Happy Birthday Azim Premji : देशातील सर्वात मोठ्या आयटी कंपन्यांपैकी एक असलेल्या विप्रोचे संस्थापक अझीम प्रेमजी यांचा आज ७८ वा वाढदिवस. त्यांचा जन्म २४ जुलै १९४५ रोजी मुंबईत झाला. अझीम प्रेमजी हे देशातील सर्वात मोठ्या दानशुर व्यक्तींपैकी एक आहेत. एडलगिव्ह हुरुन इंडिया फिलान्थ्रॉपी लिस्ट २०२२ नुसार, अझीम प्रेमजी यांनी २०२१-२२ या आर्थिक वर्षात ४८४ कोटी रुपयांची सर्वात मोठी देणगी दिली. फोर्ब्सच्या मते, जुलै २०२३ पर्यंत प्रेमजींची एकूण संपत्ती ९२० कोटी अमेरिकन डाॅलर्स आहे. .
१९४५ साली अझीम प्रेमजींचे वडील हुसेन हाशिम प्रेमजी बर्माहून भारतात आले होते. त्यांना इंग्रजांच्या राजवटीच्या नियमांमुळे त्यांचा वर्षानुवर्षे जुना तांदळाचा व्यवसाय बंद करावा लागला. त्यामुळे नवीन संधींच्या शोधात हाशिम प्रेमजी मुंबईपासून ३५० किमी अंतरावर असलेल्या जळगाव जवळ असलेल्या अमळनेरला पोहोचले. तेथे एका छोट्या भाजीपाला तेल मिलच्या मालकाला दिलेल्या कर्जासंदर्भात भेटायला गेले. गिरणी मालक कर्जाची परतफेड करू शकला नाही आणि त्याने हाशिम प्रेमजी यांना कर्जाऐवजी ऑइल मिल खरेदी करण्यास सांगितले. हीच संधी हशिम प्रेमजी शोधत होते. यानंतर भाताच्या व्यवसायातून ते तेलाच्या व्यवसायात आले.
वडिलांच्या निधनानंतर त्यांनी वयाच्या २१ व्या वर्षी कंपनीची सूत्रे हाती घेतली. व्यवसायाला नवीन उंचीवर नेले. प्रेमजी यांनी १९८० मध्ये वेस्टर्न इंडिया व्हेजिटेबल प्रॉडक्ट्स लिमिटेड ही साबण आणि वनस्पती तेलाचा व्यवसाय करणारी कंपनीची अमेरिकन कंपनी सेंटिनेल कॉम्प्युटर कॉर्पोरेशनच्या सहकार्याने नव्याने आयटी कंपनी म्हणून सुरूवात केली. पर्सनल कॉम्प्युटर बनवण्याबरोबरच कंपनीने सॉफ्टवेअर सेवाही देण्यास सुरुवात केली. त्यानंतरच कंपनीचे नाव बदलून विप्रो करण्यात आले. याचवेळी आयबीएमने आपला पसारा भारतातून हलवण्याचा निर्णय त्यावेळी घेतला होता. त्यामुळे प्रेमजी यांना ही संधी सोडायची नव्हती. विप्रो कंपनीला मिळणाऱ्या उदंड प्रतिसादानंतर अझीम प्रेमजी यांच्या नेटवर्थमध्ये वाढ होत गेली. जुलै २०२३ पर्यंत प्रेमजींची एकूण संपत्ती ९२० कोटी अमेरिकन डाॅलर्स आहे.
सध्या अझीम प्रेमजी यांनी आपला सर्व व्यवसाय मुलाकडे सुपूर्द केला आहे. २०१९ मध्ये अझीम प्रेमजी यांनी ५२७०० कोटी रुपयांचे शेअर्स अझीम प्रेमजी फाऊंडेशनला दान केले आहेत. फाउंडेशनच्या मते, २०१९ मध्ये, प्रेमजींनी दान केलेली एकूण रक्कम १,४५,००० कोटी रुपये झाली होती.दुसरीकडे, त्याने २०२०-२१ या आर्थिक वर्षात दररोज २७ कोटी रुपये दान केले. २०२०-२१ मध्ये अझीम प्रेमजी यांनी शिव नाडर (१२६३ कोटी रुपये), मुकेश अंबानी (५७७ कोटी रुपये) पेक्षा ९७१३ कोटी रुपये जास्त दान केले. आणि २०२१-२२ मध्ये ४८४ कोटी रुपये दान केले. ब्लूमबर्गच्या मते, अझीम प्रेमजी सध्या देशातील ५ व्या क्रमांकाचे श्रीमंत व्यक्ती आहेत.
संबंधित बातम्या