Baba Kalyani News : आईची समाधी वडिलांच्या समाधीच्या बाजूला उभारण्यासाठी सुरूवातीला स्पष्ट नकार देणाऱ्या प्रसिद्ध उद्योजक बाबा कल्याणी यांनी बहीण सुगंधा हिरेमठ व भाऊ गौरीशंकर कल्याणी यांना भेटण्याची तयारी दर्शविली आहे.
समाधी बांधण्यावरून बाबा कल्याणी यांची बहिण सुगंधा हिरेमठ यांनी न्यायालयात दावा दाखल केल्यानंतर या दाव्याच्या पहिल्या सुनावणीदरम्यान बाबा कल्याणी यांनी समाधीबाबत भावंडांशी चर्चा करायला तयार असल्याची भूमिका वकिलांमार्फत मांडली. परिणामी, न्यायालयाकडून या चर्चेसाठी २० फेब्रुवारीची तारीख देण्यात आली आहे. या चर्चेनंतरच खटल्याचे भवितव्य ठरेल, असे न्यायालयाकडून सांगण्यात आले आहे.
फेब्रुवारी २०२३ मध्ये बाबा कल्याणी, सुगंधा कल्याणी व गौरीशंकर कल्याणी यांच्या आई सुलोचना कल्याणी यांचे निधन झाल्यानंतर त्यांची समाधी केशवनगर, मुंढवा येथील कल्याणी कुटुंबाच्या जागेमध्ये नीलकंठ कल्याणी यांच्या समाधीच्या बाजूला उभारली जावी, अशी इच्छा सुगंधा हिरेमठ यांनी व्यक्त केली होती. त्यासाठी त्यांनी बाबा कल्याणी यांना पत्र लिहून समाधी उभारण्याची परवानगी मागितली. समाधीचा सर्व खर्च सुगंधा स्वतः करतील, असे आश्वासनही दिले.
गेल्या आठवड्यात सुगंधा हिरेमठ यांनी पुणे दिवाणी न्यायालयात दावा दाखल केला. सुलोचना कल्याणी यांनी निधनापूर्वी आपले पती, डॉ. नीलकंठ कल्याणी यांच्या शेजारी समाधी व्हावी, अशी इच्छा व्यक्त केली होती. मात्र, बाबा कल्याणी यांनी ही मागणी पूर्णतः फेटाळली. सुगंधा यांच्या दाव्यानुसार, ते लिंगायत समाजातील असल्याने त्यांच्या आईच्या पार्थिवाचे पारंपरिक पद्धतीने समाधीकरण होणे आवश्यक होते. मात्र, आईच्या मृत्यूनंतर दुसऱ्याच दिवशी बाबा कल्याणी यांनी अंत्यसंस्कार करण्याचा निर्णय घेतला. त्यानंतर, सुगंधा यांनी त्यांना संदेश पाठवून म्हटले होते, "बाबा, मी दिवसभर ह्याच विचारात होते की, आईसुद्धा बाबांच्या (डॉ. नीलकंठ) शेजारीच समाधीत विसावलेली असती, तर तिला आनंद झाला असता. आता फक्त अस्थी शिल्लक असल्याने जागेची अडचण येणार नाही. कृपया आईसाठी तरी विचार करा."
गुरूवारी दोन्ही पक्षांची बाजू न्यायालयाने ऐकून घेतली. २० फेब्रुवारीच्या बैठकीनंतर न्यायालय पुढील कार्यवाही ठरवेल, असे संयुक्त दिवाणी न्यायाधीश के. एम. जयसिंगानी यांनी सांगितले.
दरम्यान,बाबा कल्याणी यांच्या वकिलांनी पुण्याच्या दिवाणी न्यायालयात बाबा कल्याणी यांचे पत्र सादर केले असून, त्यामध्ये बाबा कल्याणी यांनी सदिच्छेने आपल्या भावंडांना भेटून कौटुंबिक गुरुजींच्या सल्ल्याने पूजा विधी करून आईची समाधी बांधण्यासाठी तयारी दर्शविली आहे.
सुलोचना कल्याणी यांचे निधन २५ फेब्रुवारी २०२३ रोजी झाले. धर्मशास्त्रानुसार त्यांच्यावर विधीपूर्वक अंत्यसंस्कार करण्यात आले. मंत्रोच्चारात त्यांच्या पार्थिवाला अग्नि देण्यात आला. त्यानंतर दुसऱ्या दिवशी सर्व भावंडांच्या उपस्थितीत अस्थी-विसर्जनाची प्रक्रिया पार पडली. कल्याणी कुटुंबाच्या गुरुजींच्या सल्ल्याने सर्व अंत्यसंस्कार विधीपूर्वक करण्यात आले. त्याला सुगंधा हिरेमठ व गौरीशंकर कल्याणी यांची मान्यता होती, असे बाबा कल्याणी यांनी २५ डिसेंबर २०२४ रोजी लिहिलेल्या पत्रात नमूद आहे. मात्र, त्यानंतरही सुगंधा हिरेमठ यांनी सध्याचा दावा दाखल केला.
या प्रकरणाला पूर्णविराम देण्यासाठी बाबा कल्याणी यांनी सदिच्छेने आपल्या भावंडांना भेटण्याची तयारी दर्शविली आहे.
संबंधित बातम्या