icici vs axis bank : आयसीआयसीआय बँक की अ‍ॅक्सिस बँक? कोणता शेअर जास्त चांगला आणि का?
मराठी बातम्या  /  बिझनेस  /  icici vs axis bank : आयसीआयसीआय बँक की अ‍ॅक्सिस बँक? कोणता शेअर जास्त चांगला आणि का?

icici vs axis bank : आयसीआयसीआय बँक की अ‍ॅक्सिस बँक? कोणता शेअर जास्त चांगला आणि का?

Updated May 21, 2024 07:58 PM IST

Axis Bank vs ICICI Bank stock comparison : आयसीआयसीआय व अ‍ॅक्सिस या दोन्ही बँकांनी नुकतेच तिमाही निकाल जाहीर केले आहेत. या दोन्ही बँकांच्या शेअरची किंमत जवळपास सारखी आहे. मग यातील कुठला शेअर अधिक चांगला आहे? जाणून घेऊया…

आयसीआसीआय बँक की अ‍ॅक्सिस बँक? कोणता शेअर जास्त चांगला?
आयसीआसीआय बँक की अ‍ॅक्सिस बँक? कोणता शेअर जास्त चांगला?

Axis Bank vs ICICI Bank stock comparison : कोणत्याही अर्थव्यवस्थेत बँकांना प्रचंड महत्त्व असतं. कर्जे आणि ठेवी या दोन गोष्टींवर चालणाऱ्या बँका अर्थव्यवस्था आणि वैयक्तिक जीवनाला आकार देत असतात. त्या अर्थानं त्या अर्थव्यवस्थेत एखाद्या सैनिकाची भूमिका बजावत असतात. आजच्या डिजिटल जमान्यात भारतीय बँकिंग उद्योगानं कात टाकली असून बँका अधिकाधिक लोकाभिमुख झाल्या आहेत. 

व्यवसाय स्वातंत्र्यामुळं नवनव्या बँका बाजारात येत आहेत. मात्र, भारतीय बाजारात काही मोजक्या बँकांचा दबदबा आहे. यात सध्या आयसीआयसीआय आणि अ‍ॅक्सिस या दोन दिग्गज बँकांमध्ये वर्चस्वासाठी स्पर्धा सुरू आहे. दोन्ही बँकांची भूतकाळातील प्रभावी वाटचाल, देशव्यापी जाळे आणि नाविन्यपूर्णतेचा ध्यास ही ओळख आहे.  यांपैकी कोणत्या बँकेत वरचढ ठरण्याची क्षमता आहे पाहूया.

अ‍ॅक्सिस बँक

१९९३ साली स्थापन झालेली अ‍ॅक्सिस बँक ही भारतातील एक अग्रगण्य खासगी बँक असून तिच्या शाखांचं जाळं विस्तृत आहे. ही बँक रिटेल, कॉर्पोरेट, होलसेल आणि इन्व्हेस्टमेंट बँकिंगसह विविध प्रकारच्या वित्तीय सेवा देते. बँकिंग, क्रेडिट कार्ड आणि पर्सनल लोनमध्ये अ‍ॅक्सिस बँकेचा मोठा वाटा आहे. अलीकडंच सिटी बँक इंडियाचा रिटेल बँकिंग व्यवसाय ताब्यात घेऊन अ‍ॅक्सिस बँकेनं आपला पसारा वाढवला आहे.

आयसीआयसीआय बँक

आयसीआयसीआय बँक ही भारतातील खासगी क्षेत्रातील दुसरी सर्वात मोठी बँक आहे. ही बँक किरकोळ, कॉर्पोरेट आणि लहान व मध्यम आकाराच्या व्यवसायांना वित्तीय उत्पादनं आणि विविध सेवा देते. बँकिंग, लाइफ अँड जनरल इन्शुरन्स, हाऊसिंग फायनान्स, इन्व्हेस्टमेंट बँकिंग आणि ब्रोकरेज सर्व्हिसेस पुरवणाऱ्या उपकंपन्यांच्या माध्यमातून ही कंपनी कार्यरत आहे. आयसीआयसीआय बँकेच्या जगभरात शाखा आणि प्रतिनिधी कार्यालयं आहेत.

बाजार भांडवलाच्या बाबतीत आयसीआयसीआय बँक १५ मे २०२४ पर्यंत ७८७७.८० अब्ज रुपयांसह आघाडीवर आहे, तर अ‍ॅक्सिस बँकेचं बाजार भांडवल ३४६५.९० अब्ज रुपये आहे. आयसीआयसीआय बँकेच्या संपूर्ण भारतात ६,५२३ शाखा आणि १७,१९० एटीएम आहेत, तर अ‍ॅक्सिस बँकेच्या ५,३७७ शाखा आणि १६,०२६ एटीएम आहेत. ग्राहक सेवेच्या बाबतीत आयसीआयसीआयनं अ‍ॅक्सिस बँकेला मागं टाकलं आहे. आयसीआसीआय २८ दशलक्षाहून अधिक ग्राहकांना सेवा देते, तर अ‍ॅक्सिस २० दशलक्ष ग्राहकांना सेवा देते.

शेअर बाजारातील कामगिरीच्या आधारे दोन्ही बँकांची तुलना केल्यास अ‍ॅक्सिस बँक २२.९ टक्के नफ्यासह आघाडीवर आहे, तर आयसीआयसीआय बँकेच्या शेअर्सनं गेल्या वर्षभरात १८.८ टक्के परतावा दिला आहे.

निव्वळ व्याज उत्पन्न (एनआयआय)

बँकेसाठी व्याज हा उत्पन्न आणि खर्चाचा प्रमुख स्त्रोत असतो. ठेवीवर व्याज भरताना बँकेला कर्ज आणि अ‍ॅडव्हान्सवर व्याज मिळते. या दोन रकमेतील फरक म्हणजे निव्वळ व्याज उत्पन्न (NII) हा बँकेचा प्राथमिक महसूल स्त्रोत आहे.

(EM)
(EM)

गेल्या पाच वर्षांत अ‍ॅक्सिस बँक आणि आयसीआयसीआय बँकेचं व्याज उत्पन्न अनुक्रमे ९.३ टक्के आणि ११ टक्के चक्रवाढ वार्षिक वाढीच्या दरानं (सीएजीआर) वाढलं आहे. याच कालावधीत त्यांच्या व्याजखर्चात किंचित वाढ झाली आहे.

अ‍ॅक्सिस बँक आणि आयसीआयसीआय बँकेचं निव्वळ व्याज उत्पन्न अनुक्रमे १४.७% आणि १६.५% सीएजीआरनं वाढलं आहे. गेल्या पाच वर्षांत सरासरी निव्वळ मार्जिन ३.५% आहे.

आयसीआयसीआय बँक व्याज उत्पन्न, निव्वळ व्याज उत्पन्न आणि निव्वळ व्याज मार्जिनच्या बाबतीत आघाडीवर आहे. दुसरीकडं, अ‍ॅक्सिस बँकेचं निव्वळ व्याज उत्पन्न प्रामुख्यानं सुधारित मालमत्तेची गुणवत्ता आणि विस्तारित व्याज स्प्रेडमुळं वाढलं आहे.

नफा

निव्वळ नफा वाढ आणि निव्वळ नफा मार्जिन वाढीद्वारे नफ्याचं मूल्यांकन केलं जाऊ शकतं. गेल्या पाच वर्षांत आयसीआयसीआय बँकेच्या निव्वळ नफ्यात ५१.६ टक्के सीएजीआरनं वाढ झाली आहे. अ‍ॅक्सिस बँकेचा निव्वळ नफा १६.५ टक्के सीएजीआरनं वाढला आहे.

नफा
नफा

ठेवी

जमा केलेल्या रकमेमुळं ग्राहकांचा विश्वास प्रतिबिंबित होतो. मोठ्या ठेवींचा आधार ग्राहकांचा मजबूत विश्वास आणि बँकेची प्रतिमा उंचावतो. आयसीआयसीआय बँकेच्या ठेवी अ‍ॅक्सिस बँकेपेक्षा १.३ पट जास्त आहेत. ठेवी खूप जास्त असूनही आयसीआयसीआय बँकेनं गेल्या पाच वर्षांत १२.२ टक्के सीएजीआरनं आपल्या ठेवी वाढविण्यात यश मिळवलं आहे.

बँकेनं गेल्या पाच वर्षांत आपल्या शाखांचं जाळं विस्तारलं आहे. त्यामुळं ठेवीवाढीस मदत झाली आहे. अ‍ॅक्सिस बँकेच्या ठेवी ११.४ टक्के सीएजीआरनं वाढल्या. शाखा विस्तार आणि डिजिटलायझेशन यामागचं प्रमुख कारण आहे. सिटी बँकेच्या अधिग्रहणामुळं ठेवी आणखी वाढण्याची शक्यता आहे.

ठेवींचा तपशील
ठेवींचा तपशील

अ‍ॅडव्हान्स

अ‍ॅक्सिस बँक गेल्या पाच वर्षांत ११.४ टक्के सीएजीआरसह कर्जाच्या वाढीत आघाडीवर आहे, तर आयसीआयसीआय बँकेची कर्जवाढ १०.९ टक्के आहे. अ‍ॅक्सिस बँकेचा अ‍ॅडव्हान्स-टू-डिपॉझिट रेशोही जास्त आहे.

कर्जाचे प्रमाण
कर्जाचे प्रमाण

निव्वळ एनपीए

बँकेला ९० दिवसांपेक्षा जास्त काळ व्याज न मिळाल्यास एखाद्या मालमत्तेला अनुत्पादक मालमत्ता (NPA) म्हणून चिन्हांकित केले जाते. वाढता एनपीए चिंतेचा विषय ठरू शकतो कारण त्याचा परिणाम बँकेच्या नफ्यावर होतो. 

बँकेच्या पुस्तकातील एनपीएची पातळी मोजण्यासाठी आपण निव्वळ एनपीए पाहू शकतो. निव्वळ एनपीए हे एकूण कर्जाच्या टक्केवारीनुसार अनुत्पादक मालमत्तेचे मोजमाप आहे. टक्केवारी जितकी कमी तितकी चांगली.

आयसीआयसीआय बँक आणि अ‍ॅक्सिस बँकेचा सरासरी निव्वळ एनपीए अनुक्रमे १.३ टक्के आणि १.२ टक्के आहे. रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाच्या (आरबीआय) मते निव्वळ एनपीए ६ टक्क्यांपेक्षा कमी असावा.

आयसीआयसीआय बँक आणि अ‍ॅक्सिस बँक या दोन्ही बँकांनी आरबीआयनं ठरवून दिलेल्या मानकांपेक्षा चांगली कामगिरी केली आहे. शिवाय गेल्या पाच वर्षांत एनपीए कमी होत आहे, ही चांगली बाब आहे. यावरून बँका कर्ज देण्यापूर्वी काटेकोर तपासणी प्रक्रियेचं पालन करीत असल्याचं दिसून येतं.

निव्वळ अनुत्पादक मालमत्ता
निव्वळ अनुत्पादक मालमत्ता

वित्तीय कार्यक्षमता

वित्तीय कार्यक्षमता भांडवल पर्याप्तता गुणोत्तर आणि इक्विटीवरील परतावा (ROE) द्वारे मोजली जाते. दोन्ही बँकांचं भांडवल पर्याप्ततेचं प्रमाण मजबूत असून आयसीआयसीआय बँक १७.९ टक्के आणि अ‍ॅक्सिस बँक १७ टक्के आहे. आयसीआयसीआय बँक आरओईमध्ये सरासरी १०.०६ टक्के तर अ‍ॅक्सिस बँकेची ७.४ टक्के आहे.

वित्तीय कार्यक्षमता
वित्तीय कार्यक्षमता

लाभांश

आयसीआयसीआय बँकेचा लाभांश वाढीचा दर ५३.९ टक्के सीएजीआरसह उच्च लाभांश वाढीचा दर आहे, तर अ‍ॅक्सिस बँकेचा ३.८ टक्के आहे. आयसीआयसीआय बँकेचं डिव्हिडंड यील्ड आणि पेआऊट रेशो देखील अनुक्रमे ०.५% आणि १०.६% इतका जास्त आहेत.

dividend
dividend

मूल्य गुणोत्तर

प्राइस टू अर्निंग आणि प्राइस टू इक्विटी रेश्योवरून मूल्यांकन गुणोत्तर ठरते. एखाद्या कंपनीचा शेअर ओव्हरव्हॅल्यूड आहे की अंडरव्हॅल्यूड हे त्यावरून समजतं. या निकषांच्या आधारे आयसीआयसीआय बँकेच्या तुलनेत अ‍ॅक्सिस बँकेचं अवमूल्यन झालं आहे.

मूल्य गुणोत्तर
मूल्य गुणोत्तर

कोणत्या बँकेचा शेअर चांगला?

आयसीआयसीआय बँक व्याज उत्पन्न, निव्वळ व्याज उत्पन्न वाढ, नफा, ठेवी वाढ, वित्तीय कार्यक्षमता आणि लाभांश देयकात उत्कृष्ट आहे. मात्र, अ‍ॅक्सिस बँक कर्जवाढ, अ‍ॅडव्हान्स-टू-डिपॉझिट रेशो आणि निव्वळ एनपीएमध्ये आघाडीवर आहे.

अ‍ॅक्सिस बँकेनं सिटी बँकेच्या किरकोळ व्यवसायाचं अधिग्रहण केल्यानं त्याची ग्राहक संख्या आणि ठेवी वाढण्याची अपेक्षा आहे, तर आयसीआयसीआय बँक आपला डिजिटल व्यवसाय आणि किरकोळ कर्जाचा विस्तार करण्यावर लक्ष केंद्रित करत आहे.

भारताच्या वाढत्या पायाभूत सुविधा, व्यवसाय आणि नागरीकरणाचा फायदा घेण्यासाठी दोन्ही बँका चांगल्या स्थितीत आहेत. तथापि, बँकिंग उद्योगाच्या अत्यंत नियंत्रित स्वरूपामुळं नियामक निर्बंधांचा सतत धोका असतो. शेवटी, दोन्ही बँकांची ताकद असली तरी आयसीआयसीआय बँकेकडं सध्या एकंदर कामगिरी आणि आर्थिक निकषांमध्ये आघाडी आहे.

(डिस्क्लेमर: हा लेख केवळ माहितीच्या उद्देशानं दिलेला आहे. हा कोणत्याही प्रकारे गुंतवणुकीचा सल्ला नाही. गुंतवणूक करू इच्छिणाऱ्यांनी आपल्या वैयक्तिक सल्लागाराशी चर्चा करून निर्णय घ्यावा.)

Whats_app_banner