Share Market Investment : शेअर बाजारातील गुंतवणूक इतर कुठल्याही गुंतवणुकीपेक्षा अनेकार्थांनी उत्तम असते हे आता सिद्ध झालं आहे. वेगवेगळ्या क्षेत्रांत डिजिटल क्रांती झाल्यापासून शेअर बाजारातील गुंतवणुकीत मोठी वाढ झाली आहे. नवनवीन लोक मार्केटमध्ये उतरू लागले आहेत आणि जुने लोक अधिक उत्साहानं कमाई करण्याचा प्रयत्न करत आहेत.
शेअर मार्केटमधील गुंतवणूक ही प्रचंड पैसा देणारी जशी असते, तशी ती सगळा पैसा ओढून नेणारीही ठरू शकते. त्यामुळं ती पूर्ण अभ्यासाअंती आणि विचाराअंती करावी लागते. मात्र, केवळ नवेच नाही तर जुने गुंतवणूकदारही शेअर बाजारात गुंतवणूक करताना अत्यंत छोट्या, पण महत्त्वाच्या चुका करत असतात. या चुका टाळता येण्यासाठी त्या चुका काय असतात हे आधी माहीत असायला हवं. जाणून घेऊया त्या विषयी…
ज्या कंपनीत गुंतवणूक करणार आहात, त्या कंपनीचं बिझनेस मॉडेल समजून घ्या. कंपनीबद्दल माहिती न घेता केलेली गुंतवणूक ही आंधळी गुंतवणूक ठरू शकते. त्याचा मोठा फटका बसू शकतो.
शेअर बाजारात गुंतवणूक करणारे अनेक जण प्रॉफिट बुकिंगच्या चाचपडत असतात. कुणाला किती नफा झाला याच्या आधारे ते आपला नफा ठरवत असतात आणि फसतात. किती पैसे मिळाले म्हणजे योग्य नफा हे शेअर मार्केटमध्ये कुणीही सांगू शकत नाही. त्यामुळं अति नफ्याची अपेक्षा टाळा. नफ्याचं प्रमाण ठरवून त्यानुसार निर्णय घेत चला.
‘कुठं जायचं आहे हे नेमकं माहीत नसेल तर तुम्ही भरकटणार हे निश्चित’ अशी एक म्हण आहे. सर्वच ठिकाणी ती लागू पडते. शेअर बाजारही त्याला अपवाद नाही. आपल्याला गुंतवणुकीतून कोणता हेतू किंवा उद्दिष्ट साध्य करायचं आहे हे निश्चित असलं पाहिजे. तसं नसेल तर शेअर बाजारात तुम्हाला पुरेसं यश मिळणार नाही.
अनेकदा एखाद्या कंपनीच्या शेअरनं नफा दिला की गुंतवणूकदार तो शेअर आपला खास आहे असं म्हणायला लागतात. ही चूक टाळा. कंपनीच्या प्रेमात पडू नका. आपल्या आवडत्या कंपनीमध्ये देखील काही गडबड वाटल्यास तो शेअर विकायला मागेपुढे बघू नका.
कुठलेही एक क्षेत्र किंवा विशिष्ट शेअरमधील गुंतवणूकच चांगला नफा मिळवून देईल असा अतिआत्मविश्वास मारक ठरतो. अनेक गुंतवणूकदार ठराविक शेअरमध्येच गुंतवणूक करतात. हे टाळा. विविध क्षेत्रांमध्ये व कंपन्यांमध्ये गुंतवणूक करून जोखीम कमीत कमी करण्याचा प्रयत्न करा.
शेअर बाजारात गुंतवणूक करताना कालमर्यादा निश्चित करणं गरजेचं आहे. अनेकदा गुंतवणूकदार लाँग टर्मसाठी गुंतवणूक करून शॉर्ट टर्मच्या फायद्याकडं डोळे लावून बसतात. त्यातून चुकीच्या वेळी शेअर विक्रीचे निर्णय घेतले जातात आणि नुकसान होतं.
स्वस्तात खरेदी आणि महागात विक्री हा मार्केटचा साधा नियम आहे. मात्र, अनेक गुंतवणूकदार नेमकं उलटं करताना दिसतात. भीती आणि लालसेतून हे घडतं. बऱ्याचदा दीर्घकालीन गुंतवणुकीतून फायदा मिळवण्याऐवजी अल्पावधीत जास्तीत जास्त नफा मिळवण्यासाठी चढ्या दरानं शेअर खरेदी केले जातात. नंतर त्यातून बाहेर पडणं कठीण होऊन जातं.
शेअर मार्केटमधील गुंतवणुकीमध्ये संयम हे वरदान ठरतं. गुंतवणुकीचं खरं फळ मिळण्यासाठी वेळ द्यावा लागतो. त्यासाठी संयमाची आवश्यकता असते. सतत शेअर खरेदी करणं आणि पोर्टफोलिओमध्ये बदल करत राहणं हे जोखमीत भर घालत असतं. शिवाय सततच्या ट्रेडिंगमुळं ब्रोकरेजचा खर्चही अधिक होतो.
हुशार गुंतवणूकदार विविध ठिकाणांहून माहिती घेतात आणि स्वत: अभ्यास करून नंतर गुंतवणुकीचा निर्णय घेतात. मात्र, बहुतेक लोक मीडियातील बातम्यांवर विसंबून गुंतवणूक करतात. मात्र, शेअर बाजार हा मीडियावर अवलंबून नसतो. शेअर बाजारातील घडामोडींवर मीडिया अवलंबून असतो, हे लक्षात घेणं गरजेचं आहे.
शेअर बाजारातील गुंतवणुकीबाबत मार्गदर्शन करण्यासाठी आर्थिक सल्लागार असणं फायद्याचं ठरतं. मात्र, सल्लागाराची निवड चुकू देऊ नका. योग्य सल्लागाराच्या निवडीसाठी पुरेसा वेळ द्या.