊ शकतो.

 

(डिस्क्लेमर: हे वृत्त केवळ माहितीपर आहेत. यातील तज्ज्ञांची मतं व शिफारशी त्यांच्या वैयक्तिक आहेत. हिंदुस्तान टाइम्स मराठीच्या नाहीत. हा कोणत्याही प्रकारच्या गुंतवणुकीचा सल्ला नाही. शेअर बाजारातील गुंतवणुकीत जोखीम असते. त्यामुळं निर्णय घेण्याआधी आपल्या आर्थिक सल्लागाराशी चर्चा करावी.)

Whats_app_banner