IPO Listing news today : आयपीओ आल्यापासून चर्चेत असलेल्या बाजार स्टाईलच्या शेअरनं गुंतवणूकदारांची निराशा केली आहे. या शेअरचं बाजारात थंड स्वागत झालं. हा शेअर एनएसई आणि बीएसईवर आज आयपीओच्या मूळ किंमतीवर, म्हणजे ३८९ रुपयांवर खुला झाला.
कपडे आणि सामान्य वस्तू क्षेत्रात परवडणाऱ्या आणि उच्च दर्जाच्या उत्पादनांसाठी ओळखल्या जाणाऱ्या बाजार स्टाइल या फॅशन रिटेलरचा शेअर १० ते १६ टक्क्यांनी वधारून बाजारात लिस्ट होईल, असा अंदाज बाजारतज्ज्ञांनी व्यक्त केला होता. तो फोल ठरला. बाजार स्टाईलच्या आयपीओचं सब्सक्रिप्शन मंगळवार, ३ सप्टेंबर रोजी बंद झालं. या आयपीओची किंमत ३७० ते ३८९ रुपये प्रति शेअर होती. कंपनीनं अँकर गुंतवणूकदारांकडून आधीच २५० कोटी रुपये उभारले आहेत.
रेखा झुनझुनवाला यांचा सहभाग असलेल्या बाजार स्टाईल रिटेलच्या आयपीओला सबस्क्रिप्शनच्या शेवटच्या दिवशी ४०.६३ पट सब्सक्रिप्शन मिळालं. क्वालिफाइड इन्स्टिट्यूशनल बायर्स (क्यूआयबी) च्या श्रेणीत आयपीओला ८१.८३ पट, तर बिगर संस्थात्मक गुंतवणूकदारांच्या श्रेणीत ५९.४१ पट सब्सक्रिप्शन मिळालं. किरकोळ गुंतवणुकदारांच्या श्रेणीतील सबस्क्रिप्शनमध्ये ९.०७ पट वाढ झाली.
जून २०१३ साली स्थापन झालेली बाजार स्टाइल रिटेल लिमिटेड कंपनी पश्चिम बंगाल आणि ओडिशामध्ये फॅशन रिटेलर म्हणून सक्रिय आहे. ही कंपनी सर्व वयोगटातील पुरुष-महिलांसाठी वैविध्यपूर्ण फॅशनच्या दर्जेदार कपड्यांची विक्री करते. तसंच, आवश्यक घरगुती वस्तू आणि इतर उत्पादनं उपलब्ध करून देते.
सेबीच्या वेबसाइटवर उपलब्ध असलेल्या बाजार स्टाइल रिटेल आयपीओच्या आरएचपीनुसार, रेखा झुनझुनवाला यांचं नाव ऑफर फॉर सेल अंतर्गत शेअर विक्री करणाऱ्यांच्या यादीत आहे. या आयपीओच्या माध्यमातून झुनझुनवाला यांनी स्वत:कडील २७,२३,१२० इक्विटी शेअर्स विक्रीस काढले होते. या शेअर्सचं मूल्य सुमारे १०६ कोटी रुपये होतं.
आयपीओच्या माध्यमातून मिळणाऱ्या रकमेचा वापर कंपनीच्या थकित कर्जाची परतफेड करण्यासाठी व इतर व्यावसायिक कारणांसाठी केला जाणार आहे. बाजार स्टाईल रिटेल आयपीओचे बुक रनिंग लीड मॅनेजर अॅक्सिस कॅपिटल लिमिटेड, इंटेन्सिव्ह फिस्कल सर्व्हिसेस प्रायव्हेट लिमिटेड आणि जेएम फायनान्शियल लिमिटेड आहेत. लिंक इनटाइम इंडिया प्रायव्हेट लिमिटेड हे या इश्यूचे रजिस्ट्रार होते.