सचिन तेंडुलकरची मोठी गुंतवणूक असलेला आझाद इंजिनीअरिंगचा शेअर उसळला! जपानी कंपनीशी कराराचा परिणाम
मराठी बातम्या  /  बिझनेस  /  सचिन तेंडुलकरची मोठी गुंतवणूक असलेला आझाद इंजिनीअरिंगचा शेअर उसळला! जपानी कंपनीशी कराराचा परिणाम

सचिन तेंडुलकरची मोठी गुंतवणूक असलेला आझाद इंजिनीअरिंगचा शेअर उसळला! जपानी कंपनीशी कराराचा परिणाम

HT Marathi Desk HT Marathi
Nov 04, 2024 11:30 AM IST

azad engineering and mitsubishi : जपानची नामांकित कंपनी मित्सुबिशी सोबत झालेल्या दीर्घकालीन करारामुळं आझाद इंजिनीअरिंगच्या शेअर्समध्ये मोठी वाढ झाली आहे.

जपानच्या मित्सुबिशी कंपनीशी करार होताच उसळला आझाद इंजिनीअरिंगचा शेअर, सचिन तेंडुलकरची आहे मोठी गुंतवणूक
जपानच्या मित्सुबिशी कंपनीशी करार होताच उसळला आझाद इंजिनीअरिंगचा शेअर, सचिन तेंडुलकरची आहे मोठी गुंतवणूक

azad engineering and mitsubishi deal : आझाद इंजिनीअरिंग या छोट्या कंपनीचे शेअर्स रॉकेटच्या वेगानं वधारले आहेत. सोमवारी बीएसईवर आझाद इंजिनीअरिंगचा शेअर १३ टक्क्यांनी वधारून १६७०.२५ रुपयांवर पोहोचला. कंपनीच्या शेअर्समध्ये ही वाढ एका मोठ्या व्यवहारामुळे झाली आहे. आझाद इंजिनिअरिंगने जपानच्या मित्सुबिशी हेवी इंडस्ट्रीज लिमिटेडसोबत दीर्घकालीन करार आणि किंमत करार (LTCPA) केला आहे.

या कराराचा पहिल्या टप्प्याचं मूल्य ८२.८९ दशलक्ष डॉलर्स म्हणजेच सुमारे ७०० कोटी रुपये आहे. हा दीर्घकालीन करार ५ वर्षांत पूर्ण करायचा आहे. यावर्षी ऑक्टोबरमध्ये आझाद इंजिनिअरिंगला हनीवेल एअरोस्पेस लिमिटेडकडून १३४ कोटी रुपयांची ऑर्डर मिळाली होती. ही ऑर्डर अतिशय गुंतागुंतीच्या घटकांचे उत्पादन आणि पुरवठा करण्यासाठी होती. मित्सुबिशीकडून ऑर्डर मिळाल्यानंतर आझाद इंजिनिअरिंगने कंपनीची सध्याची ऑर्डर बुक स्थिती काय आहे याचा उल्लेख केलेला नाही.

आझाद इंजिनीअरिंगचा आयपीओ

आझाद इंजिनीअरिंगचा आयपीओ २० डिसेंबर २०२३ रोजी खुला झाला. तो २२ डिसेंबरपर्यंत गुंतवणुकीसाठी खुला होता. आयपीओमध्ये कंपनीच्या शेअरची किंमत ५२४ रुपये होती. २८ डिसेंबर २०२३ रोजी कंपनीचा शेअर बीएसईवर ७१० रुपयांवर लिस्ट झाला होता. लिस्टिंगनंतर कंपनीच्या शेअर्समध्ये चांगली वाढ दिसून येत आहे. कंपनीचा शेअर ४ नोव्हेंबर २०२४ रोजी १६७०.२५ रुपयांवर पोहोचला आहे. कंपनीचा आयपीओ एकूण ८३.०४ पट सब्सक्राइब झाला. कंपनीच्या आयपीओमध्ये किरकोळ गुंतवणुकदारांच्या श्रेणीत २४.५१ पट हिस्सा होता.

सचिन तेंडुलकरची ५ कोटींची गुंतवणूक

महान क्रिकेटपटू सचिन तेंडुलकर यानं मार्च २०२३ मध्ये आझाद इंजिनिअरिंगमध्ये ५ कोटी रुपयांची गुंतवणूक केली होती. सरासरी १३६.९२ रुपये प्रति शेअर या दरानं त्याच्याकडं ३,६५,१७६ शेअर्स होते. जून २०२४ पर्यंतच्या आकडेवारीनुसार, कंपनीतील त्याच्या गुंतवणुकीचं मूल्य १४.५६ पटीनं वाढलं आहे. त्यांच्या समभागाची किंमत ७२.३७ कोटी रुपयांवर पोहोचली आहे. 'बिझनेस टुडे'नं दिलेल्या वृत्तात ही माहिती देण्यात आली आहे. सचिन तेंडुलकर आझाद इंजिनीअरिंगमधील गुंतवणूक कायम ठेवणार आहे की नाही, हे अद्याप स्पष्ट झालेलं नाही.

 

(डिस्क्लेमर: हे वृत्त केवळ माहितीपर आहे. हा कोणत्याही प्रकारच्या गुंतवणुकीचा सल्ला नाही. त्यामुळं गुंतवणूक करण्याआधी आर्थिक सल्लागाराशी चर्चा करा.)

Whats_app_banner