Bajaj Freedom worlds first CNG bike Launched : सीएनजी बाइकच्या निर्मितीत भारतानं जगात आघाडी घेतली आहे. बजाज ऑटोनं कॉम्प्रेस्ड नॅचरल गॅस (CNG) वर चालणारी जगातील पहिली मोटारसायकल बाजारात आणली आहे.
‘फ्रीडम १२५’ असं या बाइकचं नाव आहे. १२५ सीसीची ही कम्युटर बाइक पेट्रोल आणि सीएनजी अशी दोन्हीवर चालते. सीएनजी बाइकची ऑपरेशनल कॉस्ट कमी करणं हा यामागचा उद्देश आहे. फ्रीडम १२५ ची एक्स-शोरूम किंमत ९५ हजार ते १ लाख १० हजार रुपये (एक्स-शोरूम) इतकी आहे. सुरुवातील ही बाइक गुजरात व महाराष्ट्राच्या रस्त्यावर धावेल. नंतर इजिप्त, टांझानिया, पेरू, इंडोनेशिया आणि बांगलादेश या बाजारपेठांमध्ये निर्यात करण्याची कंपनीची योजनाआहे.
फ्रीडम १२५ ही बाइक किफायतशीर मध्यमवर्गीय ग्राहकांना डोळ्यापुढं ठेवून बनविण्यात आली आहे. ही बाइक अन्य प्रतिस्पर्धी बाइकच्या तुलनेत इंधन खर्चात ५० टक्के कपात करते. छोटी पेट्रोल टाकी आणि सीएनजी सिलिंडरनं सुसज्ज असलेली ही मोटारसायकल आहे. हँडलबार-माउंटेड स्विचचा वापर करून चालक सीएनजी वरून पेट्रोल किंवा पेट्रोलवरून सीएनजी असं स्विच करू शकतात.
> ‘फ्रीडम १२५’मधील पेट्रोलच्या टँकखाली असलेला सीएनजी सिलिंडर बाइकच्या डिझाइनशी मेळ खाणारा आहे. त्यामुळं ही बाइक इतर मॉडेल्सपेक्षा वेगळी ठरते.
> इंधनाच्या स्टोरेजची स्वतंत्र सोय म्हणून या मोटारसायकलमध्ये सीएनजी आणि पेट्रोलसाठी स्वतंत्र फिलर नोझल देण्यात आले आहेत.
> पेट्रोल टाकीची क्षमता २ लिटर, तर सीएनजी टँकची क्षमता २ किलो आहे. ही बाइक फक्त सीएनजीवर २१३ किमी पर्यंत अंतर कापू शकते. पेट्रोल टँकद्वारे अतिरिक्त ११७ किमी प्रवास करू शकते. याचाच अर्थ पूर्ण क्षमतेनं इंधन भरलेलं असल्यास ही बाइक एकूण ३३० किमीचं अंतर कापू शकते.
१२५ सीसी सिंगल सिलिंडर, एअर कूल्ड इंजिन आणि फ्यूल इंजेक्शनसह फ्रीडम १२५ ९.४ बीएचपी पॉवर आणि ९.७ एनएम टॉर्क जनरेट करते.
बाइकमध्ये टेलिस्कोपिक फ्रंट फोर्क आणि रियर मोनोशॉक देण्यात आला आहे. यात १७ इंचाच्या अलॉय व्हीलचा समावेश आहे.
फ्रीडम १२५ चा लूक आकर्षक आहे. गाडीच्या डिझानमध्ये आधुनिक-रेट्रो सौंदर्यशास्त्राचा अवलंब केला आहे. बाइकच्या डिझाइनमध्ये फ्लॅट सीट, रुंद हँडलबार आणि न्यूट्रल रायडिंग पोझिशनसाठी सेंटर-सेट फूट पेगचा समावेश आहे. बाइकमधील सेमी-डिजिटल इंस्ट्रूमेंट क्लस्टर अनेक गोष्टींबाबत अलर्ट करते. सीएनजीची पातळी आणि न्यूट्रल गिअर इंडिकेटरचाही सिग्नल देते.