Share Market news : शेअर बाजारात आज पडझड सुरू असून त्याचा फटका काही चांगल्या शेअर्सना बसला आहे. बजाज ऑटोचा दुसऱ्या तिमाहीचा निकाल जाहीर झाला असून कंपनीचा निव्वळ नफा वाढूनही शेअर आज १३ टक्क्यांहून जास्त घसरला आहे. त्यामुळं गुंतवणूकदारांमध्ये संभ्रम आहे.
बजाज ऑटोनं आर्थिक वर्ष २०२५ च्या दुसऱ्या तिमाहीत २००५.०४ कोटी रुपयांचा निव्वळ नफा कमावला आहे. गेल्या वर्षीच्या याच कालावधीतील १८३६.१४ कोटी रुपयांच्या तुलनेत हा आकडा ९.२ टक्क्यांनी अधिक आहे. तर, दुसऱ्या तिमाहीत कंपनीचा एकूण परिचालनातून मिळणारा महसूल २२ टक्क्यांनी वाढून १३१२७.४७ कोटी रुपये झाला आहे.
या तिमाहीत एबिटडा २४.४ टक्क्यांनी वाढून २,१२२ कोटी रुपयांवरून २६५२.४ कोटी रुपयांवर पोहोचला, तर एबिटडा मार्जिन १९.८ टक्क्यांवरून ४० बीपीएसनं वाढून २०.२ टक्के झालं आहे.
तिमाही निकाल उत्तम असतानाही बजाज ऑटोचा शेअर आज मोठ्या प्रमाणावर घसरला आहे. दिवसअखेर हा शेअर १३.११ टक्क्यांनी घसरून १०,०९३.५० रुपयांवर बंद झाला. मागच्या महिनाभरात हा शेअर १४.४५ टक्क्यांनी घसरला आहे. तर, मागील सहा महिन्यांत कंपनीनं गुंतवणूकदारांना १३.३३ टक्के परतावा दिला आहे. चालू कॅलेंडर वर्षांत बजाज ऑटोच्या शेअरमध्ये ५३ टक्क्यांहून अधिक वाढ झाली असून गेल्या वर्षभरात १०१ टक्क्यांहून अधिक मल्टीबॅगर परतावा दिला आहे.
एमके ग्लोबल फायनान्शियल सर्व्हिसेसचे वरिष्ठ संशोधन विश्लेषक चिराग जैन यांनी दिलेल्या माहितीनुसार, 'कंपनीची टू-व्हीलर रिटेलमधील वाढ मंदावली असून, झपाट्यानं वाढणाऱ्या १२५ सीसी श्रेणीतील बाजारातील हिस्सा कमी झाला आहे. सणासुदीच्या दिवसात कामगिरी अशीच कायम राहिल्यास आर्थिक वर्ष २०२५ मध्ये उद्योगवाढीचा दर ८ टक्क्यांऐवजी ५ टक्क्यांच्या आसपास राहील, असा व्यवस्थापनाचा अंदाज आहे. ब्रोकरेज फर्मनं बजाज ऑटोची लक्ष्य किंमत बदलून ९,५०० रुपये प्रति शेअर निश्चित केली आहे.
एमके ग्लोबलनं हिरो मोटोकॉर्पला झुकतं माप दिलं आहे. त्यांचा रिस्क-रिवार्ड रेश्यो उत्तम असल्याचं ब्रोकरेजचं म्हणणं आहे. तर, टीव्हीएस मोटर कंपनीला टू-व्हीलर सेगमेंटमध्ये वाढीस वाव आहे, असा ब्रोकरेजचा अंदाज आहे.
विदेशी ब्रोकरेज फर्म सिटीनं बजाज ऑटोला 'सेल' रेटिंग दिलं असून टार्गेट प्राइस प्रति शेअर ७,८०० रुपये ठेवली आहे. एएसपी आणि ग्रॉस मार्जिनमध्ये किंचित घट झाल्यामुळं बजाज ऑटोचे दुसऱ्या तिमाहीचे निकाल अंदाजापेक्षा किंचित कमी होते.
नुवामा इन्स्टिट्यूशनल इक्विटीजनं बजाज ऑटोबद्दल सकारात्मक मत व्यक्त केलं आहे.
संबंधित बातम्या