azad engineering share price latest : मागील महिन्यात शेअर बाजारात सूचीबद्ध झालेल्या आझाद इंजिनीअरिंगच्या शेअरमध्ये छप्परफाड वाढ झाली आहे. आजच्या एका दिवसात शेअरमध्ये तब्बल २० टक्क्यांची वाढ झाली असून हा शेअर १४२.३५ रुपयांनी वधारला आहे. सचिन तेंडुलकरची (Sachin Tendulkar) मोठी गुंतवणूक असलेला हा शेअर घेण्यासाठी आता झुंबड उडाली आहे.
आझाद इंजिनीअरिंगच्या शेअरनं आज ५२ आठवड्यांचा उच्चांक गाठला. दिवसअखेर एनएसईवर आझाद इंजिनीअरिंगचा शेअर ८५४.३० रुपयांवर ट्रेड करत होता. कंपनीच्या शेअर्समध्ये आलेल्या या तेजीचं कारण एक मोठा करार आहे. आझाद इंजिनिअरिंगला ब्रिटिश लक्झरी कार उत्पादक कंपनी रोल्स रॉयसकडून (Rolls Royce) मोठी ऑर्डर मिळाली आहे. या दोन्ही कंपन्यांमध्ये या संदर्भात दीर्घ मुदतीचा करार झाला आहे. कंपनीनं याबाबत शेअर बाजाराला माहिती दिल्यामुळं शेअर खरेदीचा जोर वाढला आहे.
आझाद इंजिनीअरिंगनं शेअर बाजाराला दिलेल्या माहितीनुसार, रोल्स रॉयसच्या संरक्षक विमानाच्या इंजिनसाठी महत्त्वाचे पार्ट्सच्या पुरवण्याचा हा करार आहे. आझाद इंजिनिअरिंग लिमिटेडनं रोल्स-रॉयससोबत सात वर्षांचा करार केला आहे. मात्र, व्यवहाराची रक्कम उघड करण्यात आलेली नाही.
मागील महिन्यात आझाद इंजिनिअरिंगचा आयपीओ (IPO) आला होता. कंपनीचे शेअर्स डिसेंबर २०२३ मध्ये बीएसई आणि एनएसईवर सूचीबद्ध झाले होते. आझादच्या शेअरनं बाजारात दमदार एन्ट्री केली होती. ५२४ रुपयांच्या मूळ किंमतीच्या तुलनेत ३७.४० टक्के प्रीमियमवर म्हणजेच ७२० रुपयांवर हा शेअर सूचीबद्ध झाला होता. तर, बीएसईवर, आझाद इंजिनिअरिंगचे शेअर्स प्रति शेअर ७१० रुपये दरानं सूचीबद्ध झाले होते. लिस्टिंगनंतर हा शेअर सुमारे २ टक्क्यांनी वाढला आहे आणि इश्यू किंमतीपासून ४० टक्क्यांनी वाढला आहे. सचिन तेंडुलकरकडं कंपनीचे सुमारे ४.५ लाख शेअर्स आहेत. कंपनीच्या भागधारकांमध्ये व्हीव्हीएस लक्ष्मण आणि सायना नेहवाल यांचाही समावेश आहे.
(डिस्क्लेमर : वरील वृत्त केवळ माहितीपर आहे. हा कोणत्याही प्रकारचा गुंतवणुकीचा सल्ला नाही. शेअर बाजारातील गुंतवणुकीत जोखीम असते. गुंतवणूक करताना संबंधितांनी आपल्या आर्थिक सल्लागाराशी चर्चा करून निर्णय घ्यावा.)