IPO News in marathi : सप्टेंबर महिन्यात शेअर मार्केटमध्ये आयपीओची धूम आहे. रोजच्या रोज काही ना काही सुरू आहे. काही आयपीओ येत आहेत, तर काही सूचीबद्ध होत आहेत. गेल्या आठवड्यात आलेल्या बाजार स्टाईल रिटेल लिमिटेडचा आयपीओ आज सबस्क्रिप्शनसाठी बंद होत आहे. हा आयपीओ गुंतवणूक करण्यायोग्य आहे का जाणून घेऊया…
बाजार स्टाईल रिटेलच्या आयपीओचा दरपट्टा ३७० ते ३८९ रुपये प्रति इक्विटी शेअर आहे. या आयपीओतून ८३४.६८ कोटी रुपये उभे करण्याचे उद्दिष्ट ठेवले आहे. नव्यानं शेअर्सची विक्री करून १४८ कोटी रुपये आणि ऑफर फॉर सेलच्या माध्यमातून ६८६.६८ कोटी रुपये उभारण्यात येणार आहेत. दोन दिवसांत हा आयपीओ ७२ टक्के सबस्काइब झाला आहे.
ग्रे मार्केटनं बाजार स्टाइल रिटेल आयपीओबाबत सकारात्मक संकेत दिले आहेत. शेअर बाजार निरीक्षकांच्या मते, आजच्या ग्रे मार्केटमध्ये बाजार स्टाईल रिटेल लिमिटेडचे शेअर्स ६२ रुपयांच्या प्रीमियमवर उपलब्ध आहेत. हाच कल कायम राहिल्यास कंपनीच्या शेअरची लिस्टिंग १६ टक्के प्रीमियमवर होईल.
सबस्क्रिप्शनच्या तिसऱ्या दिवशी दुपारी १ वाजून २७ मिनिटांपर्यंत हा आयपीओ ११.५५ पट सबस्क्राइब झाला आहे. रिटेल श्रेणीत ६.५२ पट, एनआयआय श्रेणीत ३३.१२ पट आणि क्यूआयबी भाग ४.३७ पट सब्सस्क्रिप्शन मिळालं आहे.
अरिहंत कॅपिटलनं या आयपीओला सबस्क्राइब टॅग दिला आहे. कंपनी मजबूत वाढ आणि नफा कमावण्याच्या स्थितीत आहे. आर्थिक वर्ष २०२४ मध्ये कंपनीचा नफा महसुलाच्या ३७.९३ टक्के इतका होता.
मास्टर कॅपिटलनं या मेनबोर्ड आयपीओला 'सबस्क्राइब' टॅग दिला आहे. आर्थिक वर्ष २०२२-२४ दरम्यान कंपनीचा महसूल ३३ टक्के सीएजीआरनं वाढला, तर याच कालावधीत एकूण जीवनशैली आणि होम व्हॅल्यू रिटेल मार्केटमध्ये १९.३ टक्के सीएजीआरनं वाढ झाली.
'टी + ३' लिस्टिंग नियमाच्या पार्श्वभूमीवर, बाजार स्टाइल रिटेल आयपीओ ४ सप्टेंबर २०२४ रोजी वितरीत होणं अपेक्षित आहे, तर आयपीओ लिस्टिंग तारीख ६ सप्टेंबर २०२४ ला होण्याची शक्यता आहे.
सेबीच्या वेबसाइटवर उपलब्ध असलेल्या बाजार स्टाइल रिटेल आयपीओच्या आरएचपीनुसार, रेखा झुनझुनवाला यांचं ऑफर फॉर सेल अंतर्गत शेअर विक्री करणाऱ्यांच्या यादीत आहे. त्यांनी स्वत:कडील २७,२३,१२० इक्विटी शेअर्स विक्रीस काढले आहेत. या शेअर्सचं मूल्य सुमारे १०६ कोटी रुपये आहे.