Stock Market News : आझाद इंजिनीअरिंग या स्मॉलकॅप कंपनीच्या शेअर्समध्ये आज मोठी वाढ झाली आहे. कंपनीचा शेअर एनएसईवर आज जवळपास १७०० रुपयांवर पोहोचला. आझाद इंजिनीअरिंगला जीई व्हर्नोव्हा इंटरनॅशनलकडून ९६० कोटी रुपयांचं कंत्राट मिळाल्यानं शेअरमध्ये ही वाढ झाली आहे.
हा करार ६ वर्षांसाठी आहे. या कराराचं मूल्य ११२ मिलियन डॉलर (सुमारे ९६० कोटी रुपये) आहे. या करारानुसार कंपनी प्रगत गॅस टर्बाइन इंजिनसाठी कॉम्प्लेक्स रोटेटिंग आणि स्टेशनरी एअरफॉईल्सचा पुरवठा करणार आहे. महान क्रिकेटपटू सचिन तेंडुलकर याचीही या कंपनीत मोठी गुंतवणूक आहे.
यापूर्वी नोव्हेंबर २०२४ मध्ये जपानच्या मित्सुबिशी हेवी इंडस्ट्रीज लिमिटेडसोबत दीर्घकालीन करारावर स्वाक्षरी केली होती. या कराराची किंमत ८२.८९ मिलियन डॉलर (सुमारे ७०० कोटी रुपये) होती. आझाद इंजिनिअरिंगनं फ्रेंच कंपनीसोबत स्ट्रॅटेजिक पार्टनरशिपही केली असून त्याची किंमत ३४० कोटी रुपये आहे.
गेल्या वर्षभरात आझाद इंजिनीअरिंगचा शेअर १५० टक्क्यांहून अधिक वधारला आहे. १६ जानेवारी २०२४ रोजी कंपनीचा शेअर ६७०.७० रुपयांवर होता, तो आज १६९७.९५ रुपयांवर पोहोचला. कंपनीच्या शेअरची ५२ आठवड्यांची उच्चांकी पातळी २०८० रुपये आहे. तर, ५२ आठवड्यांची नीचांकी पातळी ६४१.९५ रुपये आहे.
आझाद इंजिनीअरिंगचा आयपीओ २० डिसेंबर २०२३ रोजी खुला झाला आणि २२ डिसेंबरपर्यंत खुला राहिला. आयपीओमध्ये कंपनीच्या शेअरची किंमत ५२४ रुपये होती.
मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरनं ६ मार्च २०२३ रोजी हैदराबाद येथील आझाद इंजिनिअरिंग या कंपनीत ५ कोटी रुपयांची गुंतवणूक केली. त्याच्याकडं ४,३८,२१० शेअर्स आहेत. शेअर स्प्लिट आणि बोनस शेअर्समुळं सचिन तेंडुलकरला कंपनीचा एक शेअर ११४.१० रुपयांना पडला. २८ डिसेंबर २०२३ रोजी आझाद इंजिनीअरिंगच्या शेअर्सच्या लिस्टिंगवर सचिन तेंडुलकरच्या गुंतवणुकीचं मूल्य ३१.५५ कोटी रुपये झालं. तर जून २०२४ मध्ये सचिनच्या गुंतवणुकीचं मूल्य ७२ कोटी रुपयांच्या पुढं गेलं. सचिननं कंपनीतील आपली गुंतवणूक कायम ठेवली आहे की त्यातून तो बाहेर पडला आहे, हे अद्याप समजू शकलेलं नाही.
संबंधित बातम्या